मुंबई/प्रतिनिधी - घरी लग्न सोहळा असला म्हणजे, राजकारणी असो की बडे सनदी अधिकारी, यासाठी अगोदरच अनेक दिवसांपासून निवांत वेळ काढून कुटुंबियांसाठी व
मुंबई/प्रतिनिधी – घरी लग्न सोहळा असला म्हणजे, राजकारणी असो की बडे सनदी अधिकारी, यासाठी अगोदरच अनेक दिवसांपासून निवांत वेळ काढून कुटुंबियांसाठी वेळ देतात. त्यातच अधिकारी असेल तर, निवांत सुट्टया टाकून, लग्न सोहळयात आनंद लुटतात. मात्र याला काही अपवाद ही असतात. अगोदर कर्तव्यनिष्ठा महत्वाची नंतर, कुटुंबिय. मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी कर्तव्यदक्षतेचा एक परिपाठच घालून दिला.
शनिवारी मुंबईचे पोलिस आयुक्त फणसळकर यांच्या एकुलत्या एक मुलीचे लग्न. त्यातच महाविकास आघाडीचा महामोर्चा. त्यामुळे या दुहेरी कोंडीत अडकलेल्या फणसळकर यांनी कर्तव्यनिष्ठेला प्राधान्य देत आधी महामोर्चाचे नियोजन केले. साहजिकच यासंदर्भातली कायदा आणि सुव्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी मुंबई पोलिसांवर आणि पर्यायाने खात्याचे प्रमुख म्हणून पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्यावर होती. संध्याकाळी मुलीच्या लग्न सोहळा पार पडणार असतांनाच, साहजिकच मोर्चाचे नियोजन आणि त्यात कन्येच्या लग्नासाठीच्या तयारीची लगबग ही दुहेरी कसरत त्यांनी गेले दोन दिवस केली. घरामध्ये इतका मोठा क्षण साजरा होत असतानाच त्यांनी कर्तव्याला श्रेष्ठ मानत मोर्चाच्या नियोजनाला, तयारीला प्राधान्य दिले, ज्याचे कौतुक आता सोशल मीडियावर करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या या कामगिरीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांचे कौतुक केले आहे. विवेक फणसळकर हे 1989 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकात अतिरिक्त महासंचालक म्हणून त्यांनी जबाबदारी पाहिली आहे. आणि त्यापाठोपाठ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रमुखपदीही ते होते. कडक शिस्त आणि प्रामाणिकपणा या त्यांच्या गुणांमुळे ते खात्यात ओळखले जातात. फणसळकर यांची 31 जुलै 2018 रोजी ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली होती, त्यांची ठाण्यातील उत्तम कामगिरी पाहता राज्य शासनाने त्यांची बदली न करता मुदतवाढ दिली होती. सुमारे पावणे दोन वर्ष त्यांनी ठाणे शहर आयुक्त पदाचा कार्यभार सांभाळला. सध्या ते मुंबई पोलीस आयुक्तपदी आहेत. दरम्यान, राज्यात महापुरुषांचा अपमान, मंत्र्यांची बेताल विधानांविरोधात महाविकास आघाडी कडून महामोर्चा काढण्यात आला होता. आज सकाळी 10.30 वाजल्यापासून या मोर्चाची सुरुवात भायखळ्यातील रिचर्डसन्स रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनीपासून झाली आणि बोरीबंदर येथे मोर्चा थांबला. या मोर्चाच्या अनुषंगाने त्यांनी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले होते. या मोर्च्यसाठी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
COMMENTS