महापालिकेच्या भाजप-राष्ट्रवादी युतीच्या प्रचारात ‘द ग्रेट खली’चा सहभाग अहिल्यानगर : शहरातील महापालिका निवडणुकीच्या प्रचारात मंगळवारी वेगळाच उत्सा

महापालिकेच्या भाजप-राष्ट्रवादी युतीच्या प्रचारात ‘द ग्रेट खली’चा सहभाग
अहिल्यानगर : शहरातील महापालिका निवडणुकीच्या प्रचारात मंगळवारी वेगळाच उत्साह पाहायला मिळाला. जागतिक कीर्तीचे कुस्तीपटू ‘द ग्रेट खली’ यांच्या आगमनामुळे प्रचाराला मोठे बळ मिळाले. सकाळी ११ वाजता नगरमध्ये दाखल झाल्यानंतर खली यांनी सर्वप्रथम विशाल गणपतीचे दर्शन घेतले.
गणपती दर्शनानंतर गणपती मंदिर ते दिल्ली गेट या मार्गावर भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीदरम्यान द ग्रेट खली यांनी रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांशी संवाद साधत त्यांना अभिवादन केले. त्यांच्या साध्या व प्रेरणादायी शब्दांना नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. रॅलीमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी बोलताना द ग्रेट खली यांनी सध्याची राजकीय स्थिती स्पष्ट करत, अहिल्यानगर शहराची हवा ही भाजप–राष्ट्रवादी युतीच्या बाजूने झुकल्याचे वक्तव्य केले. सक्षम नेतृत्व आणि विकासाभिमुख विचारांच्या जोरावर शहराचा सर्वांगीण विकास साधता येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
खली यांनी युवकांना उद्देशून नियमित व्यायामाचे महत्त्व अधोरेखित केले. युवक शारीरिकदृष्ट्या सक्षम राहिले तर देशही सक्षम होईल. भारताला विश्वगुरू बनवायचे असेल तर आरोग्य आणि शिस्त या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, खली यांनी डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले. शहराच्या प्रश्नांवर त्यांची ठाम भूमिका असून विकासासाठी ते सातत्याने मेहनत घेत आहेत. त्यांच्या कामातून सकारात्मक बदल दिसून येत असल्यानेच या रॅलीत सहभागी झाल्याचे खली यांनी सांगितले.
द ग्रेट खली यांच्या उपस्थितीमुळे नगरमधील प्रचाराला नवी दिशा मिळाली आहे. या रॅलीत डॉ. सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप यांच्यासह भाजप–राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे उमेदवार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

COMMENTS