Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्ह्यात आठवडाभर पुरेल एवढाच गॅसचा साठा!व्यावसायिक गॅसचा तुटवडा; खानावळी, हॉटेलचालक  संकटात, विद्यार्थ्यांच्या जेवणावर प्रश्नचिन्ह

नांदेड : मध्यपूर्वेतील वाढत्या युद्धपरिस्थितीची झळ आता स्थानिक पातळीवरही जाणवू लागली असून त्याचे पडसाद नांदेड जिल्ह्यात उमटू लागले आहेत. आखाती प्

नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती!; खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
युद्धजन्य परिस्थितीमुळे नांदेड शहरांमध्ये हॉटेल, वस्तीगृहे यामध्ये व्यावसायिक सिलेंडरचा तुटवडा; विद्यार्थी संख्येवर परिणाम होण्याची शक्यता
उर्सात बनावट नोटा चालविण्याचा प्रयत्न फसला; 19 हजार 500 रुपयांच्या नोटा जप्त

नांदेड : मध्यपूर्वेतील वाढत्या युद्धपरिस्थितीची झळ आता स्थानिक पातळीवरही जाणवू लागली असून त्याचे पडसाद नांदेड जिल्ह्यात उमटू लागले आहेत. आखाती प्रदेशातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे इंधन व गॅस पुरवठ्यावर परिणाम होऊ लागला असून त्याचा फटका व्यावसायिक गॅसच्या उपलब्धतेवर होत असल्याचे चित्र आहे. देशातील इतर काही शहरांप्रमाणेच नांदेड जिल्ह्यातही कमर्शियल एलपीजी सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे शहरातील हॉटेल व्यवसायिक, खानावळी चालक आणि त्यावर अवलंबून असलेले कर्मचारी मोठ्या अडचणीत सापडले आहेत.
दरम्यान, घरगुती वापरासाठी असलेल्या एलपीजी गॅसचा जिल्ह्यात सुमारे आठवडाभर पुरेल इतकाच साठा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. जगदीश बारदेवाड यांनी मंगळवारी (दि. 10) दिली. पेट्रोल आणि डिझेलचा साठा मात्र सध्या जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक भीतीपोटी गॅसचा अतिरिक्त साठा करून ठेवू नये, तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मात्र, दुसरीकडे व्यावसायिक गॅसच्या पुरवठ्यातील अडचणींमुळे हॉटेल आणि खानावळी चालकांमध्ये मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. शहरातील अनेक हॉटेल्समध्ये सध्या केवळ दोन ते तीन दिवस पुरेल इतकाच गॅस शिल्लक असल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून कमर्शियल सिलेंडरचा पुरवठा अनियमित झाला असून काही ठिकाणी तर पूर्णपणे बंद झाल्याची तक्रार व्यावसायिकांकडून केली जात आहे. परिणामी, अनेक हॉटेल व्यवसायिकांपुढे व्यवसाय सुरू ठेवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. परिस्थिती अशीच कायम राहिली तर पुढील 24 ते 48 तासांत शहरातील अनेक हॉटेल्स आणि खानावळी बंद पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचा थेट परिणाम हजारो ग्राहकांवर होणार असून विशेषतः शहरात शिक्षणासाठी राहणार्‍या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नांदेड शहरात बाहेरगावाहून येऊन शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असून त्यांचा दैनंदिन जेवणाचा आधार प्रामुख्याने खानावळी व हॉटेल्सवरच असतो. त्यामुळे या सेवा बंद पडल्यास विद्यार्थ्यांसमोर जेवणाची समस्या उभी राहू शकते. हॉटेल व्यवसायिकांच्या मते, गॅस पुरवठा वेळेवर न झाल्यास व्यवसाय टिकवणे कठीण होईल. आधीच वाढलेले इंधन दर, महागाई आणि ग्राहकांची घटलेली संख्या यामुळे उद्योग अडचणीत असताना आता गॅस टंचाईमुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. अनेक लहान खानावळी चालकांनी काही दिवसांत गॅस मिळाला नाही तर व्यवसाय तात्पुरता बंद ठेवण्याची वेळ येईल, अशी भीती व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील हॉटेल व खानावळी संघटनांनी शासनाने तातडीने हस्तक्षेप करून व्यावसायिक गॅसचा नियमित पुरवठा सुरू करावा, अशी मागणी केली आहे. इंडेन, एचपी आणि भारत गॅस या कंपन्यांकडून होणार्‍या कमर्शियल सिलेंडरच्या पुरवठ्याचे नियोजन करून जिल्ह्यातील गरज लक्षात घेऊन त्वरित अतिरिक्त साठा उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. घरगुती गॅसचा वापर शक्य तितका काळजीपूर्वक करावा, अनावश्यक साठेबाजी टाळावी आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा पुरवठा विभागाने केले आहे. तथापि, व्यावसायिक गॅसचा प्रश्न लवकर सुटला नाही तर नांदेड जिल्ह्यातील हॉटेल उद्योग, खानावळी व्यवसाय आणि त्यावर अवलंबून असलेल्या हजारो कामगारांपुढे मोठे आर्थिक संकट उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शासनाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विविध स्तरातून होत आहे.

COMMENTS