सातारा / प्रतिनिधी : पालिकेच्या विद्यमान पदाधिकार्यांची मुदत संपल्याने प्रशासक म्हणून मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या हाती कारभाराची सूत्रे आहे
सातारा / प्रतिनिधी : पालिकेच्या विद्यमान पदाधिकार्यांची मुदत संपल्याने प्रशासक म्हणून मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या हाती कारभाराची सूत्रे आहेत. त्यामुळे प्रथमच पालिकेच्या इतिहासात पालिकेच्या अर्थसंकल्पाची सभा दि. 24 रोजी मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. अजेंड्यावर 60 विषय असून गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी सादर करण्यात येणार्या बजेटमध्ये ज्यादा तरतूद केल्याची चर्चा सुरु आहे.
मागील तीन वर्षापासून पालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेला कोरोनाचे विघ्न येत होते. सन 2022 च्या अर्थसंकल्पीय सभेपूर्वी विद्यमान पदाधिकार्यांची मुदत 26 नोव्हेंबरला संपली. त्यानंतर प्रशासक म्हणून मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडे कारभार आला आहे. त्यांनी अर्थसंकल्पीय सभा घेण्यासाठी सर्व विभागाच्या खातेप्रमुखांना कार्यकारिणीचे सदस्य पद देवून बजेट तयार करण्यात आले आहे. त्या बजेटला मंजूरी देण्याच्या अनुषंगाने दि. 24 रोजी सायंकाळी 5 वाजता पालिकेच्या सभागृहात अर्थसंकल्पीय सभा मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षीचे बजेट ज्यादा करण्यात आल्याची चर्चा आहे. श्रेणी 3 व 4 वर्गच्या सेवकांच्या अनुकंपा नियुक्त्या निश्चित करणे, महादरे येथील फुलपाखरु संवर्धन क्षेत्राच्या राखीव भागासाठी पर्यटन सुविधा देणे, शहरात हवेचे प्रदुषण मोजण्यासाठी यंत्रणा बसवणे, वर्षभरात विकास कामे करण्यासाठी साहित्य खरेदीसाठी वार्षिक दर निश्चिती करणे, हद्दीवाढीमध्ये आलेल्या भागाचा डीपीआर करणे, पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून उद्भव क्षेत्राचे अद्यवतीकरण करणे आदी 60 विषय आहेत. सभा सचिव म्हणून अतुल दिसले काम पहाणार आहेत.
COMMENTS