नाशिक : राज्य शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेने अनेक भगिनींना हक्काचा आधार दिला. बँक खात्यात आलेल्या रकमेतून आपल्या स्वप
नाशिक : राज्य शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेने अनेक भगिनींना हक्काचा आधार दिला. बँक खात्यात आलेल्या रकमेतून आपल्या स्वप्नपूर्तीसाठी या योजनेतून मिळालेल्या रकमेचा विनियोग करता येईल, अशी भावना आज मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानासाठी आलेल्या बहिणींनी व्यक्त केली. मुख्यमंत्री आणि राज्य शासनाच्या मागे आम्हां बहिणींच्या आशीर्वादाचे बळ नक्की असेल, अशा विश्वासही त्यांनी दिला.
कार्यक्रमाच्या निमित्ताने तपोवन परिसरातील मोदी मैदान येथे हजारोंच्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद त्यांच्यातील आत्मविश्वास दर्शवत होता. आता आम्हीही कुणावर अवलंबून नाही, आमच्या लाडक्या भावाने आम्हाला आमचे हक्काचे पैसे दिले, ही भावना होती. त्यातून आलेला आनंद त्यांच्या देहबोलीतून व्यक्त होत होता. कुणी फेरनृत्याद्वारे, कुणी फुगडी खेळून तर कुणी हात उंचावून त्यांची आत्मनिर्भरता दर्शवित होत्या. त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.
रक्षाबंधनचा सण गोड झाला – मोनाली खैरनार – मालेगाव तालुक्यातील वडगाव येथील मोनाली खैरनार यांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाल्याचा आनंद त्यांच्या डोळ्यात दिसत होता. ‘गेल्या आठवड्यात रक्षाबंधनच्या एक दोन दिवस आधीची घटना. सण जवळ आला होता, पण हातात पैसे नव्हते, खूप चणचण होती, मुलीला कपडे घ्यायचे होते, राख्या खरेदी केलेल्या नव्हत्या आणि इतक्यात…माझ्या फोनवर बँक खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाल्याचा मेसेज आला….!” आणि माझी चिंता मिटली….’ अशा शब्दात भावना व्यक्त करताना त्यांच्या डोळ्यात आसवांनी गर्दी केली होती. मोनाली खैरनार यांच्यासारख्याच नाशिक जिल्ह्यातील लाखो महिला लाडक्या बहिणी ठरल्या आहेत. त्यातील काही मोजक्या भगिनींच्या या बोलक्या आणि तितक्याच हळव्या प्रतिक्रिया….
सोन्यासारख्या भावाची सोनेरी आठवण – पुण्याबाई गुंड – ताई मला खूप बोलता तर येत नाही आणि कॅमेरा समोर तर अजिबात नाही. पण तोडकंमोडकं का असेना मला तुम्हांला काही सांगायचे. प्रत्येक सणाला ठरवते की, स्वतःला सोनं करू. घरातील गरजा आणि अडचणींमध्ये नेहमी राहून जाते. पण या रक्षाबंधनाच्या सणाला माझा लाडक्या भावाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून तीन हजार जमा केले आणि माझी इच्छा पूर्ण झाली. आज मी सगळ्यांना कौतुकाने सांगते लाडकी बहीण योजनेच्या पैशातून डोरलं केलं, अशा शब्दात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पेगलवाडी गावातील पुण्याबाई गुंड यांनी आपल्या भावना मांडल्या.
भेट भावाची, ठेव मुलांच्या भविष्याची – निलोफर खान – ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनापासून आभार मानते. या योजनेचा अर्ज करताना मला कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही. माझ्या खात्यात बरोबर तीन हजार रुपये जमा झाले. या योजनेतून मिळालेले पैसे भावाची भेट म्हणून माझ्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी वापरणार आहे, अशी भावना व्यक्त केली नाशिक रोड गोरेवाडी येथील निलोफर खान यांनी.
महिलांच्या अनेक योजनांची शिदोरी शासनाकडून भेट – गीतांजली माळोकर – शासनाने केवळ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ दिला नसून महिलांना अनेक कल्याणकारी योजनांची शिदोरी दिली. या योजनांच्या मदतीने आम्ही आमचे आरोग्य, शैक्षणिक आणि आर्थिक गरजा पूर्ण करणार आहोत. शासनाचे मनापासून आभार, अशी भावना येवला तालुक्यातील गीतांजली माळोकर यांनी व्यक्त केली.
संसाराला हातभार लाभला – स्वाती फसाळे – मी आधी काटकसर करून पैसे साठवत होते. आता माझ्या बँक खात्यातच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आले. या पैशांची संसाराला मदत होईल. माझ्यासाठी, माझ्या परिवारासाठी हे पैसे अडचणीच्या काळात नक्की उपयोगी पडतील. बाजारात गेल्यावर घरासाठी, मुलांसाठी, स्वतःसाठी खरेदी करताना आता हात आखडता नसेल. या पैशातून मी सासू-सासऱ्यांची औषधे घेईन…हे बोल आहेत स्वाती फसाळे महिला भगिनीचे!
COMMENTS