Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘स्मार्ट सिटी’चे केवळ गाजर; नांदेडमधील सीसीटीव्ही कॅमेरे गायब, कोट्यवधींच्या खर्चाचा हिशोब कुठे?

नांदेड : शहराला ‘स्मार्ट सिटी’च्या दिशेने नेण्याच्या नावाखाली काही वर्षांपूर्वी मोठ्या गाजावाजात बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे आज पूर्णपणे गा

आरक्षणामुळे माझ्या हत्येचा कट ः मनोज जरांगे
शेवगाव शहरात सायकल फेरी काढून मतदान जागृती अभियान
Karamala : बलात्काऱ्याला फाशीच्या शिक्षेची केली मागणी (Video)

नांदेड : शहराला ‘स्मार्ट सिटी’च्या दिशेने नेण्याच्या नावाखाली काही वर्षांपूर्वी मोठ्या गाजावाजात बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे आज पूर्णपणे गायब झाल्याचे चित्र समोर आले आहे. लाखो रुपयांचा खर्च करून उभारलेली ही यंत्रणा सध्या अस्तित्वात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, या प्रकल्पाच्या खर्चाचा आणि साहित्याचा हिशोब सार्वजनिक करण्याची मागणी जोर धरत आहे.
काही वर्षांपूर्वी नांदेड शहरातील प्रमुख चौक, रस्ते आणि संवेदनशील ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. रस्त्यांच्या मध्यभागी किंवा चौकातील चारही बाजूंना उभारलेल्या पोलवर हे कॅमेरे लावण्यात आले होते. या संपूर्ण प्रकल्पासाठी महापालिकेच्या तिजोरीतून मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करण्यात आला होता. त्याचबरोबर पोलीस अधीक्षक कार्यालयात स्वतंत्र कंट्रोल रूम उभारण्यात आल्याचेही सांगण्यात आले होते. या उपक्रमाचे त्या काळात प्रसारमाध्यमांतून मोठे कौतुक झाले होते. मात्र, काही काळानंतर हेच कॅमेरे विविध कारणांनी चर्चेत आले. अनेक कॅमेरे बंद पडल्याच्या तक्रारी समोर आल्या, तर काही कॅमेरे वेळीअवेळी सायरनसारखा आवाज करत असल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत होता. हळूहळू ही यंत्रणा निष्क्रिय होत गेली आणि अखेर अनेक ठिकाणांवरील कॅमेरे पूर्णपणे गायब झाल्याचे दिसून आले. दरम्यान, दोन ते तीन वर्षांपूर्वी शहरातील प्रमुख रस्त्यांच्या सुधारणेसाठी मोठ्या प्रमाणावर कामे हाती घेण्यात आली. या कामांदरम्यान रस्त्यांच्या मध्यभागी असलेले पथदिव्यांचे खांब काढून टाकण्यात आले. त्यासोबतच त्या खांबांवर बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरेही हटविण्यात आले. मात्र, रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर पुन्हा कॅमेरे बसविण्याबाबत कोणतीही हालचाल झालेली दिसत नाही. काही ठिकाणी नवीन वीजखांब उभारण्यात आले असले तरी त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले नाहीत. यामुळे शहरातील ते जुने कॅमेरे नेमके गेले कुठे? असा प्रश्‍न आता नागरिक विचारत आहेत. या प्रकल्पावर एकूण किती खर्च झाला, त्यातून खरेदी केलेले साहित्य कुठे आहे, तसेच त्याची जबाबदारी कोणाची याबाबत स्पष्टता नसल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्मार्ट सिटीच्या दृष्टीने नव्याने आधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. या उपक्रमासाठी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी पुढाकार घेतल्याचे सांगितले जात आहे. शहराच्या सुरक्षिततेसाठी ही बाब अत्यंत महत्त्वाची मानली जात असली तरी, यापूर्वीच्या प्रकल्पातील त्रुटी आणि खर्चाचा हिशोब समोर येणे तितकेच आवश्यक असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या योजनेचा झालेला र्‍हास आणि त्यातील अनियमिततेचे आरोप लक्षात घेता, प्रशासनाने याबाबत सविस्तर चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी, अशी जोरदार मागणी आता पुढे येत आहे.

COMMENTS