Homeताज्या बातम्यासंपादकीय

विरोधकांच्या निवडीमुळे सरकारचा टेकू संभ्रमात !

काल मुंबईत मुसळधार पाऊस; अर्थात तीन दिवसापासून संतत पावसाची धार सुरू असल्यामुळे, काल मुंबईचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं मुंबईची लोकल सेवा जी अ

बिग बॉसच्या घरात पडणार पैशांचा पाऊस
बचत गट प्रदर्शनीची जय्यत तयारी 
नाल्यात पडून 15 वर्षांची मुलगी गेली वाहून.

काल मुंबईत मुसळधार पाऊस; अर्थात तीन दिवसापासून संतत पावसाची धार सुरू असल्यामुळे, काल मुंबईचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं मुंबईची लोकल सेवा जी अप दिशेने म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस च्या दिशेने जाते, त्या तिन्ही लाईनच्या सेवा अर्ध्यातून ठप्प झालेल्या होत्या; अशा प्रकारची अवस्था २६ जुलै नंतर प्रथमच मुंबईमध्ये दिसून आली. अर्थात, हा पाऊस अतिवृष्टीपेक्षाही जास्त म्हणता येईल, असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. मुंबईचे हे जनजीवन विस्कळीत होण्याला मिठी नदीचा गाळ काढण्यातील बाबीही हातभार लावून गेल्या, अशी एक कोपरखळी देखील मुख्यमंत्र्यांनी आपल्या वक्तव्यातून मांडली. याच दरम्यान देशाच्या उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणुकीत इंडिया आघाडीने आपले उमेदवार म्हणून, सर्वोच्च न्यायालयातील माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांची निवड केली. ही निवड इंडिया आघाडीतील सर्व पक्षांनी मिळून एकमताने केली, असा दावा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बी सुदर्शन रेडी यांचं नाव जाहीर करणाऱ्या पत्रकार परिषदेत केला. अर्थात, नेहमीप्रमाणेच ममता बॅनर्जी आणि डीएमके या पक्षाचा काही आक्षेप होता का, या संदर्भात माहिती देताना सूत्रांनी हेच म्हटलं की, ममता बॅनर्जी यांनी उमेदवार हा राजकारण बाह्य असावा, अशी अट घातली होती. तर, डीएमकेने उमेदवार हा दक्षिण भारतीय असावा अशी अट घातली होती. त्यामुळे उमेदवार ठरवताना प्रामुख्याने दक्षिण भारतीय उमेदवारच उपराष्ट्रपतीपदासाठी इंडिया आघाडीने देणे पसंत केलं. यामुळे सर्वाधिक अडचण झाली ती म्हणजे एनडीए आघाडीतील सर्वात मोठा टेकू असलेल्या किंबहुना सत्तेचा टेकू असलेल्या चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगु देशमची. तेलगु देशम वर आता हे संकट आलेले आहे की, राज्याची व्यक्ती उपराष्ट्रपतीपदासाठी असताना आणि ज्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व अगदी आदरणीय राहिलेले आहे, अशा व्यक्तीला पाठिंबा न देणं, हे देखील त्यांना नुकसानदायक आहे. विरोधी पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी जर त्यांनी सत्ताधारी आघाडीची साथ सोडली, तर तेही त्यांच्यासाठी सध्याच्या काळात तरी अडचणीचे आहे, असं वाटतं! परंतु, या निवडणुकीतून एकंदरीत ही बाब देखील स्पष्ट होईल की, केंद्रामध्ये आता पक्षांची जी आघाडी आहे त्यामध्ये आता बिघाडी व्हायला सुरुवात होते की काय, अशी लक्षणे निश्चितपणे दिसून येतील. विरोधी पक्षांनी उपराष्ट्रपती पदासाठी जो उमेदवार निवडला, तो उमेदवार चुरस निर्माण करणारा आहे, हे मात्र नाकारता येत नाही. अर्थात, उमेदवारी जाहीर करण्याच्या मागे ज्या प्रमुख बाबी आहेत, हे सांगताना मल्लिकार्जुन खरगे यांनी असं म्हटलं की, बी सुदर्शन रेड्डी हे विरोधी आघाडीचे सर्वानुमते ठरलेले उमेदवार आहेत; शिवाय, त्यांचा इतिहास एक चांगले न्यायमूर्ती म्हणून राहिलेला आहे. ज्यांची कारकीर्द आंध्र प्रदेश हायकोर्ट तर गुहाटी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदी आणि त्याचबरोबर देशाच्या सर्वोच्च न्यायालयातही न्यायाधीश पदी राहिलेले आहेत. शिवाय त्यांचा जो दृष्टिकोन आहे, तो सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय देण्याचा राहिलेला आहे, असे देखील खरगे यांनी यावेळी म्हटलं. बी. सुदर्शन रेड्डी यांच्या अनेक निर्णयांमध्ये गरीब जनतेच्या बाजूने निर्णय दिल्याचेही वक्तव्य मल्लिकार्जुन खरगे यांनी केले आहे.  जनहित याचिकांवर त्यांनी मोठ्या प्रमाणात कामही केलेले आहे. बी सुदर्शन रेड्डी यांची निवड करताना विरोधी इंडिया ब्लॉकने विचारपूर्वक आणि तितकंच उपराष्ट्रपतीपदासाठीची लढत रंगतदार होईल किंवा चुरशीची होईल, अशा पद्धतीने नाव बाहेर आणलेले आहे. चंद्राबाबू नायडू हे विरोधी पक्षाचे उमेदवार आंध्रप्रदेशचे असल्यामुळे त्यांना पाठिंबा देतीलच, असं नाही! परंतु, त्यांनी पाठिंबा दिला नाही तरी त्याची झळ त्यांच्या पक्षाला निश्चितपणे बसेल, हे देखील नाकारता येत नाही. २१ ऑगस्ट रोजी बी सुदर्शन रेडी यांचा उमेदवारी अर्ज विरोधी पक्ष दाखल करणार आहे.  ९ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची ही निवडणूक होईल. यामध्ये राज्यसभा, लोकसभा सदस्य ज्यांची एकूण संख्या 782 आहे, हे उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारांसाठी मतदान करतील. दरम्यान, कालच सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये घोळ झाल्यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष चेतन अहीरे यांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयात फेटाळण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने देखील उच्च न्यायालयाने जी कारणे यासाठी सांगितली होती, तीच कारणे कायम ठेवून ही याचिका फेटाळली. अर्थात, या याचिकेमध्ये जे पुरावे आहेत ते वर्तमानपत्रांच्या बातम्यांमधून आणि दिल्लीतील एका आरटीआय कार्यकर्त्याच्या एका माहिती अधिकारातून पुढे आलेल्या माहितीवर आधारित असलेली ही याचिका होती; त्यामुळे संपूर्ण राज्याच्या निवडणुकीला आव्हान देणारी ही याचिका ठरू शकत नाही; असं निरीक्षण पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी नोंदवले आहे. परंतु, जनतेच्या न्यायालयात आम्ही मात्र हा विषय पोहोचविण्यासाठी यशस्वी झाला आहोत, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केलं.

COMMENTS