भारतातील लोकसंख्या वाढीचा विचार करता आणि जमीन, पाणी संसाधनाचा विचार करता, या देशात एवढ्या प्रचंड लोकसंख्येंच्या गरजा आपण भागवू शकू का महत्वाचा प
भारतातील लोकसंख्या वाढीचा विचार करता आणि जमीन, पाणी संसाधनाचा विचार करता, या देशात एवढ्या प्रचंड लोकसंख्येंच्या गरजा आपण भागवू शकू का महत्वाचा प्रश्न आहे. देशाच्या लोकसंख्येने 142 कोटींचा टप्पा ओलांडला असून, जगात सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून भारताची ओळख होत आहे. मात्र ही ओळख आत्मप्रौढी मिरवणारी नाही. कोणत्याही देशाची प्रगती ही त्या देशातील लोकसंख्या आणि तेथील नैसर्गिक साधनसंपत्ती यावर अवलंबून असते. त्या देशातील लोकसंख्या आणि त्या देशाचे उत्पादन यांचा परस्परांशी अगदी निकटचा संबंध असतो. लोकांच्या राहणीमानाचा दर्जा मुख्यत: त्यावरून ठरत असतो. लोकसंख्येचा आकार, स्त्रीपुरुष प्रमाण, व्यवसाय विभागणी, लोकांची उपक्रमशीलता, तांत्रिक ज्ञान या घटकांवरच त्या देशातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा पर्याप्त उपयोग केला जातो. विकसनशील देशात वेगाने वाढणारी लोकसंख्या ही एक गंभीर समस्या ठरते. भारतातही लोकसंख्येच्या अतिरिक्ततेमुळे लोकसंख्या विस्फोटाची स्थिती निर्माण झाली आहे. लोकसंख्येच्या आकारमानाचा विचार करता भारताच्या लोकसंख्येचा आकार खूपच मोठा आहे.
लोकसंख्येच्या आकारावरून भारत जगात आता अव्वल क्रमांकावर आहे. जगातील इतर देशाच्या तुलनेत भारतातील लोकसंख्या वाढीचा दर उच्च राहिला आहे. जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी जवळ-जवळ 2.4 टक्के भूमी भारताच्या वाट्याला आली आहे तर जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 16.7 टक्के पेक्षा अधिक लोकसंख्या भारतात राहते आहे. संयुक्त राष्ट्र संघाने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालात म्हटले आहे की, भारतातील 25 टक्के लोकसंख्या ही 0 ते 14 या वयोगटातील आहे. तर 10 ते 19 वयोगटातील काही आहेत. चीनचे नागरिक भारतीयांपेक्षा जास्त काळ जगतात. त्यात महिला या पुढे आहेत. त्याच वेळी, 10 ते 24 वयोगटातील लोकांची संख्या 26 टक्क्यांच्या जवळपास आहे. देशातील 68 टक्के लोकसंख्या 15 ते 64 वयोगटातील आहे आणि 7 टक्के लोकांचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त आहे. त्याच वेळी, चीनमध्ये 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांची लोकसंख्या 14 टक्के आहे. चीनमधील लोकांचे आयुर्मान भारताच्या तुलनेत चांगले असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे भारताला आपल्या लोकसंख्या धोरणात मोठ्या प्रमाणात बदल करावा लागणार आहे. भारतात मधुमेहांची रुग्णसंख्या मोठ्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे भारतातील प्रत्येक नागरिक आरोग्यसंपन्न असायला हवा, तरच देशाची प्रगती साधण्यात मदत होईल, अन्यथा भारत पुन्हा पिछाडीवर जावू शकतो. खरंतर जितकी लोकसंख्या कमी, तितका विकास वेगाने होतो. अमेरिका सारख्या मोठा भूभाग असलेल्या देशाची लोकसंख्या 31 कोटी आहे.
अत्यंत प्रगत, विकसित देश म्हणून अमेरिका, जपान या देशांचा उल्लेख होतो. भारतात सर्वांधिक लोकसंख्या असून, याचा योग्यप्रकारे उपयोग करून घेतला तर देश महासत्ता व्हायला वेळ लागणार नाही. मात्र या लोकसंख्येचा उपयोग योग्यप्रकारे करता आला पाहिजे. या लोकसंख्येला विधायक कामांमध्ये समावेश करून घेता आले पाहिजे. औद्योगिक क्रांतीच्या आधीचे जग बघितले तर, म्हणावी तशी प्रगती झाली नव्हती. दूरध्वनी, टेलिव्हजन, वीज, रस्त्यांचे जाळे अशी मोठी प्रगती झालेली नव्हती. त्यामुळे मानव नेहमी विचारांच्या तंद्रीत गुंतलेला असायचा आणि नव-नवे शोध लावत असायचा. मात्र आज देशातील कोट्यावधी जनतेचा वेळ मोबाईल आणि टिव्हीवरील चित्रपट मालिका बघण्यात जातो. सोशल मीडियावर तासंनतास बोटे चाळले जातात. त्यामुळे लोकसंख्या सर्वाधिक असून उपयोग नाही, तर यातील किती लोकसंख्या विधायक कामांमध्ये गुंतली आहे, काहीतरी नवनिर्माण करण्याच्या ध्यासाने पछाडलेली आहे, हे महत्वाचे आहे.
COMMENTS