मुख्यमंत्र्यांनी सत्तेतील दोन्ही काँग्रेसच्या आमदार-खासदारांशीही संवाद करावा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांनी सत्तेतील दोन्ही काँग्रेसच्या आमदार-खासदारांशीही संवाद करावा

पालकमंत्री मुश्रीफ यांचा सल्ला, गैरसमज टाळण्याची गरज व्यक्त

अहमदनगर/प्रतिनिधी :शासनाचा विकास निधी विधानसभा क्षेत्रनिहाय दिला जातो. त्यामुळे सरकारमधील तिन्ही पक्षांपैकी कोणावर अन्याय होण्याचे कारण नाही. पण काही

’माझी वसुंधरा’अंतर्गत चालता चालता कचरा उचलण्याची मोहीम
अहमदनगर जिल्ह्यातील 9 हजार 356 शेतकर्‍यांचे वीजबिल झाले कोरे
श्रीरामपूरात पहिल्यांदा कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन दोन्ही लसींचे एकत्रित शिबीर

अहमदनगर/प्रतिनिधी :शासनाचा विकास निधी विधानसभा क्षेत्रनिहाय दिला जातो. त्यामुळे सरकारमधील तिन्ही पक्षांपैकी कोणावर अन्याय होण्याचे कारण नाही. पण काही वक्तव्ये होतात व गैरसमजही होतात. त्यामुळे मुख्यमंत्री जसे त्यांच्या शिवसेनेच्या आमदार-खासदारांशी बोलतात, तसा संवाद त्यांनी सरकारमधील राष्ट्रवादी व काँग्रेसच्या आमदार-खासदारांशीही ठेवला पाहिजे, असा सल्ला नगरचे पालकमंत्री व राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी येथे दिला.
मुश्रीफ यांनी जिल्ह्याच्या विकास योजनांचा आढावा येथे घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आमदार निलेश लंके, लहू कानडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, मनपा आयुक्त शंकर गोरे, शेवगावचे युवा नेते क्षीतिज घुले, बाळासाहेब जगताप आदींसह अन्य उपस्थित होते.
शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तीकर काही दिवसांपूर्वी नगरला आले होते व त्यावेळी त्यांनी शिवसेनेला विकास निधी पुरेसा मिळत नाही, पालकमंत्री भेटत नाहीत, शासनस्तरावरील कामे मार्गी लागत नाहीत, अशा तक्रारी केल्या होत्या. त्याबाबत विचारले असता, पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, महाविकास आघाडी सरकार तीन पक्षांचे आहे व थोडेतरी भांड्याला भांडे लागणार आहेच. शासनाचा विकास निधी हा विधानसभा क्षेत्र निहाय दिला जातो. त्यामुळे शिवसेनेवर अन्याय करण्याचा प्रश्‍न नाही. पण तीन पक्षांचे सरकार असल्याने काहीअंशी संघर्ष होत असतो. मुंबई-ठाण्यात शिवसेनेचे प्राबल्य असल्याने तेथे अन्य दोन पक्षांवर अन्याय होतो व अशी उलट स्थिती राज्यात अन्य ठिकाणीही होते. तेथे ज्यांचे प्राबल्य आहे, त्यांच्याकडून अन्य पक्षांवर अन्याय होतो, असे आवर्जून स्पष्ट करून मुश्रीफ म्हणाले, पण मुख्यमंत्री जसे त्यांच्या शिवसेना व राष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांशी नियमितपणे संवाद साधतात, तसा त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार-खासदारांशीही संवाद साधला तर निधी खर्चासह त्यांच्या विविध प्रश्‍नांतून मार्ग निघेल. तसेच सर्वांचेच गैरसमज दूर होऊन बाहेर विविध वक्तव्ये होणार नाहीत, असा दावाही मुश्रीफ यांनी केला.

सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न
भाजप नेते किरीट सोमय्या व अन्य नेते वारंवार महाविकास आघाडी सरकारवर विविध आरोप करून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग केला जात आहे, असा आरोप करून मुश्रीफ म्हणाले, राष्ट्रवादी व शिवसेनेवरच आरोप होत आहेत व काँग्रेसवर होत नाहीत, याचा अर्थ तुम्हीच (पत्रकार) काय तो ओळख़ा, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.

पालकमंत्र्यांनी केले खुलासे

  • जिल्हा नियोजन मंडळातून सिव्हील हॉस्पिटलसाठी 80 कोटी रुपये दिले होते. या खर्चात अनियमितता आढळली असल्याने त्याचा अहवाल शासनाला पाठवला आहे. त्यावर योग्य ती कारवाई होईल. सिव्हीलमधील आगीच्या कारणाच्या अहवालाबाबत माहिती नाही.
  • जिल्ह्यात 1 लाख 16 हजार 500 मेट्रीक टन अतिरिक्त ऊस शिल्लक राहिला असून, तो 10 ते 15 जूनपर्यंत गाळप नक्की होईल.
  • भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अयोग्य वक्तव्याबद्दल खा. सुप्रिया सुळेंची माफी मागितल्याने तो विषय संपला आहे.
  • चौंडीमध्ये पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सवावर राष्ट्रवादीचे प्राबल्य असल्याचे भाजपचे प्रा. राम शिंदे बोलत असले तरी भाजपच्या सत्ताकाळात त्यांनीही तसेच केले असावे, म्हणून यंदा त्यांना विचारले नसावे. तरीही चौंडीतील जयंती उत्सवाच्या नियोजनात सर्वपक्षीयांना सामावून घेतले की नाही, याची माहिती मी घेतो.
  • नगर तालुक्यातील नवी नगरपालिका नागरदेवळे नियमानुसार झाली आहे. ज्यांना याबाबत काही तक्रार आहे, त्यांनी न्यायालयात जावे

थोरातांकडे फक्त दोन मते जास्त
छत्रपती संभाजी महाराज यांना राज्य सभेसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवारी द्यायला हवी होती, पण शिवसेनेने निर्णय घेतला, या महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना मुश्रीफ यांनी, हा विषय शिवसेनेचा आहे. शिवाय थोरातांकडे म्हणजे काँग्रेसकडे फक्त 2 जादा मते आहेत. त्यांचे 44 आमदार आहेत व त्यांच्या उमेदवाराला 42 मते लागणार आहेत. त्यामुळे फक्त 2 मते त्यांच्याकडे जास्त आहेत तर राष्ट्रवादीकडे 12 व शिवसेनेकडे 13 जास्त मते आहेत. त्यामुळे उमेदवारीचा निर्णय शिवसेनेचा होता, असे मुश्रीफांनी स्पष्ट केले.

COMMENTS