निवडणूक अधिकार्‍याला हाताशी धरून सोसायट्या जिंकल्या

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निवडणूक अधिकार्‍याला हाताशी धरून सोसायट्या जिंकल्या

प्रा. शशिकांत गाडे यांचा शिवाजी कर्डिलेंचे नाव न घेता आरोप

अहमदनगर/प्रतिनिधी : यापूर्वीच्या काळात नगर तालुक्यातील विविध सोसायट्यांच्या निवडणुकीत निवडणूक अधिकार्‍याला हाताशी धरून व आमची मते बाद करून सोसायट्या

प्राचार्य शंकरराव अनारसे यांचे  शब्दवैभव पुस्तक संस्कारशील
पुतळा दुर्घटनेप्रकरणी कोपरगावात मविआच्या वतीने निषेध
नगरच्या स्वामी समर्थ मठात उद्यापासून धार्मिक उपक्रम

अहमदनगर/प्रतिनिधी : यापूर्वीच्या काळात नगर तालुक्यातील विविध सोसायट्यांच्या निवडणुकीत निवडणूक अधिकार्‍याला हाताशी धरून व आमची मते बाद करून सोसायट्या ताब्यात घेण्याचे काम मागच्या आमदारांनी केले, असा आरोप शिवसेनेचे दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी येथे केले. यापूर्वी या मतदारसंघात कामे केवळ कागदावरच होती व आम्ही वर्तमानपत्रातून या कामाच्या जाहिराती पाहत होतो. कामांची बिले निघत होती. मात्र, प्रत्यक्ष रस्ते झाले ते मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या कारकीर्दीत, असा आवर्जून उल्लेखही त्यांनी केला.
नगर तालुक्यातील पोखर्डी येथे मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या विशेष निधीतून 3 कोटी 66 लाख 50 हजार रुपयांच्या विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन राहुरीच्या माजी नगराध्यक्ष डॉ. उषाताई तनपुरे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रा. गाडे बोलत होते. यावेळी नगरचे प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, दिलीप सातपुते, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सीताराम काकडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रोहिदास कर्डिले, धनगरवाडीचे सरपंच किशोर शिकारे, किशोर बेरड, भाऊ कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य रघुनाथ झिने, दत्तात्रय ससे, डॉ.चौरे, उपसरपंच विजय कराळे उपस्थित होते. यावेळी प्रा. गाडे म्हणाले, निवडणूक अधिकार्‍याला हाताशी धरून सोसायट्या जिंकण्याच्या या राजकारणात आम्हाला आठ सोसायटी गमवावा लागल्या. तसेच मार्केट कमिटीच्या निवडणुका असोत वा अन्य सोसायट्यांच्या निवडणुकांतून विरोधी पॅनलच्या उमेदवारांना दमदाट्या केल्या जायच्या, असे स्पष्ट करून प्रा. गाडे हे कर्डिलेंचे नाव न घेता म्हणाले, तुम्ही जर पंचवीस वर्षे या मतदारसंघाचे आमदार होतात, जनतेची विकास कामे केली असती तर दमदाटी करण्याची वेळ आली नसती. दूधवाल्यांचे आमदार म्हणून एकीकडे भाषणे करतात व दुसरीकडे दूध संघाची जागा विकतात, मार्केट कमिटीचे वाटोळे यांनीच केले, सर्वसामान्यांच्या हातातून साखर कारखाना यांनीच हिसकावला, असा टोला मारून आगामी काळात मार्केट कमिटीच्या निवडणुकीत आम्ही पॅनल उभे करणार असून ते नक्की निवडून येईल आणि नगर-राहुरी मतदार संघात जोपर्यंत बदल होत नाही, तोपर्यंत प्राजक्त तनपुरे हेच येथे आमदार राहतील अशी ग्वाही प्रा.गाडे यांनी दिली. प्रास्ताविक सरपंच रामेश्‍वर निमसे यांनी केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी ढवळे, स्वाती चौरे, बाळासाहेब कराळे, जगन्नाथ निमसे, मगर, केशव बेरड, राम कदम, युसूफ भिंगारदिवे, सचिन पालवे, संजय मगर, विजय दाणी, अक्षय रोहिदास कर्डिले आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्राध्यापक गणेश भगत यांनी तर आभार ग्रामपंचायत सदस्य शिवाजी ढवळे यांनी मानले.

आता काळ बदलला आहे
आता काळ बदलला आहे. पूर्वीचे धाकदपटशा दाखवण्याचे दिवस संपले. आता जनता हुशार झाली आहे. या मतदारसंघातील जि.प.-पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये गेल्या 15 वर्षापासून आम्हाला 75 टक्के मतदान होत आहे. आगामी निवडणुकीत जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या सर्वच्या सर्व जागा महाविकास आघाडीचे जिंकेल असा विश्‍वास प्रा. गाडे यांनी व्यक्त केला.

COMMENTS