Homeताज्या बातम्यासंपादकीय

ओबीसी फॅक्टर आणि लाडक्या बहिणींचा कौल !

राज्यात विधानसभा निवडणुकीत मतदानोत्तर चाचण्यांच्या अपेक्षेप्रमाणे महायुतीला कौल मिळाला असून, पुन्हा एकदा महाविकास आघाडीला जनतेने नाकारल्याचे दिसू

माजी सरन्यायाधीशांचा बाणेदारपणा
गाफील राहू नका
मरण स्वस्त होत आहे…

राज्यात विधानसभा निवडणुकीत मतदानोत्तर चाचण्यांच्या अपेक्षेप्रमाणे महायुतीला कौल मिळाला असून, पुन्हा एकदा महाविकास आघाडीला जनतेने नाकारल्याचे दिसून येत आहे. खरंतर महाविकास आघाडीला आपण सत्ता स्थापन करू असे दिवास्वप्न पाहत होती, मात्र त्यांचे हे दिवास्वप्न पूर्णपणे अपयशी ठरले. वास्तविक पाहता लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडी हवेत होती. आपण सर्वाधिक जागा मिळवून पुन्हा सत्तेत येवू, त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांना देखील आपण मुख्यमंत्री पुन्हा होवू असे स्वप्न पडत होते. मात्र महाविकास आघाडीच्या प्रचाराची दिशा चुकली आणि त्यांच्यात कुठेही एकवाक्यता नसल्याचे दिसून आले. या निवडणुकीत महत्वाचा फॅक्टर म्हणजे ओबीसी फॅक्टर आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा कल. लोकसभा निवडणुकीपूर्वी मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या होत्या. मध्यप्रदेशात तर भाजपच्या विरोधात वातावरण होते. अशावेळी भाजपने लाडकी बहीणसारख्या योजनांची घोषणा करत त्या राज्यात सत्ता स्थापन आणली. तोच कित्ता अलीकडे हरियाणा राज्यात निर्णायक ठरला. वास्तविक पाहता महाराष्ट्रात देखील महायुतीच्या विरोधात वातावरण असतांना भाजपने जी काही रणनीती आखली ती पूर्णपणे यशस्वी ठरली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना निर्णायक ठरली, यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात घेतलेल्या सभा, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांनी केलेला झंझावाती प्रचार निर्णायक ठरला. याउलट महाविकास आघाडीकडे चेहरा नव्हता. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्याभोवती निवडणूक फिरत होती. त्यात राहुल गांधी यांची क्षमता असूनही त्यांनी महाराष्ट्रात सभा घेण्याची कुचराई केली. त्यांनी महाराष्ट्रात सभा घेण्यापेक्षा पत्रकार परिषदाच घेण्याला पसंदी दिली. यासोबतच खा. शरद पवार यांच्यावर आपल्या तब्बेतीमुळे सभा घेण्यावर बंधने होते, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी फक्त अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीका करण्याला प्राधान्य दिले. त्यामुळेच जनतेने महाविकास आघाडीला नाकारल्याचे दिसून येत आहे. मुळातच महाविकास आघाडीने लोकसभेसाठी ज्यापद्धतीने निर्णायक सभा घेतल्या, लढती दिल्या, त्यासंदर्भात महाविकास आघाडीचे कुठेही सुक्ष्म नियोजन नव्हते, असेच दिसून येत आहे. वास्तविक पाहता महायुतीने सुक्ष्म नियोजन केल्याचे दिसून आले. विशेषतः भाजपने संघाची मदत घेत, आणि विविध राज्यातील भाजपच्या नेत्यांना बोलावून घेत त्यांच्यासोबत चिंतन बैठका घेण्यात आले. त्यातून विशेष अशी रणनीती राबवण्यात आली. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आपल्या प्रचार सभेतून नेमके कोणते मुद्दे मांडायचे, यासंदर्भात देखील विशेष असे रणनीती आखण्यात आली होती. त्यामुळे महायुतीचा प्रचार जनतेला भावल्याचे दिसून येत होते. तर दुसरीकडे योगी आदित्यनाथ यांनी कटेंंगे तो बटेंगे, सारखा नारा दिला होता. तर या नार्‍याला नवाब मलिक, अजित पवारांसारख्या नेत्यांनी विरोध केला होता. त्यामुळेे महायुतीत एकवाक्यता दिसून येत नव्हती, मात्र भाजपने यातून सुवर्णमध्य काढत एक है तो सेफ है चा नारा दिला. जो या निवडणुकीत प्रभावी ठरला. राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्‍न मनोज जरांगे यांनी तीव्र केला होता. शिवाय जरांगे यांच्याकडून सातत्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर कठोर टीका आणि खालच्या भाषेत एकेरी टीका करण्यात येत होती. त्याचवेळी मराठा समाजाला सरकार जवळ करत आहे, तर ओबीसी समाजाला दूर करत असल्याची भावना ओबीसी समाजात निर्माण झाली होती. त्यामुळे ओबीसी फॅक्टर या निवडणुकीत महत्वाचा ठरला. त्यामुळेच पश्‍चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँगे्रसला पुरेसे यश मिळू शकले नाही. विदर्भात काँग्रेस चांगले यश मिळवू शकेल असा अंदाज होता, मात्र तो सपशेल चुकीचा ठरला. शिवाय मुंबईतील 36 जागांपैकी उद्धव ठाकरेंची शिवसेना किमान 15-20 जागा मिळवतील अशी अपेक्षा होती, मात्र ती देखील फोल ठरली. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचे राजकीय अस्तित्वावरच आता प्रश्‍नचिन्ह उभे राहतांना दिसून येत आहे. कारण शरद पवारांनी मला महाराष्ट्रात बदल घडवायचा असा दावा केला होता, मात्र तो फोल ठरल्याचे दिसून आले.

COMMENTS