कुडाळ : आगटीत कणसे भाजून हुरडा पार्टीचा मनमुराद आस्वाद घेताना शहरातील मंडळी. कुडाळ / वार्ताहर : रब्बीच्या हंगाम म्हणजे शेतावर जाऊन आगटीत भाजलेल्या
कुडाळ / वार्ताहर : रब्बीच्या हंगाम म्हणजे शेतावर जाऊन आगटीत भाजलेल्या ज्वारीच्या कणसाच्या हुरड्याचा बेत ठरलेलाच. गोणपाटाच्या पोत्यावर गरम-गरम भाजलेली कणसे हातावर घेत यातील भाजलेल्या कणासाचा हुरडा खाताना सोबत चटणी, दही, गूळ याची गोडी काही औरच असते. याबरोबच वाळलेला हरभरा भाजून गोलाकार पडलेला हावळा खाताना हातातोंडाची झालेली घाई. ही सारी मजा ग्रामीण भागातील परंपरेत दडलेली आहे. मात्र, आज आधुनिकतेत फास्टफूडच्या चवीची धन्यता माणणारी पिढी मात्र, या पौष्टीकतेपासून दुरावलेली दिसत आहे.
ज्वारीचे पीक फुलोर्यात आली की शेतकरी राजाला हातात गोफण घेवून पाखरांची राखण करावी लागते. वेगवेगळ्या आवाज काढत शेतकरी या पाखरांना हाकलण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतो. तरीही पक्षी फुलोर्यात आलेल्या या ज्वारीचा भरभरून आनंद घेतात. यापध्दतीने अनेक हौशी लोकही शेतात बसून आगटीत शेकोटीच्या भाजलेल्या हुरड्याची चव घेण्यासाठी थेट शिवारात येतात. यातला आंनद त्यांना वेगळ्या भावविश्वात नेऊन ठेवतो. रोजच्या व्यस्त नियोजनातून एक दिवस निवांतपणे गावच्या पाहुणचारात त्यांनाही आनंद मिळतो. यात जेवणासाठी चुलीवरच्या गरम भाकर्या, पिठलं, वांग्याची भाजी अन् खोबर्या लसणाची चटणी किंवा ठेचा असा फक्कड बेत निश्चितच सर्वांना आवडणारा असतो.
पूर्वी लोक आपल्या गावाला, जवळच्या नातेवाइकांकडे जाऊन आवर्जून शेतात हुरडा पार्टी करायचे. यात या ग्रामीण मेव्याची चव सहकुटुंब चाखायला मिळायची. चालीरीतींची ओखळ व्हायची. यानिमित्ताने गावकडे जात असल्याने गावाकडच्या, खाद्य पदार्थांची मेजवानी मिळायची. विचारांची देवाण-घेवाण होत या सर्वांची माहितीही होत असे. आज मात्र, धावपळीच्या युगात, फास्ट फूडच्या जमान्यात आपण यासारख्या पौष्टिक मेव्याला मुकलो आहोत. शेतावरच्या या मेव्याऐवजी पिझ्झा, बर्गर याची ओढ लागलेली आजची पिढी अशा पौष्टिकतेपासून काहीशी दुरावलेली आहे. हुरडा, हावळा या गावाकडच्या मेव्याची चवही त्यांना चाखायला मिळत नाही. किंबहुना आवडतही नाही. याकरीता खेड्यातील या ग्रामीण खाद्य पदार्थांचा अस्वाद घ्यायला गावाची ओढ आणि आस निश्चितच जागृत व्हायला हवी.
COMMENTS