अहमदनगर/प्रतिनिधी : भाजी विक्रेत्याच्या हातावर धारदार शस्त्राने वार करून त्याच्या गळ्यातील 2 लाख 40 हजार रुपये किमतीची सोन्याची चेन बळजबरीने चोरून ने
अहमदनगर/प्रतिनिधी : भाजी विक्रेत्याच्या हातावर धारदार शस्त्राने वार करून त्याच्या गळ्यातील 2 लाख 40 हजार रुपये किमतीची सोन्याची चेन बळजबरीने चोरून नेली. ही घटना सोमवारी पहाटे पावणेसहाच्या सुमारास कोर्ट गल्ली येथे घडली. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
सतीश उर्फ बाळासाहेब नारायण तरोटे (वय 59, रा. सातभाई गल्ली, चितळेरोड) असे भाजी विक्रेत्याचे नाव आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत असून यासंदर्भात त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास ते मोटारसायकलवरून (एमएच 16 बीडब्ल्यू 90) भाजीपाला आणण्यासाठी भाजीमार्केटला जात असताना कोर्टगल्ली येथे पावणेसहाच्या सुमारास पाठीमागून आलेल्या मोटारसायकलवरील तीनजणांपैकी मागे बसलेल्याने त्यांची कॉलर ओढून त्यांना मोटारसायकलसह खाली पाडले. त्यानंतर दोघे मोटारसायकलवरून खाली उतरले. त्यांनी तरोटे यांच्या गळयातील सोन्याची चेन ओढली असता तरोटे यांनी ही चेन दोन्ही हातांनी धरली. त्यावेळी एकाने त्यांच्या दोन्ही हातांच्या पंजावर धारदार शस्त्राने वार करून त्यांना गंभीर जखमी केले व दुसर्याने पोटात लाथाबुक्क्या मारून चेन बळजबरीने चोरून नेली. चोरट्यांची मोटारसायकल विना क्रमांकाची होती. त्यांनी तोंडाला रूमाल बांधलेले होते व अंगात जर्किंग घातलेले होते. ते 25 तेे 30 वयोगटातील होते, असे फिर्यादीत म्हटले आहे. कोतवाली पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे व घटनेतील आरोपींच्या शोधासाठी पथक रवाना केले असून आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असे पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, कोर्टगल्लीसारख्या शहरातील मध्यवस्तीत भल्या सकाळी घडलेल्या या लूटमारीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. शहरात याआधीही भल्या सकाळी व्यायाम करण्यासाठी फिरणारांना लुटले गेले आहे.
COMMENTS