समस्येचे नशीब

Homeताज्या बातम्यासंपादकीय

समस्येचे नशीब

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात दोन दशकापूर्वी स्रियांमध्ये भांडण करण्याची एक परंपरा होती. ती आज शिक्षणामुळे दुर्मिळ झाली हे खरे पण खेडेगावात सकाळी उठल

ओबीसी आरक्षण आणि राज्य सरकारची नाचक्की
‘एमआयएम’ आणि आघाडीचा अन्वयार्थ
एसटीचा तिढा सुटणार का ?

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात दोन दशकापूर्वी स्रियांमध्ये भांडण करण्याची एक परंपरा होती. ती आज शिक्षणामुळे दुर्मिळ झाली हे खरे पण खेडेगावात सकाळी उठले की, शेजारी- शेजारी राहणाऱ्या स्त्रीयांमध्ये भांडण- तंटे हे रोजचेच होते. ते कधी नळाचे पाणी भरण्यावरून असायचे तर कधी कुत्र्या- मांजरावरून असायचे. कधी- कधी या भांडण तंट्याचे रूपांतर हाणामारीत व्हायचे हे तिशीच्या पुढच्या सर्वानी पाहिलेले आहे. दोन किंवा त्यापेक्षा अधिक महिलांचे सकाळचे भांडण म्हणजे इतर शेजाऱ्यांसाठी मनोरंजन असायचे. या महिला तेव्हा भांडण करतांना एकदुसऱ्याच्या झिंज्या (डोक्याचे केस) धरून लूचीत (खाली पडून केस ओढणे) असत. या भांडणात अस्सल मराठमोळ्या शिव्यांचा प्रयोग होत असायचा. त्याचप्रमाणे आरोप- प्रत्यारोप हे रोजचेच असायचे. या भांडणांतील एक शिवी म्हणजे, ‘सटवे’ ही. सटवाई नावाची जी देवी असते ती माणसाचे नशीब लिहिते असे जातक कथांमध्ये आहे. त्यामुळे त्या देवीच्या नावे प्रचलित असलेली ही शिवी.

अलीकडे ग्रामीण भागात आणि शहरी भागात शिक्षणाच्या प्रसारामुळे असे भांडण- तंटे दुर्मिळ झाले आहेत हे खरे. पण त्याची जागा आता गल्ली ते दिल्लीच्या राजकारण करणाऱ्या नेत्यांनी घेतलेली दिसते. आपण जर राज्याच्या राजकारणाकडे बारकाईने पाहिले तर एकही नेता असा नाही की, तो इतर पक्षातील दुसऱ्या नेत्यावर टिका करत नाही. रोजच्या माध्यम व्यवस्थेतून हे भांडणे आणि आरोप प्रत्यारोप आपल्याला समजतात. अशा भांडणात अपवादात्मक किरीट सोमय्या सारख्याना लुचले जाते. हे लुचण्याचे कार्यक्रम गटबाजीचे राजकारण करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळते पण त्यासाठी निवडणुकीचे किंवा इतर निमित्त लागत असते. असे निमित्त या- ना त्या कारणाने कार्यकर्त्यांना नेहमी मिळत असते. पण, राज्यात नेतृत्व करणाऱ्या सर्वच पुढाऱ्यांमध्ये आरोप- प्रत्यारोपाची हमारी, तुमरी सुरूच असते.

यत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर टीका काल अशीच टिका केली आहे. त्यांनी शरद यांना सल्ला देत  पवारांनी आडनाव बदलून ‘आगलावे’ लावावं असं सदाभाऊ म्हणाले आहेत. “शरद पवार हे महान नेते आहेत. त्यांनी या राज्यामध्ये काड्या करण्यापलीकडे काही केलं नाही. जाईल तिथं आग लावायची आणि दुसऱ्या घराला परत आग लावायला निघून जायचं. पवारांचं सर्व आयुष्य हे आग लावण्यामध्येच गेलं आहे. त्यामुळे त्यांनी पवार हे आडनाव बदलून ‘आगलावे’ करावं. हे राज्य होरपळून निघालं असून आता हे थांबलं पाहिजे,” अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे. ती योग्यच. पण शरद पवार ज्या साखर कारखानदारांच्या जीवावर राजकारण करतात त्या साखर कारखानदाराला ऊस पुरवणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जिवावर सदाभाऊ खोत राजकारण करतात हेही सत्यच आहे. म्हणजे, या दोन्ही नेत्यांच्या राजकारणाच्या मुळाशी ‘ऊस’ आहे. त्यामुळे  ज्यांचे ऊसावर राजकारण आहे आणि ज्यांचे ऊसावर राजकारण नाही ते यांचे रोज आरोपाचे- प्रत्यारोपाचे गुऱ्हाळ सुरूच असते.

