अहिल्यानगर : टीईटी सक्ती, अन्यायकारक संचमान्यता धोरण, अशैक्षणिक कामांची जबरदस्ती आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक व शिक्षकेतर संघटनांच्या स

अहिल्यानगर : टीईटी सक्ती, अन्यायकारक संचमान्यता धोरण, अशैक्षणिक कामांची जबरदस्ती आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक व शिक्षकेतर संघटनांच्या समन्वय समितीने ५ डिसेंबर २०२५ रोजी ‘शाळा बंद’ आंदोलनाची घोषणा केली असून या आंदोलनात शिक्षक भारती उतरणार आहे. याबाबतची माहिती शिक्षक भारतीचे राज्य सचिव तथा शिक्षक नेते सुनील गाडगे यांनी दिली.
शिक्षक भारती संघटनेने प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागांतील सर्व विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, पदाधिकारी व सदस्यांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. येत्या ‘शाळा बंद’ आंदोलनात शिक्षकांबरोबरच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचाही मोठा सहभाग अपेक्षित आहे. शासनाकडून सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षामुळे शिक्षक-शिक्षकेतरांच्या समस्या अधिक तीव्र झाल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. आंदोलनासाठी मांडण्यात आलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार २०१३ पूर्वी कार्यरत शिक्षकांना दिलासा देणे, १५ मार्च २०२४ चा अन्यायकारक संचमान्यता जी.आर. रद्द करणे, प्रत्येक विषयाला स्वतंत्र शिक्षक देणे, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, NEP 2020 रद्द करणे आणि कॅशलेस आरोग्य योजना तात्काळ लागू करणे यांचा समावेश आहे. तसेच वेतनेतर अनुदान, १०:२०:३० आश्वासित प्रगती योजना, वाढीव रजा, मासिक पाळीसाठी महिला कर्मचाऱ्यांना दोन दिवसांची विशेष रजा, भरती प्रक्रियेतील विलंब, कंत्राटीकरण थांबवणे यांसारख्या मुद्द्यांवर तातडीने निर्णय घेण्याची शिक्षकांची मागणी आहे. विनाअनुदानित शाळांना १०० टक्के अनुदान, पाच दिवसांचा आठवडा, रिक्त पदांची तातडीने भरती, कला-क्रीडा शिक्षकांना स्वतंत्र स्थान, अनुकंपा प्रकरणातील विलंब, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध लागू करण्यासंबंधीची मागणी, दिव्यांग शाळांतील NPS प्रलंबित खाते, तसेच वरिष्ठता व पटनिर्धारण पद्धती रद्द करण्याबाबतही संघटनांनी ठोस भूमिका मांडली आहे. शिक्षकांना अशैक्षणिक कामांपासून मुक्त करून केवळ शैक्षणिक कामांवर लक्ष केंद्रित करता यावे, अशीदेखील मागणी आंदोलनातून करण्यात येत आहे.
या आंदोलनासाठी शिक्षक नेते सुनील गाडगे, जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, जिल्हा सचिव विजय कराळे, कार्याध्यक्ष महेश पाडेकर, संजय पवार, सोमनाथ बोंतले, महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, कार्यवाह संजय भुसारी, कैलास जाधव, योगेश हराळे, नवनाथ घोरपडे, सचिन शेलार, सुदाम दिघे, मोहंमद समी शेख, रामराव काळे, संभाजी पवार, हनुमंत रायकर, सिकंदर शेख, संतोष देशमुख, किसन सोनवने, संतोष शेंदुरकर, संभाजी चौधरी, श्रीकांत गाडगे, रेवण घंगाळे, विभावरी रोकडे, मीनाक्षी सूर्यवंशी, रोहिणी भोर, शकुंतला वाळुज, छाया लष्करे, जया गागरे, अनघा सासवडकर, रूपाली बोरुडे, सोनाली अकोलकर तसेच विनाअनुदानित शाळांचे राज्याध्यक्षा रूपाली कुरूमकर यांनी आवाहन केले आहे. आंदोलनाद्वारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांना शासनाने तातडीने सकारात्मक प्रतिसाद द्यावा, अशी मागणी शिक्षक भारती संघटनेने व्यक्त केली आहे.

COMMENTS