राहुरी-शनिशिंगणापूर मार्गावरील घटना; चार गंभीर जखमी देवळाली प्रवरा : राहुरी-शनिशिंगणापूर मार्गावरील उंबरे येथील जुन्या टोलनाक्याजवळ रिक्षा आणि खा

राहुरी-शनिशिंगणापूर मार्गावरील घटना; चार गंभीर जखमी
देवळाली प्रवरा : राहुरी-शनिशिंगणापूर मार्गावरील उंबरे येथील जुन्या टोलनाक्याजवळ रिक्षा आणि खाजगी बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात रिक्षातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा समावेश असून त्यांना नगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृत्यूमुखी पडलेले तिघेही घोटी (ता. नाशिक) येथील असल्याचे समजते.
हा अपघात मंगळवारी (दि. ६) सायंकाळी सुमारे ५ वाजता घडला. रिक्षा ही शनिशिंगणापूरच्या दिशेने जात असताना, शिर्डीकडे जाणारी खाजगी बस क्रमांक यांच्यात जोरदार समोरासमोर धडक झाली. धडक इतकी भीषण होती की रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला, तर खाजगी बस रस्त्यालगतच्या शेतात जाऊन पलटी झाली.
रिक्षामधील पाच प्रवाशांपैकी तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. खाजगी बसमध्ये शालेय विद्यार्थी प्रवास करत होते. त्यापैकी दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांना नगर येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. मृतांपैकी एकाचा मोबाईल अपघातस्थळी सापडला. त्या मोबाईलवरून संपर्क साधला असता संबंधित व्यक्ती घोटी येथील असल्याची माहिती मिळाली. मात्र मृतांची नावे उशिरापर्यंत समजू शकलेली नव्हती.
अपघाताची माहिती मिळताच राहुरी व उंबरे येथील तीन ते चार रुग्णवाहिकांच्या चालकांनी तातडीने मदत करत जखमींना रुग्णालयात दाखल केले. राहुरी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून दोन अपघातग्रस्तांना पुढील उपचारासाठी नगर येथे पाठविण्यात आले. दरम्यान, अपघाताची तीव्रता असूनही घटनास्थळी पोलीस तब्बल दोन तासांनी पोहोचल्याने नागरिक व प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

COMMENTS