यंदाच्या उन्हाळ्याचा हा शेवटचा हंगाम. अद्याप उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. प्रत्येक वर्षी उच्चांकी तापमानाचे मागील आकडे ओलांडले जात आहे
यंदाच्या उन्हाळ्याचा हा शेवटचा हंगाम. अद्याप उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. प्रत्येक वर्षी उच्चांकी तापमानाचे मागील आकडे ओलांडले जात आहेत. ग्रीष्माच्या तापाबरोबरच ग्लोबल वॉर्मिंगमुळे वातावरणात कमालीची वाढ होत असून असह्य तलखी अनुभवायला मिळत आहे. उष्णतेच्या लाटेच्या तडाख्यात येणाऱ्या भूभागांची संख्या वाढत असून पाण्याचं दुर्भिक्ष्य, जनावराच्या चारा-पाण्याचा प्रश्न तसेच पिण्याच्या आणि वापराच्या पाण्यासाठी होणारी माणसांची फरपट व पायपिट आणि मुख्य म्हणजे असह्य उन्हामुळे सोसावा लागणारा शारीरिक त्रास. यामध्ये कमालीची वाढ झाली आहे. वाढत्या उष्णतेमुळे होणाऱ्या विकारात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्याही नोंद घेण्याजोगी आहे. पूर्वी ठरावीक भागांना उन्हाचा अधिक तडाखा बसत असायचा. देशातला काही भाग या तलखीनं होरपळला जात असायचा. देशाच्या काही भागात पर्जन्यमान जास्त असतं, कुठे थंडीचा कहर अधिक असतो. त्याचप्रमाणे ठराविक भूभाग अतिउष्ण म्हणून ओळखला जाण्याचा एक काळ होता. त्या व्यतिरिक्तच्या भागात भर उन्हाळ्यातही पारा ४५ अंश सेल्सिअसच्या वर चढलेला जुन्या पिढीनं पाहिला नसेल. उन्हाळा तीव्र असणाऱ्या काळातही महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान यासारखे भाग थंड असायचे. उष्णता वाढली तरी हवेतली आर्द्रता मर्यादित असल्यामुळे तसंच प्रदुषणाचे परिणाम नसल्यामुळे पुणे, नाशिक यांसारख्या शहरांमध्ये उन्हाळ्यातही सुसह्य वातावरणाची अनुभूती मिळायची. वाळ्याचे पडदे, माठातल्या पाण्याचा गारवा, थंडावा देणाऱ्या फळांचं सेवन, आजूबाजूची दाट वृक्षवल्ली यांसारख्या निसर्गघटकांचा साधा शेजारही उन्हाळा सुसह्य करून जायचा. मात्र आता चांद्यापासून बांद्यापर्यंत उन्हाचा प्रकोप बघायला मिळत असून विदर्भ, मराठवाडा, खानदेशाप्रमाणे राज्याच्या अन्य भागांमध्येही वातानुकुलन यंत्रणेची गरज निर्माण झाली आहे. सहाजिकच वातावरणातला हा बदल अनेक दुष्परिणाम घेऊन येत आहे. त्यामुळे प्रत्येक सजीवाला याचा परिणाम भोगावा लागत आहे.
आपल्या शरीराचे तापमान साधारणपणे ९८.६ अंशाच्या जवळपास असते. शरीरातील सर्व गुंतागुंतीच्या प्रक्रिया व्यवस्थित पार पाडण्यासाठी हेच तापमान कायम ठेवणे आवश्यक असते. तापमान नियंत्रित करण्याचे कार्य मेंदूमधील हायपोथॅकॅमस नावाचा भाग करतो. उष्माघातात प्रखर तापमानामुळे शरीरातील तापमान नियंत्रित करण्याची प्रक्रिया कोलमडते व उष्माघाताची लक्षणे ही निरनिराळ्या प्रकारात व्यक्त होतात. सध्या अत्यंत कडक उन्हाळा आहे. या दिवसांत उष्माघाताच्या रुग्णांचे प्रमाण वाढते. वेळीच उपाययोजना न केल्यास रुग्ण दगावू शकतात. यासाठी आपण उष्माघाताची लक्षणे व उपाययोजना याबाबत काळजी घेणे गरजेचे असते. जागतिक तापमानवाढ 1.5 डिग्री सेल्सियसच्या खाली ठेवण्याच्या उद्दिष्टापासून जग पूर्णपणे भरकटलं आहे. आणि आता जागतिक तापमानवाढीची वाटचाल 3 डिग्री सेल्सियसकडे होत असल्याचं वैज्ञानिकांनी सांगितलं आहे. जागतिक तापमानवाढ 1.5 डिग्री सेल्सियसच्या खाली ठेवण्याचं उद्दिष्ट गाठायचं असेल तर आपल्याला ऊर्जेच्या वापराबाबत वेगवान, दूरगामी आणि अभूतपूर्व बदल करावे लागतील, असं म्हटलं जात आहे. या गोष्टीची खूप मोठी किंमत आपल्याला मोजावी लागेल. पण तितक्याच प्रमाणात आपल्याला संधी असल्याचं देखील म्हटलं जात आहे.
उन्हाळ्यामुळे उद्भवणार्या समस्यांमध्ये प्रामुख्याने अतिसारासारखे पचनक्रियेशी संबंधित आजार आणि हीट स्ट्रोक यांचा समावेश असतो.याशिवाय त्वचेसंदर्भात समस्या देखील उद्भवतात.जशी उष्णता वाढते तशी पचनक्रिया मंदावू शकते.त्याशिवाय वारंवार बाहेरचे खाणे हा शहरी जीवनशैलीमधील एक नियमित भाग झाला आहे. त्यात उघड्यावरील किंवा अस्वच्छ अन्न,द्रवपदार्थ खाण्या-पिण्यात आले की पचनाशी संबंधित आजार उद्भवतात.विशेेष करून अतिसार.त्याचे कारण असे की,अस्वच्छ किंवा दूषित अन्नावर विषाणू,जीवाणू हे जास्त वेळ टिकून राहतात.यामुळे सर्व वयोगटातील लोकांवर याचा प्रभाव पडू शकतो.विशेष करून पाच वर्षांखालील बालके आणि साठ वर्षावरील लोकांमध्ये याचा जास्त परिणाम जाणवतो. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यावर ते पुन्हा पुर्ववत आणण्याची क्षमता या वयोगटातील लोकांमध्ये कमी असल्याने परिणाम जास्त दिसून येतात. त्यामुळे प्रत्येकाने उन्हाळ्यात आपली काळजी घेत पर्यावरण संवर्धनासाठी काम केले तर उन्हाची तीव्रता कमी होण्यास मदत होईल.
COMMENTS