संगमनेर : संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडी पुरस्कृत '
संगमनेर : संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडी पुरस्कृत ‘संगमनेर सेवा समिती’ने आपले सर्वच्या सर्व उमेदवार जाहीर करत विकासाचा एक ठोस आराखडा संगमनेरकरांसमोर ठेवला आहे. तर दुसरीकडे, महायुतीनेही नगराध्यक्षपदासाठी आपला उमेदवार निश्चित केला आहे.
या निवडणुकीतील नगराध्यक्षपदाची मुख्य लढत आता लक्षवेधी ठरली आहे. महाविकास आघाडीचे समर्थन असलेल्या संगमनेर सेवा समितीकडून नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी डॉ. मैथिली तांबे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात महायुतीकडून नगराध्यक्ष पदासाठी आमदार अमोल खताळ यांच्या भावजयी सुवर्णा संदीप खताळ (सुवर्णा विठ्ठल राहणे) यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.
त्यामुळे दोन्ही बाजूंनी आपल्या परिवारातील सदस्य नगराध्यक्ष पदासाठी उभे केले आहेत. या दोन्ही आमदारांपैकी कोणाच्या पारड्यात संगमनेरकर आपले बहुमत टाकतात, हे दि. ३ डिसेंबरला मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.
तांबे यांच्या नेतृत्वात ‘सेवा समिती’चा जोर – संगमनेर नगरपालिकेची निवडणूक महाविकास आघाडीने ‘संगमनेर सेवा समिती’च्या माध्यमातून लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीचे नेतृत्व स्वतः आमदार सत्यजित तांबे करत आहेत. नगराध्यक्षपदासाठी सुरुवातीपासूनच माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे किंवा डॉ. मैथिली तांबे यांचे नाव चर्चेत होते, अखेर डॉ. मैथिली तांबे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
महायुतीकडून नगराध्यक्ष पदासाठी सुवर्णा खताळ यांची उमेदवारी दाखल
नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी प्रांताधिकारी कार्यालयामध्ये उमेदवारी दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी एकच गर्दी केली होती. संगमनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी महायुतीकडून आमदार अमोल खताळ यांच्या भाऊजई श्रीमती सुवर्णा विठ्ठल राहणे( श्रीमती सुवर्णा संदीप खताळ ) यांनी आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ आणि महायुतीच्या समर्थकांसह नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अरुण उंडे यांच्याकडे दाखल केला.
महायुतीचा गुंता अखेरच्या क्षणापर्यंत कायम
महायुतीकडून उमेदवारांच्या नावावर एकमत होताना दिसत नव्हते, त्यामुळे त्यांचा गुंता अखेरच्या क्षणापर्यंत कायम होता. महायुतीने केवळ नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर केले, मात्र नगरसेवकपदाच्या उमेदवारांची यादी अद्याप जाहीर झालेली नव्हती. दुसरीकडे, निवडणूक प्रक्रियेतून ऐनवेळी विखे-पुत्रांनी माघार घेतल्याने भाजपची मोठी कोंडी झाल्याचे दिसले. नावे निश्चित करण्यासाठी नेमलेल्या सुकाणू समितीचाही फारसा प्रभाव पडला नाही.

COMMENTS