Homeताज्या बातम्या

मुंबईत फ्रिजच्या स्फोटात तिघांचा मृत्यू

संपूर्ण घर जळून खाक, रात्रपाळीमुळे आई बचावलीमुंबई ः शहरातील गोरेगाव परिसरात शनिवारी पहाटेच्या सुमारास घडलेल्या भीषण आगीच्या घटनेने शहर हादरून गेले

दूधगंगा सहकारी पतसंस्थेत 80 कोटींचा आर्थिक घोटाळा
गुजरातेत सत्ता विक्रमाच्या बरोबरीची संधी ! 
हळदीवर अडत्या जीएसटी न आकारण्याचा निर्णय

संपूर्ण घर जळून खाक, रात्रपाळीमुळे आई बचावली
मुंबई ः शहरातील गोरेगाव परिसरात शनिवारी पहाटेच्या सुमारास घडलेल्या भीषण आगीच्या घटनेने शहर हादरून गेले आहे. घरात असलेल्या फ्रिजचा अचानक झालेला स्फोट काही क्षणांतच महाभयानक आगीत रूपांतरित झाला. या आगीत एका कुटुंबातील वडील आणि त्यांच्या दोन अल्पवयीन मुलांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, पावस्कर कुटुंबावर आलेल्या संकटाने सर्वांनाच सुन्न केले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही दुर्घटना पहाटे सुमारे तीनच्या सुमारास घडली. घरातील सदस्य गाढ झोपेत असताना फ्रिजमध्ये अचानक मोठा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी होती की क्षणार्धात संपूर्ण घर आगीच्या विळख्यात सापडले. झोपेतून उठून बाहेर पडण्याची संधी मिळण्यापूर्वीच आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट घरभर पसरले. घराला लावलेल्या प्लास्टिक शीटमुळे आगीचा भडका अधिकच उडाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ज्वलनशील साहित्यामुळे आग वेगाने पसरली आणि काही मिनिटांतच घर पूर्णतः पेटले. या आगीत संजोग पावस्कर आणि त्यांची दोन मुले हर्षदा (19) व कुशल (12) – यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आगीची तीव्रता इतकी होती की कोणालाही सुरक्षितपणे बाहेर पडता आले नाही. जीव वाचवण्यासाठी शेवटपर्यंत धडपड सुरू असल्याचे चित्र तपासादरम्यान समोर आले आहे. लहानगा कुशल आगीपासून बचाव करण्यासाठी बाथरूममध्ये आश्रय घेतल्याची माहिती आहे. मात्र, वाढत्या धुरामुळे आणि आगीच्या उष्णतेमुळे त्याचाही गुदमरून मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेने परिसरातील नागरिकांचे डोळे पाणावले. या दुर्घटनेत कुटुंबातील आई सुदैवाने बचावली. ती रात्रपाळीच्या कामावर असल्याने घटनेच्या वेळी घरी उपस्थित नव्हती. मात्र, एका क्षणात पती आणि दोन्ही अपत्ये गमावल्याने तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सकाळी घटनास्थळी पोहोचल्यानंतर तिचा आक्रोश पाहून उपस्थितांचेही मन हेलावून गेले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार ते पाच गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत घर पूर्णपणे जळून खाक झाले होते आणि तिघांचा जीव गेला होता. या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी सखोल तपास सुरू आहे. फ्रिजमधील तांत्रिक बिघाड, विद्युत दोष किंवा अन्य कारणांमुळे हा स्फोट झाला का, याचा तपास अग्निशमन दल आणि पोलिस संयुक्तपणे करत आहेत. या दुर्घटनेमुळे घरगुती विद्युत उपकरणांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

COMMENTS