मराठा आरक्षणाचा मुद्दा आता राज्यातील प्रत्येक पक्षाने आपल्या राजकारणासाठी वापरण्याकरिता एक हत्यार बनविले आहे. मुळातच मराठा आरक्षणाचा विषय निर्माण
मराठा आरक्षणाचा मुद्दा आता राज्यातील प्रत्येक पक्षाने आपल्या राजकारणासाठी वापरण्याकरिता एक हत्यार बनविले आहे. मुळातच मराठा आरक्षणाचा विषय निर्माण झाला कसा, यावर मूलभूत चर्चा होणे आज अगत्याचे आहे. महाराष्ट्र राज्य १ मे १९६० यावर्षी मुंबईसह स्वतंत्र झाले. तेव्हापासून महाराष्ट्र राज्याच्या सत्तेची धुरा मराठा समाजाकडेच आहे! महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ज्यांना ओळखले जाते, त्या यशवंतराव चव्हाण यांच्यापासून राज्याची सत्ता मराठा समाजाच्या ताब्यात आहे. मराठा समाजाची राजकीय जागृती आणि गावातील असणारे संख्याबळ, यावर आधारित एकगठ्ठा मते, ही मराठा समाजाची सुरुवातीच्या काळात काँग्रेस पक्षाकडे जात होती. त्यामुळे काँग्रेसच्या माध्यमातून मराठा समाज सत्तेवर राहिला. त्यानंतर १९९९ पासून काँग्रेस मधूनच फुटून निघालेले शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्वतंत्र स्थापना केली. एवढेच नव्हे तर, त्यापूर्वी देखील भाजप-शिवसेनेची युती १९९५ मध्ये पहिल्यांदाच सत्तेवर आली आणि त्याहीवेळी पहिली चार वर्षाची टर्म सोडली तर, दुसऱ्या मुख्यमंत्री पदावर पुन्हा मराठा समाजाचेच राणे आले. हा सगळा संक्षिप्त इतिहास सांगण्याचं कारण असं की, ज्या समाजातून एवढ्या मोठ्या प्रमाणात राज्याचे मुख्यमंत्री आणि सत्ताधारी आले, त्यांनी मराठा समाजाला एक दबंग शेतकरी समाजापासून आरक्षणाची मागणी करणाऱ्या समाजापर्यंत जे रूपांतर घडवलं, ते निश्चितपणे या भूषणावह नाही. सत्तेच्या अनुषंगाने ग्रामपंचायत असेल, गावातील सहकारी सोसायटी, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका महानगरपालिका आणि त्याचबरोबर राज्य विधिमंडळ आणि राज्यातून केंद्रीय सत्तेत जाणारी लोकसभा, या सगळ्यांमधून महाराष्ट्रातून जर सर्वाधिक प्रतिनिधित्व कुणाचे गेले असेल, तर ते निश्चितपणे मराठा समाजाचे! आजही महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद हे मराठा समाजाकडेच आहे. अशावेळी प्रश्न असा निर्माण होतो की, ज्या समाजातून हे नेते आले त्यांनी आपल्या समाजाच्या उत्थानासाठी काहीच का केले नाही? त्यांनी आपल्या समाजाच्या उत्थानासाठी प्रयत्न न केल्यामुळेच आज मराठा समाजाची दोन वर्गांमध्ये विभागणी होऊ लागली आहे! सत्ताधारी आणि श्रीमंत मराठा एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला गरीब मराठा! काही वर्षांपूर्वी गरीब मराठा म्हणून रुपांतरीत झालेला हा समाज शेतकरी समाज म्हणून आपली शेती कसत होता. परंतु, त्यांच्या शेतीसंदर्भात राज्याच्या मराठा राज्यकर्त्यांना कोणतीही चांगली धोरणे राबविता आली नाहीत. परिणामी आपल्याच समाज बांधवांना त्यांनी भूमिहीन करण्यापर्यंत अवस्था गाठली. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न हा मोठ्या प्रमाणात गाजला. महाराष्ट्रातील मराठा सत्ताधाऱ्यांना आपल्याच मराठा समाजातील शेतकरी बांधवांच्या आत्महत्या रोखता आल्या नाहीत. याची नेमके कारणे तपासल्याशिवाय मराठा आरक्षणाची मागणी का निर्माण झाली याचा तपशील आपल्याला गवसणार नाही. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मराठा समाज सामाजिक दृष्ट्या जागृत झाल्यामुळे, त्याला राजकीय सत्तेची संधी मिळाली! या संधीचे सोने करण्यामध्ये मराठा सत्ताधारी वर्गाला अपयश आले आहे. त्यांच्या या अपयशी धोरणांचा परिणाम म्हणूनच प्रमुख शेतकरी वर्ग असलेला मराठा समाज आज आरक्षण मागण्याइतपत अवनत अवस्थेला पोहोचला आहे. याचे वास्तव आम्हाला एक समाज म्हणून समजून घ्यावे लागेल. यावर विश्लेषण करूनच आपल्याला मराठा समाजाच्या आरक्षणाकडे पुढे जाता येईल किंवा जावे लागेल. मराठा सत्ताधारी वर्गाने मराठा शेतकरी समाजाला अवनत अवस्थेपर्यंत आणण्याचे पातक केले. सत्ताधारी मराठा वर्गाने केलेले हे पातक शेतकरी मराठा वर्गाला समजून घ्यावे लागेल. कारण शेतकरी मराठा वर्गाला आज गरीब मराठा वर्गामध्ये रूपांतरित करण्याचे हे पातक, मराठा सत्ताधारी वर्गाने केले आहे. त्यामुळे हे वास्तव विश्लेषण समजून घेतल्याशिवाय आपल्याला आरक्षणाच्या अनुषंगाने नव्या गोष्टी करता येणार नाहीत, ही बाब महत्त्वपूर्ण आहे.
COMMENTS