भारतीय लोकशाही समोर आज उभे ठाकलेल्या अरिष्टाची पायाभरणी सन १९९१ मध्ये काँग्रेसनेच केली यास लोकशाही मानणारा कोणताही सुज्ञ माणूस नकार देणार नाही. याबरो
भारतीय लोकशाही समोर आज उभे ठाकलेल्या अरिष्टाची पायाभरणी सन १९९१ मध्ये काँग्रेसनेच केली यास लोकशाही मानणारा कोणताही सुज्ञ माणूस नकार देणार नाही. याबरोबरच भारतात जागतिकीकरणाची सुरूवात झाली. या नव्या व्यवस्थेला भारतात दोन प्रकारच्या संघटनांनी विरोध केला होता; त्यातील पहिल्या प्रकारच्या संघटनांमध्ये आंबेडकरी विचारांच्या संघटनांचा समावेश होता तर दुसऱ्या प्रकारात डाव्या संघटनांचा! या दोन्ही प्रकारच्या संघटनांनी केलेला विरोध हा जनसामान्यांच्या हितापेक्षाही आपापल्या वर्गीय हितसंबंधांना लक्षात ठेवूनच केला होता! त्यामुळे भविष्यात लोकशाही व्यवस्थेवर येणाऱ्या भयावह अरिष्टाची पुरेशी कल्पना करताच आली नाही, असे म्हणने आज क्रमप्राप्त आहे. भारतात जागतिकीकरणाच्या अरिष्टाला केलेला विरोध हा नामधारी होता तो दोन अर्थांनी! डाव्यांचा विरोध हा १९८९ मध्ये बर्लिन भिंत खुली झाली तेव्हाच तात्विकदृष्ट्या संपला होता. तर भारतात स्वीकारण्यात आलेले खाजगीकरण उच्चजातवर्णियांच्या हिताचेच असल्याने डाव्यांनी त्यांच्या पुढच्या पिढीचे जातवर्गिय संरक्षण त्यात पाहिले. तर दुसऱ्या बाजूला आंबेडकरी विचारांचा दावा करणाऱ्या मध्यमवर्गीय संघटनांनी जागतिकीकरणाचा विरोध केला नाही तर त्याच्यातील खाजगीकरणाला त्यांनी विरोध केला. हाच विचार मार्क्सवाद-आंबेडकरवादाचे समन्वयक विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनीही मांडला होता. त्यांच्यामते जागतिकीकरणामुळेच ‘आज माझ्या परिचयातील किमान शंभर असे दलित तरूण अमेरिकेत आहेत ज्यांच्या आजोबांना पोटाला भाकरी मिळत नव्हती!’
विचार-चळवळ-विचारवंत अशा सर्वांनाच जागतिकीकरणाचेअरिष्ट समजून घेण्यात अपयश आल्याचे आज दिसते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत या देशाला राष्ट्र बनविण्याचे उद्दीष्ट दिले आहे. त्या अनुषंगाने विचार करताना प्रत्येक क्षेत्रात देश स्वयंपूर्ण करणे, हे ध्येय त्यांनी आमच्या पुढे ठेवले. या देशातील उच्च-जातवर्णिय या ध्येयाच्या विरोधात होते व आहेत. म्हणूनच जागतिकीकरणाच्या काळापूर्वीच त्यांची मुले देशाच्या साधन-स्त्रोतांचा उच्च शिक्षणासाठी उपभोग घेऊनही सेवा मात्र विदेशात जाऊन देत होते. हा प्रश्न ब्रेनड्रेन चा प्रश्न म्हणून चर्चेला घेतला जात असे. परंतु खरे तर उच्च जातीयांनी केलेला तो देशद्रोह होता. याउलट जागतिकीकरणानंतर त्यांची मुले सिलिकॉन व्हॅलितून भारतात परतली ती या देशातील सत्ता हातात घेण्यासाठी! याउलट ते जागतिकीकरणाच्या अरिष्टामुळे परतली म्हणून त्यांना देशात सहानुभूती मिळत होती. खरेतर सिलिकॉन व्हॅलितून परतणारे जगातील भांडवदारांशी हातमिळवणी करूनच देशात दाखल झाले होते. ही बाब भारतीय लोकशाहीला गिळंकृत करण्याचा प्रयत्न करणारे संघिय विचारांचे सत्ताधारी आणि विरोधक यांनी चालविलेल्या संयुक्त प्रयत्नातून दिसून येतो. प्रख्यात अमेरिकन पत्रकार फ्रेझर नेल्सन यांनी जगभरातील लोकशाही व्यवस्था धोक्यात आल्याचे निरीक्षण नोंदविले आहे. त्यांच्या मते बर्लिन ची प्रख्यात भिंत पाडण्यापासूनच जगभरातील लोकशाही व्यवस्थेला संपुष्टात आणण्याचे षडयंत्र सुरू असल्याचे सांगून ते जगभराचे अनेक दाखले देतात. यासाठी जगभरातील भांडवलदार एक झाले आहेत. लोकशाही व्यवस्था कशी मारली जात आहे, यावर वॉशिंग्टन पोस्ट’ने तर ‘डेमोक्रेसी डाईज् इन डार्कनेस’ नावाची मालिकाच सुरू केली होती. सध्या भारतात आपण जे काही पाहतो आणि अनुभवतो आहोत ते यापेक्षा वेगळे नाही.
COMMENTS