Homeताज्या बातम्यासंपादकीय

मतदानाचा उच्चांक !

राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान झाले असून, यंदा 1995 नंतर म्हणजेच तीन दशकानंतर मतदानाचा उच्चांक नोंदवण्यात आला. त्यामुळे खर्‍या अर्थान

लोकशाहीसमोरील आव्हाने…
आता फुले- आंबेडकर येणार नाहीत
लोकायुक्तांमुळे भ्रष्टाचार संपेल का ?

राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान झाले असून, यंदा 1995 नंतर म्हणजेच तीन दशकानंतर मतदानाचा उच्चांक नोंदवण्यात आला. त्यामुळे खर्‍या अर्थाने प्रशासनाने केलेल्या उपक्रमाने झालेली जनजागृती, मतदारांनी उत्स्फूर्तपणे केलेले मतदान, या बाबींंमुळेच महाराष्ट्रात मतदान 71.69 टक्के मतदान झाले आहे. काही महिन्यापूर्वीच झालेल्या लोकसभा निवडणुकीत 61.39 टक्के मतदान महाराष्ट्रात नोंदवण्यात आले होते. खरंतर महाराष्ट्र पुढारलेले राज्य असतांना मतदानांची घसरती टक्केवारी चिंताजनक होती. महाराष्ट्रात 2014 च्या विधानसभा निवडणुकीत 63.5 टक्के, 2009 मध्ये 59 टक्के आणि 2004 च्या विधानसभा निवडणुकीत 63 टक्के मतदान झाले होते. मात्र यंदा विधानसभा निवडणुकीचा मूडच वेगळा होता. कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी पडलेली फूट त्यामुळे प्रमुख सहा पक्ष विधानसभा निवडणुकीत होते. तसेच सत्ता परत मिळवायचा हा महायुती आणि महाविकास आघाडी या प्रमुख प्रतिस्पर्धी पक्षाने ठरवले होते. त्यामुळे आक्रमक प्रचाराला सर्वांनीच पसंदी दिल्याचे दिसून आले. त्यामुळे सर्वाधिक मतदान कसे होईल यासाठी प्रशासनासोबत राजकीय पक्षांनी देखील कंबर कसली होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत कमी झालेल्या मतदानांची कसर मतदारांनी भरून काढल्याचे विधानसभा निवडणुकीतून दिसून आले. मतदानाचा हक्क हा देशातील प्रत्येक नागरिकाला असून, तो सहजा-सहजी मिळालेला नाही. त्यामागे संघर्षाचा वारसा आहे. त्यामुळे प्रत्येकाने मतदानाचा आपला हक्क बजावण्याची गरज आहे. मात्र उदासीनता आणि प्रगत तंत्रज्ञानाचा अभावामुळे बहुतांश ठिकाणी मतदान होत नाही. मात्र किमान 75 टक्क्यांच्या पुढे तरी मतदान जायला हवे, आणि आपण त्याच्या जवळपास असल्याचे दिसून येत आहे. या निवडणुकीत प्रशासनाने बजावलेली कामगिरी कौतुकास्पद आहे. मात्र यासोबतच यंदा उमेदवारांवर हल्ले होण्याचा चिंताजनक प्रकार घडला. एखाद्या उमेदवारावर असा हल्ला झाला असता तर तो अपवादाने, काही गैरसमजूतीने झाला असता, असे वाटले असते. मात्र अनेकठिकाणी उमेदवारांवर हल्ले झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, आमदार मोनिका राजळे, भाजपच्या उमेदवाराच्या बहिणीवर चाकूने हल्ला झाला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या एका जिल्हाध्यक्षावर हल्ला झाला आहे. अनेक उमेदवारांवर हल्ले झाले. हा प्रकार लोकशाहीसाठी चिंताजनक असल्याचे दिसून येत आहे. खरंतर निवडणूक ही वैचारिक लढाई आहे. मतभेद असतात, प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा अधिकार असतो, तसाच प्रत्येकाला आपल्या विचाराच्या माणसाला मतदान करण्याचा अधिकार असतो. मात्र मतभेद इतके विकोपाला जातांना दिसून येत आहे की, थेट उमेदवारांवर हल्ले करण्याचा प्रकार घडतांना दिसून येत आहे. मतदानाला काही तास बाकी तास असताना या घटनांमुळे निवडणूक प्रक्रियेला गालबोट लागल्याचे चित्र आहे. मतदारांना आमिष देण्यासाठी रोकड, मद्य, सोने-चांदीने या वेळी महाराष्ट्रात अक्षरश: धुमाकूळ घातला. राज्यात निवडणूक आयोगाच्या भरारी पथक आणि पोलिस यंत्रणेनेे रोख रकमेसह एकूण 706 कोटी 98 लाखांचा ऐवज निवडणूक आयोगाने जप्त केला. मागील वेळी हा आकडा फक्त 103.61 कोटींपर्यंतचा होता. म्हणजेच 2019 च्या तुलनेत 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीत 7 पटीने अधिकचे आमिष मतदारांना दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण तो निवडणूक आयोगाने हाणून पाडला आहे. त्यामुळे या निवडणुकीत पैशांचा कसा पूर आला, तोदेखील बघायला मिळाला. महाराष्ट्रात नालासोपार्‍यात भाजपचे नेते विनोद तावडे यांना कथित पैसे वाटतांना पकडल्याचा आरोप होतो आहे, त्यात तत्थ किती याची माहिती चौकशीनंतरच समोर येईल. यासोबतच काँगे्रस नेते नाना पटोले आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी बिटकॉईनचा वापर निवडणुकीत केल्या आरोप त्यांच्यावर ठेवण्यात येत आहे. मात्र दोन्ही नेत्यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. तसेच याप्रकरणी गुन्हा दाखल करून मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा दोन्ही नेत्यांनी दिला आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक ऐतिहासिक असल्याचे दिसून येत आहे. त्याचा निकाल उद्या म्हणजे शनिवारी लागणार असून, त्यातून राज्यात कुणाची सत्ता येते, नवे काय समीकरणे तयार होतात, यावर पुढील राजकीय गणिते ठरणार आहेत.

COMMENTS