मंदिर समितीचा ऐतिहासिक निर्णय : मनोरंजन, आकाशपाळणे व दुकाने बंदतामसा । प्रतिनिधीमराठवाड्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासह शेजारील राज्यांत प्रसि

मंदिर समितीचा ऐतिहासिक निर्णय : मनोरंजन, आकाशपाळणे व दुकाने बंद
तामसा । प्रतिनिधी
मराठवाड्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासह शेजारील राज्यांत प्रसिद्ध असलेला तामसा (ता. हदगाव) येथील बारालिंग भाजी-भाकर महाप्रसाद यंदाही मकर संक्रांतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणार आहे. मात्र, यात्रेचे स्वरूप बदलत केवळ महाप्रसादाचे मर्यादित वितरण करण्याचा ऐतिहासिक निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. त्यामुळे यावर्षी कोणतीही पारंपरिक यात्रा, मनोरंजनाचे कार्यक्रम, आकाशपाळणे तसेच दुकाने लावली जाणार नाहीत.
तामसा येथे गेल्या सुमारे दीडशे वर्षांपासून रामायणकालीन परंपरेनुसार बारालिंग देवाच्या यात्रेनिमित्त भाजी-भाकर महाप्रसादाचे आयोजन केले जाते. या महाप्रसादाला मराठवाडा, विदर्भासह आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक येथूनही भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. मात्र, गतवर्षी यात्रेदरम्यान काही असामाजिक तत्वांमुळे दोन गटांत वाद होऊन गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. त्या पार्श्वभूमीवर यावर्षी कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी व भाविकांची सुरक्षितता राखली जावी, यासाठी मंदिर समितीने हा कठोर पण आवश्यक निर्णय घेतला आहे.
यात्रेऐवजी केवळ महाप्रसाद
यावर्षी यात्रेच्या नावाखाली कोणतेही मनोरंजनाचे कार्यक्रम, आकाशपाळणे, हॉटेल्स, लहान-मोठे स्टॉल, पूजेचे साहित्य, बेलफूल, नारळ यांची दुकाने लावू नयेत, असे स्पष्ट आवाहन मंदिर समितीने केले आहे. कोणत्याही प्रकारचा व्यावसायिक जमाव होऊ नये, हाच या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे.
भाजी-भाकर महाप्रसादाची भव्य तयारी
या महाप्रसादासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही सुमारे 150 क्विंटल ज्वारीच्या भाकर्या आणि 450 क्विंटल भाजी शिजवून प्रसाद स्वरूपात वाटप केले जाणार आहे. तामसा व परिसरातील ग्रामीण भागातून नागरिक ज्वारीच्या भाकर्या बनवून मंदिरात अर्पण करतात. तसेच रानमेवा, फळ-फुले, कंदमुळे, बोर, विविध भाजीपाले यांचे मिश्रण करून दोन ते तीन विशाल कढईंमध्ये भाजी शिजवली जाते. भाविक रांगेत उभे राहून हातात दोन भाकर्या व भाजी असा महाप्रसाद ग्रहण करतात.
सर्वधर्मीय एकात्मतेचे जिवंत उदाहरण
या भाजी-भाकर महाप्रसादाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वधर्मीय सहभाग. हिंदूंसह मुस्लिम, बौद्ध समाजातील भाविकही या महाप्रसादासाठी आपले आर्थिक व शारीरिक योगदान देतात. या पंगतीत कोणताही भेदभाव नसून सर्वधर्म समभाव आणि सामाजिक एकात्मतेचे उज्वल दर्शन येथे पाहायला मिळते. याच परंपरेमुळे हा महाप्रसाद लाखो भाविकांना आकर्षित करतो. मंदिर समितीच्या या निर्णयाचे अनेक स्तरांतून स्वागत होत असून, शांतता, श्रद्धा आणि परंपरेला प्राधान्य देत भाजी-भाकर महाप्रसादाची शुद्ध धार्मिक परंपरा जपण्याचा संकल्प तामसावासीयांनी पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे.

COMMENTS