केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीच्या नागरी सेवा परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे. यातून अनेक विद्यार्थी आयएएस, आयपीएस, आयआरएस यासारख्या विविध

केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीच्या नागरी सेवा परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे. यातून अनेक विद्यार्थी आयएएस, आयपीएस, आयआरएस यासारख्या विविध पदावर नियुक्त होणार आहे. मात्र या निकालांतून अनेक बाबी पुन्हा एकदा अधोरेखित होतांना दिसून येत आहे, त्या म्हणजे यश कुणाचीही मक्तेदारी नाही. जो मेहनत करेल, जो संघर्ष करेल, जो परिस्थितीचे भांडवल करणार नाही, तो यश मिळवेल हेच पुन्हा एकदा या निकालाने अधोरेखित केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एक मेंढपाळाचा मुलगा यूपीएससी परीक्षा पास झाला. यमगे या गावातील बिरदेव डोणे या तरूणाने देशात 551 वी रँक मिळवल्यामुळे त्याला आयपीएस मिळण्याची शक्यता आहे. वास्तविक पाहता ज्या दिवशी निकाल लागला त्यादिवशी हा मुलगा मेंढ्या वळत होता. त्यामुळे त्याचा हा संघर्ष खर्या अर्थाने वेगळा दिसून येतो. डोक्यात कोणाताही अहंकार नाही, पाय जमिनीवर घट्ट ठेवून हा मुलगा मेंढ्या वळतोय, हीच बाब सकारात्मक दिसून येते. खरंतर मी इंजिनिअर झालो आहे, यूपीएससीची मुलाखत दिली आहे, मी काही मेंढ्याकडे जाणार नाही, असा पावित्रा एखाद्या मुलाने घेतला असता, मात्र बिरदेव यापुढे वेगळा दिसून येतो. वडिलांचे ऑपरेशन झाले आहे, या परिस्थितीची त्याला जाणीव आहे. मुळातचः दहावीपासून त्याने अभ्यासात चांगलेच यश मिळवले आहे. दहावीत 96 टक्के गुण मिळवून मुरगूड केंद्रात प्रथम क्रमांक मिळवला आणि बारावीत 89 टक्के गुणांसह विज्ञान शाखेत यश मिळवले. पुढे त्याने पुण्याच्या प्रतिष्ठित कॉलेजमधून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. त्यानंतर त्याने यूपीएससी परीक्षेचा अभ्यास करायला सुरूवात केली. यूपीएससीच्या परीक्षेसाठी त्याने दिल्लीमध्ये दोन वर्षे अभ्यास केला. पहिल्या दोन प्रयत्नांमध्ये यशाने त्याला हुलकावणी दिली. पण या अपयशाने खचून न जाता त्याने जिद्दीने मागील वर्षी पुन्हा परीक्षा दिली आणि तिसर्या प्रयत्नात 551 वा क्रमांक मिळवून आयपीएस पदाला गवसणी घातली. बिरदेवच्या यशाने केवळ त्यांच्या कुटुंबालाच नव्हे, तर संपूर्ण गावाला अभिमान वाटतो आहे. वास्तविक पाहता त्याच्या या संघर्षामध्ये त्याला अनेकांनी मदत केली आहे. त्यामुळे बिरदेवला मदत करणारे अनेक हात होते, तसेच त्याला मार्गदर्शन करणारे चांगले वरिष्ठ सहकारी देखील मिळत गेले, मात्र बिरदेव देखील त्यांच्या विश्वासाला पात्र ठरत अभ्यास करत गेला आणि त्याने अखेर यश मिळवले. वास्तविक पाहता हा संघर्ष सोपा नव्हता. घरातून पैशांची मदत नसतांना, पुण्यात येणे, सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेणे, त्यानंतर एखाद्या विद्यार्थ्यांने चांगली नोकरी धरली असती, मात्र कोणतीही पार्श्वभूमी नसतांना कुणीही मार्गदर्शक नसतांना, नावांवरून टिंगळ करणारे विद्यार्थी अवतीभोवती असतांना, या बिरदेवने आपले पाय जमिनीवर ठेवून अभ्यासाला सुरूवात केली, आणि यूपीएससीत आयपीएस पदाला गवसणी घातली. देशामध्ये सामाजिक, राजकीय आणि आर्थिक समता संविधानाच्या माध्यमातून प्रस्थापित व्हावी हाच उद्देश डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा होता. देशातील सर्वजण एकाच पातळीवर आणल्यामुळे प्रत्येकाला आपले जीवन उंचावण्याची संधी मिळेल अशी त्यांची धारणा होती. ती सत्य होतांना दिसून येत आहे. त्यातच यश कुणाची मक्तेदारी नाही, सर्वसामान्य कुटुंबांतील मुलं देखील आयएएस-आयपीएस होवू शकतात, आपल्या मेहनतीने आणि कर्तबगारीने आपले नाव उंचावू शकतात, हेच या निकालातून सिद्ध होते. वास्तविक पाहता देशभरातून केवळ एक हजार 09 विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये 551 व्या क्रमांकांवर येणे सोपी गोष्ट नव्हती, मात्र बीरदेवने ती साध्य करून दाखवली आहे. बिरदेवसोबत बीडचा अक्षय मुंडे असेल, यवतमाळमधील मुस्लिम समाजातील तरूणी असेल, अशा अनेक विद्यार्थ्यांचा संघर्ष नजरेआड करता येणार नाही. आम्हाला काही मिळवायचे आहे, त्यापुढे शरणागती पत्कारायची नाही, असाच या तरूणांचा मूलमंत्र असल्याचे दिसून येत आहे. त्यातून या तरूणांनी यश मिळवले आहे. अनेक विद्यार्थी तर केवळ 21 आणि 22 वर्षांचे आहेत, त्यामुळे यश कुणाचीही मक्तेदारी नाही. त्यासाठी तुम्ही किती मेहनत घेता, यावर तुमचे यश अवलंबून असते., हेच पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
COMMENTS