नागपूर : नागपूर जिल्ह्यातील हिंगणा वन परिक्षेत्रात काल एक वाघीण मृतावस्थेत आढळून आली. वन विभागाचे कर्मचारी काल संध्याकाळी गस्तीवर असताना उमरी चं
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील हिंगणा वन परिक्षेत्रात काल एक वाघीण मृतावस्थेत आढळून आली. वन विभागाचे कर्मचारी काल संध्याकाळी गस्तीवर असताना उमरी चंकापूर परिसरातील एका नाल्यात ही वाघीण मृत आढळून आली. या वाघीणीचे वय सुमारे 4 वर्ष असल्याचा अंदाज वन विभागाने वर्तवला आहे. सदर वाघिणीचा मृतदेह आढळून आल्यानंतर गस्ती पथकाने वन अधिकार्यांना याबाबत सूचना दिली. परंतु, रात्र झाली असल्याने शव विच्छेदन सकाळी करण्याचे ठरले. त्यानुसार हिंगणा वनपरिक्षेत्रच्या कर्मचार्यांनी एनटीसीएच्या मार्गदर्शक सूचना नुसार पोस्टमार्टम केले.
घटनास्थळी नागपूर वन विभागाचे उपवनसंरक्षक पी. जी. कोडापे, सहायक वनसंरक्षक नरेंद्र चांदेवार, आशिष निनावे, वन परिक्षेत्र अधिकारी हिना राठोड, विजय गंगावणे, सारिका वैरागडे आदी उपस्थित होते. शवविच्छेदन पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर भदांगे, डॉ. सुदर्शन काकडे, डॉ. सुजित कोलांगत यांनी केले. प्राथमिक माहिती नुसार वाघिणीचा मृत्यू हा हृदय श्वसन क्रिया बंद पडल्याने झाल्याचे दिसून आले आहे. फॉरेन्सिक करीता नमुने घेण्यात आले. त्यानंतर मृतदेहाचे दहन करण्यात आले. नागपूर जिल्ह्यात वाघांची शिकार वा मृत्यूच्या घटना नव्या नाही. यापूर्वी 23 मार्च 2021 रोजी पेंच व्याघ्र प्रकल्पातील नागवाडी परिक्षेत्राच्या शेजारील एफडीसीएमच्या रिसाला परिक्षेत्रात एक वाघ कुजलेल्या स्थितीत आढळून आला होता. या वाघाच्या शरीरावरील संपूर्ण केस गळून पडले होते. मात्र, पायाचे चारही पंजे कापले होते. नागपूरमध्ये 8 डिसेंबर 2019 रोजी बिहाडा खाणीतील खड्ड्यात बुडून वाघाचा मृत्यू झाला होता. रामटेक वनपरिक्षेत्रातील मानेगाव परिसरातील बिहाडा खाणीमध्ये पडून पट्टेदार वाघाचा मृत्यू झाला होता. पाण्यात पडल्यानंतर फुप्फुसामध्ये पाणी शिरल्याने वाघाचा गुदमरून मृत्यू झाला होता. तसेच 20 मार्च 2022 रोजी नागपूर प्रादेशिक वनविभाग अंतर्गत येणार्या मकरधोकडा उपवन परिक्षेत्रातील उदसा फॉरेस्ट बिटमध्ये वेकोलीला लागून असलेल्या नाल्यात विद्युत प्रवाह लागून वाघाचा मृत्यू झाला होता. रानडुकरांची शिकार करण्यासाठी वीटभट्टीशेजारील शेतात जिवंत विद्युत तारा बसविल्याचे सांगण्यात येत आहे. मृत डुक्कर खाऊन नंतर पाणी प्यायला गेलेल्या वाघाचा या तारांना स्पर्श झाल्याने त्याचा मृत्यू झाला होता.
COMMENTS