धानोरकर गटाचा महापौर, वडेट्टीवार समर्थक उपमहापौरमुंबई : चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तासंघर्षामुळे काँग्रेस पक्षात निर्माण झालेला अंतर्गत कलह अखेर
धानोरकर गटाचा महापौर, वडेट्टीवार समर्थक उपमहापौर
मुंबई : चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तासंघर्षामुळे काँग्रेस पक्षात निर्माण झालेला अंतर्गत कलह अखेर दिल्लीतील पक्षश्रेष्ठींच्या मध्यस्थीने मिटल्याचे स्पष्ट झाले आहे. आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील मतभेदांवर तोडगा निघाल्यानंतर सत्तावाटपाचा समन्वय साधण्यात आला असून, महापौरपद धानोरकर गटाकडे तर उपमहापौरपद वडेट्टीवार समर्थकाकडे देण्यावर एकमत झाले आहे. या सत्तारचनेत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेलाही सहभागी करून घेण्याची तयारी काँग्रेसने दर्शवली आहे.
गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर महापालिकेतील सत्तास्थापनेबाबत संभ्रमाचे वातावरण होते. काँग्रेसच्या दोन प्रमुख नेत्यांतील अंतर्गत वादामुळे महापालिकेतील निर्णयप्रक्रिया रखडली होती. मात्र, दिल्लीतील काँग्रेस नेतृत्वाशी झालेल्या चर्चेनंतर अखेर या वादावर तोडगा निघाला असून, पक्षशिस्त आणि समन्वयाला प्राधान्य देत स्थानिक पातळीवरील सत्तावाटप निश्चित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आणि दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयानुसार चंद्रपूर महापालिकेतील महापौर कोण असावा, हे खासदार प्रतिभा धानोरकर आणि काँग्रेसचे गटनेते ठरवतील. काँग्रेसचे गटनेते म्हणून राजेश अडूर यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्याबाबतचे अधिकृत पत्र विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आले आहे. उपमहापौरपदासाठी वडेट्टीवार समर्थक व अनुभवी नगरसेवक वसंत देशमुख यांनी अर्ज दाखल केला आहे. मात्र, काँग्रेसकडून महापौरपदासाठी अर्ज दाखल करण्यात आलेला नाही. धानोरकर गटाकडून चार महिला नगरसेविकांनी महापौरपदासाठी अर्ज भरले असून, आज सायंकाळी काँग्रेसची अधिकृत गटनोंदणी होणार असल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. वडेट्टीवार पुढे म्हणाले की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडूनही महापौर आणि उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल झाले असले तरी, चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल आणि आवश्यकतेनुसार अर्ज मागे घेतले जातील. चंद्रपूर महापालिकेत स्थिर व सक्षम सत्तास्थापना व्हावी, हा काँग्रेसचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
संख्याबळाबाबत माहिती देताना वडेट्टीवार म्हणाले की, सध्या काँग्रेसकडे 27 नगरसेवक असून जनविकास सेना (पप्पू देशमुख गट) चे 3 नगरसेवक काँग्रेसच्या बाजूने आहेत. त्याशिवाय बसपानेही काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे एकूण संख्याबळ 32 पर्यंत पोहोचले असून, बहुमतासाठी आणखी दोन नगरसेवकांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. यासंदर्भात विविध स्तरांवर चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, चंद्रपूर महापालिकेत शिवसेना ठाकरे गटाला स्थायी समिती देण्याबाबत काँग्रेस सकारात्मक असल्याचेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात त्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुरू असून, अंतिम निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे. याचदरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसचे विदर्भ प्रभारी कुणाल चौधरी यांनीही चंद्रपूरबाबत भूमिका स्पष्ट केली. ‘चंद्रपूरच्या जनतेने काँग्रेसवर विश्वास टाकला आहे. चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचाच महापौर होईल आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पक्ष कटिबद्ध राहील,’ असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

COMMENTS