Homeमहाराष्ट्रमुंबई - ठाणे

भाजपकडून बंडखोरांची मनधरणी सुरू

बंडखोर माघार घेतील, बावनकुळे यांचा विश्‍वासमुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर भाजपमध्ये उसळलेल्या बंडखोरीवर लवकरच तोडगा निघ

नांदेडमध्ये विकास, भ्रष्टाचार आणि गुंडगिरीवर रणसंग्राम
नांदेड भाजपला धक्का : तरोडा-सांगवी मंडळ अध्यक्ष सुनील राणे यांचा राजीनामा, अंतर्गत अस्वस्थतेचा स्फोट
शिवाजीनगरमध्ये भाजपला संमिश्र कौल : गड राखला, पण नेतृत्वाला हादरा

बंडखोर माघार घेतील, बावनकुळे यांचा विश्‍वास
मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर भाजपमध्ये उसळलेल्या बंडखोरीवर लवकरच तोडगा निघेल, असा ठाम विश्‍वास राज्याचे महसूल मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरूवारी व्यक्त केला आहे. अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेले बहुतांश बंडखोर उमेदवार पक्षाशी चर्चा झाल्यानंतर आपली उमेदवारी मागे घेतील, असे ते म्हणाले.
राज्यातील 29 महापालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्वच प्रमुख पक्षांमध्ये अंतर्गत नाराजी उफाळून आली आहे. मात्र भाजपमध्ये ही नाराजी अधिक ठळकपणे समोर येत आहे. मर्यादित जागा आणि इच्छुकांची मोठी संख्या, तसेच काही ठिकाणी जुन्या कार्यकर्त्यांऐवजी नव्यांना संधी दिल्याच्या आरोपांमुळे मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, अकोला, चंद्रपूरसह अनेक शहरांत बंडखोरीचे चित्र दिसून येत आहे. या पार्श्‍वभूमीवर स्थानिक नेतृत्वाविरोधात नाराजांनी थेट निवडणूक रिंगणात उतरण्याचा मार्ग स्वीकारला आहे. पत्रकारांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले की, पक्षाशी काही कारणांनी नाराज झालेले कार्यकर्ते हे भाजपचेच आहेत. त्यांच्या भावना समजून घेत संवाद साधला जाईल. पक्षाविषयीचा गैरसमज दूर झाल्यानंतर ते पुन्हा संघटनेसोबत काम करतील, असा मला विश्‍वास आहे. बंडखोरी ही तात्पुरती असते; पक्षहित समोर ठेवल्यास योग्य निर्णय घेतला जातो, असेही त्यांनी स्पष्ट केले. राजकीय पक्षांकडून गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांना तिकीट देण्याच्या मुद्द्यावरही बावनकुळे यांनी भूमिका स्पष्ट केली. केवळ एफआयआर दाखल असणे आणि न्यायालयात गुन्हा सिद्ध होणे यात फरक आहे. न्यायालयात दोष सिद्ध झालेल्या व्यक्तीला उमेदवारी देता येत नाही. मात्र केवळ आरोपांच्या आधारे निर्णय घेता येत नाही, असे ते म्हणाले. अंतिम निकालानंतरच त्यावर स्पष्ट मत मांडता येईल, असेही त्यांनी जोडले.

भाजप-शिवसेना युतीत चर्चा करून तोडगा काढू
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये महायुती एकत्र लढणार का, या प्रश्‍नावर बावनकुळे यांनी सकारात्मक संकेत दिले. राज्य पातळीवर शिवसेना-भाजप युती कायम ठेवण्यावर एकमत आहे. मात्र काही ठिकाणी स्थानिक समन्वयाअभावी अडचणी निर्माण झाल्या आहेत. आगामी निवडणुकांपूर्वी घटकपक्षांमध्ये पुन्हा चर्चा करून तोडगा काढला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

चंद्रपूर येथील कारवाईचे समर्थन
चंद्रपूर महापालिका निवडणुकीत प्रदेश पातळीवर जाहीर झालेल्या यादीत स्थानिक पातळीवर फेरबदल केल्याप्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईबाबत बावनकुळे यांनी ठाम भूमिका मांडली. प्रदेशाध्यक्षांनी मंजूर केलेल्या उमेदवारांच्या यादीत परस्पर बदल करणे हे शिस्तभंगाचे कृत्य आहे. त्यामुळे संबंधित जिल्हाध्यक्षांवर कारवाई करणे योग्यच होते, असे त्यांनी सांगितले.

COMMENTS