आम्ही स्वतः स्वामी समर्थ अनुयायी आहोत. स्वामी समर्थांच्या सेवेत आम्ही स्वतःला नेहमी वाहून घेतो. परंतु आमचे स्वामी समर्थ आम्हाला कधीही हिंसा शिकवत

आम्ही स्वतः स्वामी समर्थ अनुयायी आहोत. स्वामी समर्थांच्या सेवेत आम्ही स्वतःला नेहमी वाहून घेतो. परंतु आमचे स्वामी समर्थ आम्हाला कधीही हिंसा शिकवत नाही. याउलट, आपल्या विरोधात बोलणाऱ्यांना, प्रेम अर्पण करा म्हणजे त्यांचे हृदय परिवर्तन होईल; आणि ते आपल्या विचारांना शरण येतील. या साध्या-सोप्या गोष्टी आयुष्याच्या मोठ्या शिकवणी असतात; परंतु, काल अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो हल्ला झाला, तो मात्र स्वामी समर्थांच्या शिकवणीतून नाही! स्वामी समर्थ हे आपणास दया, प्रेम, अहिंसा शिकवतात.
हल्ला करणाऱ्यांच्या नावामध्ये शिवधर्म आहे. या शिवधर्माची ओळख महाराष्ट्राला सर्वप्रथम डॉ. आ. ह. साळुंखे आणि आमचे मित्रवर्य माननीय पुरुषोत्तम खेडेकर यांनी करून दिली होती. शिवधर्म हादेखील बुद्धाच्या नंतर अंहिसेच्या दिशेने जाणारे आहेत. एक धर्म म्हणून त्याची स्थापना डॉ. आ. ह. साळुंखे यांनी तत्त्वज्ञान निर्माण करून केली. त्यामध्ये पुरुषोत्तम खेडेकर यांचा मोठा सहभाग होता; शिवधर्म या नावाने देखील हिंसाचाराची शिकवण दिलेली नाही. त्यामुळे शिवधर्म या नावाने जे काही असेल त्या नावातील शिवधर्माची ही शिकवण अहिंसेची निश्चित झालेली आहे. त्यामुळे, महाराष्ट्रामध्ये प्रबोधनाची चळवळ करणारे प्रवीण दादा गायकवाड यांचे आणि आमचे मतैक्य किंवा मतभेद असे काहीही असले तरी शेवटी शारीरिक हल्ल्याचे समर्थन, उभा महाराष्ट्र करू शकत नाही. कारण, हा महाराष्ट्र मावळ्यांचा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांचा आहे! मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समतेच्या राज्याची स्थापना केली होती.
त्या समतेच्या राज्यामध्ये सर्वजण गुण्यागोविंदाने नांदत होते. त्यांनी एकमेकांच्या स्नेहभाव ठेवला. अशा या महाराष्ट्राला हिंसाचाराची लागणारी कीड याचे समर्थन होऊ शकत नाही. याउलट, प्रवीणदादा गायकवाड हे महाराष्ट्राच्या मोजके विचारवंतांमध्ये मोजले जातात. त्यांचे विचार आक्रमक असतील किंवा त्यांचे विचार मांडण्याची शैली ही आक्रमक असू शकेल. परंतु, चुकीची विचार म्हणून मांडण्याची त्यांची पद्धत नाही. महाराष्ट्रामध्ये समता नांदावी याच विचारांचे ते आहेत. मात्र, महाराष्ट्रात त्यांच्यावर झालेला हा हल्ला हा अतिशय निषेधार्थ या प्रकारात मोडणारा आहे. महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेड यांच्या माध्यमातून प्रबोधनाची चळवळ राबविण्यात आली. त्यापैकी प्रवीणदादा गायकवाड हे अधिक समजूतदार नेतृत्व राहिलेले आहे. त्यांनी शरद पवार असतील किंवा अन्य कोणतेही नेते असतील यांच्यावरही वैचारिक टीका करण्याचं सामर्थ्य दाखवले आहे. त्यांच्या हे सामर्थ्य महाराष्ट्राला निश्चितपणे अभिमानास्पद वाटणारे आहे.
तसं ते निडर आणि धाडसी व्यक्तिमत्व आहे. परंतु, एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अशा व्यक्तींना बोलवून त्यांच्यावर अशा प्रकारचा हल्ला करणारी ही संस्कृती महाराष्ट्राला शोभणारी नाही. त्यातल्या त्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेणाऱ्या महाराष्ट्रात समता, अहिंसेचे राज्य नांदावे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्राच्या जनतेला समतेने नांदण्याची क्षमतेने शिकवण दिलेली आहे. हे राज्यकर्ते असतानाही त्यांनी या राज्यामध्ये समता नांदण्यासाठी आपला राज्यकारभार केला होता. महाराष्ट्रची ही भूमी आहे आणि यात सर्व जातीसमूहांचे प्रवर्गांचे महापुरुष सामील आहेत. संतांची चळवळ सर्व जातीसमुहांची आहे. महापुरुषांच्या प्रबोधनाची चळवळ देखील ही सर्व जातीसमुह आणि प्रवर्गांच्या महामानवांनी बनवलेली आहे. अशा चळवळीला पुढे नेणारे किंवा त्याचे वैचारिक नेतृत्व करणाऱ्यांवर अशा प्रकारचा हल्ला होणार, हे महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालायला लावणारी बाब आहे.


COMMENTS