छत्रपती शाहू महाराज यांची आज १५१ वी जयंती साजरी करताना त्यांचे महान व्यक्तिमत्त्व आपण समजून घेताना त्यांची व्यापकताही लक्षात घ्यायला हवी. स्वातंत

छत्रपती शाहू महाराज यांची आज १५१ वी जयंती साजरी करताना त्यांचे महान व्यक्तिमत्त्व आपण समजून घेताना त्यांची व्यापकताही लक्षात घ्यायला हवी. स्वातंत्र्यापूर्वी कैक वर्षे आधी समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, सर्व घटकांना विकासाची समान संधी ही तत्त्वे शाहू महाराजांनी करवीर संस्थानात अमलात आणली. म्हणूनच त्यांचा देशभरात ‘महाराजांचे महाराज’ असा गौरव होतो. रयत प्रजा व उपेक्षित समाजाला त्यांचे हक्क व न्याय मिळवून देण्याचे कार्य शाहूंनी केले आपल्या संपूर्ण जीवन कार्यामध्ये त्यांनी समाजातील बहुजन समाजाला त्यांचे न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी आपल्या अधिकाराचा पूर्णपणे वापर केला; म्हणूनच ते लोककल्याणकारी राजा ठरले. त्यांच्या कार्याचा गौरव समकालीन लेखकांनी व इतिहासकारांनी केलेला आहे. महाराजांनी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. शाहू महाराजांना बहुजनांच्या शिक्षणाविषयी तळमळ होती. म्हणून कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा केला. तसेच ५०० ते १००० लोकवस्तीच्या गावांमध्ये शाळा काढल्या. जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्या पालकांना प्रतिमहिना १ रू. दंड आकरण्याची कायदेशीर तरतूद केली. त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. त्यासाठी त्यांनी वीस वर्षात २६ वसतिगृहांचे निर्माण केले. यामध्ये आपल्याला एक बाब प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे सर्व धर्म आणि जातींसाठी त्यांनी वसतिगृहाचे निर्माण केले. . व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग हाऊस, दिगंबर जैन बोर्डिंग, वीरशैव लिंगायत विद्यार्थी वसतिगृह, मुस्लिम बोर्डिंग, मिस क्लार्क होस्टेल, दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंग, श्री नामदेव बोर्डिंग, पांचाळ ब्राह्मण वसतिगृह, श्रीमती सरस्वतीबाई गौड सारस्वत ब्राह्मण विद्यार्थी वसतिगृह, इंडियन ख्रिश्चन होस्टेल, कायस्थ प्रभू विद्यार्थी वसतिगृह, आर्यसमाज गुरुकुल, वैश्य बोर्डिंग, ढोर चांभार बोर्डिंग, शिवाजी वैदिक विद्यालय वसतिरगृह, श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस, इंडियन ख्रिश्चन होस्टेल, नाभिक विद्यार्थी वसतिगृह, सोमवंशीय आर्यक्षत्रिय बोर्डिंग, श्री देवांग बोर्डिंग, उदाजी मराठा वसतिगृह, नाशिक, चौथे शिवाजी महाराज मराठा वसतिगृह, अहमदनगर, वंजारी समाज वसतिगृह, नाशिक, श्री शाहू छत्रपती बोर्डिंग, नाशिक, चोखामेळा वसतिगृह, नागपूर, छत्रपती ताराबाई मराठा बोर्डिंग, पुणे आदी. वसतिगृहांची निर्मिती केली. वस्तीगृहांच्या या नावावरून आपल्याला स्पष्टपणे कळून येते की, छत्रपती शाहु महाराजांनी सर्व जाती-धर्मासाठी शिक्षणासाठी वस्तीगृहांची निर्मिती केली. शाहू महाराजांनी सरकारी नोकऱ्यांत मागास वर्गांसाठी पन्नास टक्के जागा राखून ठेवण्याचा निर्णय घेतला, वाघ्या-मुरळी प्रतिबंधक कायदा केला. स्त्री पुनर्विवाह कायदा केला. आपल्या संस्थानात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला तसेच त्यांनी स्वतः असे काही विवाह घडवून आणले. कोल्हापूर येथे “शाहपूरी” ही गुळाची बाजारपेठ सुरु केली. शाहूंनी निरनिराळ्या जातीच्या लोकांसाठी वस्तीगृहे सुरु केली. अस्पृश्यांसाठी “मिस क्लार्क” हे वस्तीगृह स्थापन केले.१५ टक्के शिष्यवृत्तीची घोषणा केली. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी ‘सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष’ अशा शब्दांत त्यांना गौरविलेले आहे. शाहू महाराजांनी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय अतिशय जाणीवपूर्वक आणि विचारांती घेतला होता, हे यातून सिद्ध होते. १९०२ सालचे महाराजांचे एक भाषण आहे. त्यात ते म्हणतात, ” ग्रामीण महाराष्ट्राचा योग्य विकास झाला नाही, तर लोक रोजगारासाठी शहरांकडे धाव घेतील. शहरात झोपड्या वाढतील. शिक्षण, आरोग्यव्यवस्था यावर ताण पडेल. गुन्हेगारी वाढेल आणि शहरं ही अशांततेची केंद्रं बनतील.” आज महाराजांचे हे उद्ग्गार पटतात. शाहू महाराजांनी आपल्या बहिणीचे लग्न एका धनगर राजाशी लावले. त्यानिमित्ताने अशीच इतरही लग्नं आंतरजातीय व्हावीत, म्हणून भरीव निधी बंडोपंत पिशवीकर यांच्याकडे दिला व किमान १०० लग्नं लावायची कामगिरी सोपवली. आज मराठा समाजात महाराजांना स्विकारण्याची मानसिकता येतेय, तर, हाही विचार हा समाज आज नाही तर उद्या नक्की स्विकारेल. शाहू छत्रपतींच्या राजवटीत बालविवाहावर निर्बंध घालण्यात आले. आंतरजातीय विवाह आणि विधवा पुनर्विवाह यांनाही त्यांनी पाठिंबा दर्शविला. त्यांच्या कार्यांमुळे शाहू छत्रपतींना समाजाच्या अनेक कानाकोपऱ्यातून टीकेला सामोरे जावे लागले. वर म्हटल्याप्रमाणे, शाहू महाराज यांच्यावर ज्योतिबा फुले यांच्या कार्याचा प्रभाव होता आणि त्यांनी महात्मा जोतिबा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला दीर्घकाळ संरक्षण दिले. पण, नंतर ते आर्य समाजाकडे वळले.

COMMENTS