जात पंचायतने एक रुपयात फोनवरच केला महिलेचा घटस्फ़ोट…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जात पंचायतने एक रुपयात फोनवरच केला महिलेचा घटस्फ़ोट…

नवर्‍याने केले दुसरे लग्न, जातपंचायत मूठमाती अभियान आले मदतीला

अहमदनगर/प्रतिनिधी : पहिल्या पत्नीचा घटस्फ़ोट झाला नसताना नवर्‍याने दुसरे लग्न केल्यास तो गुन्हा ठरतो. परंतु हे जात पंचायतीला मान्य नाही. फोनवर व एक रु

श्री स्वामी समर्थ महाराज चरित्र | Shri Swami Samarth Maharaj | LokNews24 |
संगमनेरात जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा
शंभर टक्के लसीकरणासाठी ‘हर घर दस्तक’ अभियान

अहमदनगर/प्रतिनिधी : पहिल्या पत्नीचा घटस्फ़ोट झाला नसताना नवर्‍याने दुसरे लग्न केल्यास तो गुन्हा ठरतो. परंतु हे जात पंचायतीला मान्य नाही. फोनवर व एक रुपयात घटस्फ़ोट केल्याचा घृणास्पद प्रकार सिन्नर येथे घडला आहे. संबंधित अश्‍विनी नावाची महिला नगर जिल्ह्यातील असून, तिच्या मदतीला आता जातपंचायत मूठमाती अभियान पुढे आले आहे. या महिलेने पोलिसात जाऊ नये म्हणून तिच्यावर कुटुंबियांसह समाजाचाही दबाव वाढत आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जात पंचायत मूठमाती अभियानचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे व अ‍ॅड रंजना गवांदे यांनी दिलेल्या माहिती नुसार, सिन्नर येथील अश्‍विनी या महिलेचे लोणी (अहमदनगर) येथे लग्न झाले होते. लग्नानंतर सासरच्या व्यक्तींनी तिचा छळ केल्याने ती माहेरी सिन्नर येथे आली. याचा फायदा घेऊन सासरच्या लोकांनी लोणी व सिन्नर येथे वैदू समाजाची जात पंचायत बसवली. जात पंचायतीने या महिलेला न विचारता तिच्या अनुपस्थितीत तिचा घटस्फ़ोट केला. त्यासाठी सासरकडील लोकांनी भरपाई केवळ एक रुपया पंचांकडे दिला. जात पंचायतीने या महिलेला पोलीस ठाण्यात जाण्यापासून रोखले. तिची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने न्यायालयीन प्रकियेत न्याय मागणे तिला अवघड गेले. आठ दिवसांपूर्वी तिच्या नवर्‍याने दुसरे लग्न केल्याने तिला अन्याय असय्य झाला. सामाजिक कार्यकर्त्यामुळे ही बाब समोर आली आहे. न्यायालयाने घटस्फ़ोट दिला नसताना पंचांच्या भूमिकेमुळे नवर्‍याने दुसरे लग्न केले. त्यामुळे जात पंचायतच्या पंचांचा विरोध मोडून काढत ती लढायला तयार झाली असून, जातपंचायतीचे पंच व सासरचे लोक यांच्याविरोधात तक्रार करायला तयार आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जात पंचायत मूठमाती अभियानचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे व अ‍ॅड रंजना गवांदे हे तिच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. पिडीतेवर जातपंचायतीचा दबाव वाढतो आहे. तिला गुन्हा दाखल करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. नातेवाईकांमार्फत पिडीतेवर दबाव आणला जातो आहे, असे चांदगुडे व अ‍ॅड. गवांदे यांनी सांगितले. राज्य सरकारने जात पंचायतच्या मनमानीला आळा घालण्यासाठी सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा बनविला, परंतु जात पंचांची दहशत समाजात अजूनही कायम आहे. त्यामुळे प्रबोधनासोबत या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी झाल्यास जात पंचायतींना मूठमाती देता येईल, असा विश्‍वास अ‍ॅड. गवांदे यांनी व्यक्त केला.

COMMENTS