Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

क्रांतिगुरू लहुजी साळवेंचे स्मारक प्रेरणा देणारे व्हावे

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे प्रतिपादन

पुणे ः आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे पुणे शहरात संगमवाडी येथे उभारण्यात येत असलेल्या स्मारकाच्या कामाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी

अजित पवार यांच्या विरोधात भाजप आक्रमक
ढिगार्‍याखालील जीव वाचविण्याला सर्वोच्च प्राधान्य
अर्थखाते टिकेल की नाही सांगता येत नाही

पुणे ः आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे पुणे शहरात संगमवाडी येथे उभारण्यात येत असलेल्या स्मारकाच्या कामाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला. स्मारकाच्या पायांतर्गत सुरू असलेले पायलिंगचे काम जुलैच्या सुरुवातीपर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. विधानभवन येथे याविषयी झालेल्या बैठकीस विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, मनपाचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे, मुख्य अभियंता बांधकाम युवराज देशमुख आदी उपस्थित होते.
 क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे हे सर्वांना प्रेरणा देणारे महान व्यक्तीमत्व असून त्यांचे स्मारकही समाजाला प्रेरणा आणि लाभ देणारे व्हावे. त्या अनुषंगाने सुरू असलेल्या कामाला गती द्यावी. काम सुरू असतानाच पुतळा तयार करणार्‍यांकडेही मागणी नोंदवावी. लहुजी वस्ताद यांच्या कार्याची माहिती देणारे प्रसंग साकारण्याची व्यवस्था, कौशल्य विकास प्रशिक्षण, वसतिगृह आदी कामे गतीने करावेत. कामे दर्जेदार करावीत. निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नाही, असेही ते म्हणाले. स्मारकासाठी जागेच्या अनुषंगाने काही अडचणी असल्यास जागेची मोजणी तात्काळ करुन घ्यावी. जागेसंबंधी न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्यास महानगरपालिकेने चांगल्यात चांगले वकील नेमावे. त्यासाठी वेळप्रसंगी राज्याचे महाधिवक्ता यांचीही मदत उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही पवार यांनी सांगितले.

सावित्रीबाई फुले स्मारकाची निविदा प्रक्रिया गतीने राबवा – महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेली भिडेवाडा येथील पहिली मुलींची शाळा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्याच्यादृष्टीने आवश्यक ती प्रक्रिया करुन गतीने निविदा प्रक्रिया राबवावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत दिले.हे स्मारक पार्किंग तसेच तळमजला अधिक तीन असे चार मजल्यांचे करण्याचा बैठकीत घेण्यात आला. पहिल्या किंवा दुसर्‍या मजल्यावर सावित्रीबाई फुले यांचा पुतळा, त्यांचा जीवनपट दर्शविणारे म्युरल्स किंवा चित्रमय व्यवस्था, वरील मजल्यावर त्यांच्या जीवनातील प्रसंग, कार्याची माहिती स्क्रीनवर दृकश्राव्य स्वरुपात दर्शविण्याची यंत्रणा तसेच त्यांचे लेखन साहित्य त्याशिवाय वरील मजल्यावर मुली, महिलांच्या कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण संस्था अशी व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.फुलेवाडा येथील महात्मा फुले यांच्या स्मारकाच्या विस्ताराचाही आढावा यावेळी घेण्यात आला.

COMMENTS