या ऊस आणि साखर- कारखाना याच्या राजकारणात होणारे आरोप किंवा घोटाळे महाराष्ट्राला नवीन नाहीत. जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना प्रकरणामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना न्यायालयाने मोठा धक्का दिला असल्याची माहिती भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी माध्यमाला दिली. या प्रकरणात न्यायालयाने सक्तवसुली संचालनालयाकडून जप्त करण्यात आलेल्या संपत्तीवर शिक्कामोर्तब केल्याचं सोमय्यांनी सांगितलं. तसेच आता हा कारखाना पुन्हा शेतकऱ्यांच्या ताब्यात द्यावा अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. आता हे पण एकप्रकारचे राजकीय भांडणाचं आहे. फरक एवढाच आहे की, किरीट ज्या पक्षात आहेत त्या पक्षाचे केंद्रात सरकार आहे. त्यामुळे ईडी आणि राज्यातील भाजप नेते यांचे अधिकारांचे जवळचे नाते आहे. त्यामुळे ईडी कुणावर कारवाई करणार हे केंद्रीय नात्यामुळे भाजप नेत्यांना माहित असते. पण, मागे पवार कुटुंबाकडे जेव्हा ईडी चौकशीसाठी आली होती तेव्हा ‘पाहुणे घरी आले आहेत. पाहुणचार करून ते वाटे लावले’ या शरद पवारांच्या विधानावरून एक बोध निघतो की, हे सारे एकमेकांचे राजकीय नातेवाईक आहेत. आणि सारे एकाच माळेचे मणी. या सर्व धोरणकर्त्यांकडून जे देशात आणि राज्यात राजकारण सुरु आहे ते रक्ताच्या नातेसंबंधात आहे किंबहुना विचारांच्या नातेसंबंधात आहे. रक्ताच्या नातेसंबंधात म्हणजे, प्रत्येक जिल्ह्यातील मतदार संघातील प्रस्तापित संस्थानिकांकडे आणि त्यांच्या जवळच्या नातेवाईकांकडे तेथील सर्व तऱ्हेची सत्ता असते. ज्या मतदार संघात ज्या कुटुंबाकडे कित्तेक वर्षांपासून सत्ता असते तेथील पंचायत समिती, बाजार समिती, दूध संस्था, जिल्हा परिषद, जिल्हा बँक, इतर सहकारी संस्था, शिक्षण संस्था या प्रस्तापित राज्यकर्त्यांच्या नातेसंबंधात असतात. त्या कायम ठेवण्यासाठी किंबहुना त्यांनी जमवलेली वैध- अवैध मालमत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांना सत्तेची गरज असते. ते कुठूनही आणि कशीही सत्ता मिळवतात हे सत्य. त्यासाठी पक्षांतर, आरोप- प्रत्यारोप हे सारे सुरु असते. राज्याच्या किंवा देशाच्या विकासाच्या गोंडस आश्वासनाखाली हे स्वतःचा आणि स्वतःच्या नातेवाईकांचा विकास करतात. हे मतदारांच्या लक्षात येत असले तरी मतदार प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवत नाहीत. त्याला कारण आहे जात. प्रत्येक मतदार हा जातीच्या किंवा धर्माच्या उमेदवाराला मतदान करत असतो हे सत्य. या जातीचे किंवा धर्माचे राजकारण मतदारांनी हाणून पाडणे क्रमप्राप्त. भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीय व्यक्तीचे नशीब लिहून ठेवलेले आहे. पण हे कळतंय कुणाला? वास्तव हे आहे की, मतदाराला हवे आहेत भ्रष्ट सटवे धोरणकर्ते. या सटव्यानी जनतेच्या कपाळी लिहिले आहे समस्येचे नशीब.

COMMENTS