Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

झोपु प्राधिकरणाच्या सर्वेक्षणाला आजपासून होणार सुरुवात

मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण सोमवारपासून घाटकोपरमधील रमाबाई आंबेडकर नगरच्या पुनर्विकास प्रकल्पासाठी तेथील झोपड्यांचे सर्वेक्षण करणार आहे.

सातारा पालिकेच्या प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत घरे बांधण्याच्या निविदेमध्ये घोटाळा; उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल : सुशांत मोरे
निवडणुका घेण्याची सरकारला भीती
देशाचे सांस्कृतिक केंद्र महाराष्ट्रच राहण्यासाठी आवश्यक सुविधा देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण सोमवारपासून घाटकोपरमधील रमाबाई आंबेडकर नगरच्या पुनर्विकास प्रकल्पासाठी तेथील झोपड्यांचे सर्वेक्षण करणार आहे. रहिवाशांच्या पात्रता निश्‍चितीच्या अनुषंगाने हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) पूर्वमुक्त मार्गाचा घाटकोपर ते ठाणे असा विस्तार करणार आहे.
या विस्तारीकरणात रमाबाई आंबेडकर येथील काही झोपड्या बाधित होणार आहेत. केवळ या बाधित झोपड्यांचे पुनर्वसन न करता संपूर्ण रमाबाई आंबेडकर नगरचा, येथील 16 हजार 575 झोपड्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. या प्रकल्पास मान्यता मिळाली असून संयुक्त भागीदारी तत्त्वावर एमएमआरडीए आणि झोपु प्राधिकरणाकडून हे पुनर्वसन केले जाणार आहे. झोपड्यांचे सर्वेक्षण, पात्रता निश्‍चिती, झोपड्या रिकाम्या करणे, जागा मोकळी करून देणे आणि पुनर्वसित इमारती ताब्यात घेत पात्र रहिवाशांना घरांचा ताबा देणे ही कामे झोपु करणार आहे. तर इमारतींच्या बांधकामाची संपूर्ण जबाबदारी एमएमआरडीएवर असणार आहे. 5 मार्चला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एमएमआरडीए आणि झोपु प्राधिकरणात संयुक्त करार झाला आहे. करार झाल्याने झोपु प्राधिकरणातर्फे आता रमाबाई आंबेडकर नगरातील झोपड्यांच्या सर्वेक्षणास सोमवारपासून सुरुवात होईल, अशी माहिती झोपुतील वरिष्ठ अधिकार्‍याने दिली. 2016 मध्ये समूह सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत येथील 16 हजार 575 झोपड्यांचे सर्वेक्षण आणि रहिवाशांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण झाले आहे. आता या आठ वर्षांत झोपड्यांचे खरेदी-विक्री व्यवहार झाले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे याबाबतचे सर्वेक्षण करून रहिवाशांची पात्रता निश्‍चिती केली जाणार असल्याचेही या अधिकार्‍याने सांगितले. हे सर्वेक्षण पूर्ण होण्यास एक ते दीड महिना लागण्याची शक्यता आहे.

COMMENTS