अवघ्या चार दिवसांवर रंगपंचमीचा सण येऊन ठेपला आहे. निमित्त असो किंवा नसो, महाष्ट्राचे राजकीय चित्र सध्या आरोप आणि प्रत्यारोपाने पुरे रंगलेले दिसते. या
अवघ्या चार दिवसांवर रंगपंचमीचा सण येऊन ठेपला आहे. निमित्त असो किंवा नसो, महाष्ट्राचे राजकीय चित्र सध्या आरोप आणि प्रत्यारोपाने पुरे रंगलेले दिसते. या रंगात आरोपाच्या पिचकाऱ्या एवढ्या मारल्या जात आहेत की, कोणाचा रंग कसा? आणि कोण कधी आपला रंग बदलेन हे सांगणे अवघड. आपल्याकडे शामिलिऑन नावाचा एक सरडा आढळतो. तो सरडा वातावरणातील ज्या रंगाच्या पदार्थावर / वस्तूवर तो जाईल तसा तो रंग आपला बदलतो. आपल्याकडे राजकीय वातावरणात इकडून तिकडे जाणारे नेतेही त्यांचा वर्तनातील रंग ते बदलून घेत असतात. म्हणजे, राष्ट्रवादीत अर्ध्याहून अधिक वर्ष राजकीय आयुष्य जगणारे नेते जर भाजप किंवा शिवसेनेत गेले की, ते आपली पहिली स्टाईल सोडून ज्या त्या पक्षाची स्टाईल मारतात. काही बहाद्दर राजकीय पुढारी आपल्याकडे असे आहेत की, ते ज्यांचं सरकार असेल ते त्यांच्यासोबत असतात. वरून ते जाहीर भाषणातून म्हणतात की, ‘मी निष्ठावान आहे’. आता काय म्हणावे या त्यांच्या निष्ठेला? हा सर्व आपल्या राजकारणातला घोळ आहे. तो तसा देशाच्या राजकारणात देखील. असे वागण्यामागे त्यांचे काही धोरण असते. पहिले म्हणजे, आरोप- प्रत्यारोपात जनतेचे लक्ष मूळ समश्येवरून हटवणे हे होय. दुसरे असे की, आपल्या भाषणातून किंवा आरोप- प्रत्यारोपातून जनतेचे मनोरंजन करणे. यासाठी सर्वच पक्षांनी स्पेशल व्यक्ती निवडलेल्या असतात. त्यांची नावे सांगण्याची गरज नाही. अपवादात्मक रामदास आठवले यांच्यासारखे नेते आहेत की ते खरेखुरे समाज मनोरंजन करतात. म्हणजे, त्यांच्या वाणीत आकस, टीका, घृणा हे नसते. नसता बाकी सारे एका माळेचे मणी. असो, सध्या जे राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु आहेत त्याची बारकाईने चिकित्सा केल्यास ही केवळ कोल्हेकुई आहे हे लक्षात येते.
सध्या बीड जिल्ह्याला बदनाम करू नका. यावरून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचा वाद सुरु आहे. धनंजय म्हणतात की, ‘समजा मी धनंजय मुंडे म्हणून काम करत नसेल तर धनंजय मुंडेला वाट्टेल तसं बदनाम करा. मात्र बीड जिल्ह्याला बदनाम करू नका, बीड जिल्हा बिहार सारखा झाला आहे, बीड जिल्हा मागास आहे, असे म्हणून माझ्या जिल्ह्याची बदनामी करू नका’. असा मंत्री धनंजय मुंडे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर थेट निशाणा साधला. पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि माफियाराज यासंदर्भात थेट गृहमंत्र्यांकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे. पंकजा मुंडे यांनी जिल्हा बदनाम केला की, धनंजय मुंडे यांनी जिल्हा बदनाम केला? यावर त्यांच्या समर्थकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये देखील टोकाचे मतभेद असतात. ते तसे असणेही सहाजिकच. पण या समर्थकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या हे लक्षात येत नाही की, बीड जिल्हा बँक लुटली किंबहुना बुडली गेली तेव्हा वैद्यनाथ आणि जगमित्र या दोन्ही संस्थांनी त्याचा फायदा घेतलेला होता. ती बँक बुडवायला बाहेरील जिल्ह्यातील कुणी आले नव्हते. मग खरा बीड जिल्हा कुणी बदनाम केला? आता बीड जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली असा आरोप. हे गुन्हेगार कोण आहेत? गोळीबारात आमदारांच्या बापाचे नाव. आमदाराचा सासरा काठीने मारतो. शिवसेनेचा नेता गुटखा विकतो. वाळूच्या गाड्या कुणाच्या? हे सर्व यांनीच पेरलेलं असत.
आता वर बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यस्थेच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप आमदार चंद्रकांत पाटील, नमिता मुंदडा, प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर आदी नेत्यांनी विधिमंडळाच्या सभागृहात ८ मार्च रोजी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून बीड जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न थेट सभागृहात मांडण्यात आला. बीड जिल्ह्याच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न राज्यात चर्चेचा विषय. त्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आर. राजा यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची घोषणा केली. आता खरी गोम इथेच आहे. एसपी शिकार का झाले? आणि कुणी केले? गुन्हा ‘गुन्हा’ आणि ‘अर्थ’ याची ही सांगड. आता राजकीय वाद, पण कशासाठी? तर त्यासाठीच. समझने वालोंको…
COMMENTS