कराड / प्रतिनिधी : कराड तालुक्यातील मसूरसह व खटाव तालुक्यातील वडूजसह पुसेसावळी येथे तीन वेगवेगळ्या सशस्त्र दोरड्यांत 11 लाख 14 हजारांचा ऐवज लुट करणार
कराड / प्रतिनिधी : कराड तालुक्यातील मसूरसह व खटाव तालुक्यातील वडूजसह पुसेसावळी येथे तीन वेगवेगळ्या सशस्त्र दोरड्यांत 11 लाख 14 हजारांचा ऐवज लुट करणार्या दरोडेखोरांच्या टोळींच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. जानेवारीपासून जिल्ह्यात दरोड्याचे सत्र सुरू होते. त्या तिन्ही दरोड्यांचा एलसीबीच्या पथकाने अथक परिश्रमाने छडा लावला आहे. एलसीबीच्या पथकाने नगर जिल्ह्यात एकाच वेळी तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकत नगर जिल्ह्यातील पाच दरोडेखोरांच्या टोळीला गजाआड केले आहे. एलसीबीचे सपोनि रमेश गर्जे यांच्या पथकाने कर्जत (जि. नगर) येथे छापे टाकून काल रात्री उशिरा कारवाई करत संशयितांना ताब्यात घेतले. छाप्यादरम्यान पळून जाण्याचा प्रयत्न करणार्या काही दरोडेखोरांना पाठलाग करून अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले, की अविनाश ऊर्फ कल्या सुभाष भोसले (वय 24), अजय सुभाष भोसले (वय 20) व सचिन सुभाष भोसले (वय 20, तिघे रा. माही, जि. नगर), राहुल ऊर्फ काल्या पदू भोसले (वय 24, रा. वलूज, जि. नगर) होमराज उध्दव काळे (25, रा. आष्टी, जि. बीड) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. त्यांना कर्जत परिसरात छापा टाकून अटक करण्यात आली. पाचही जणांना नगर येथून ताब्यात घेतले आहे. सपोनि रमेश गर्जे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही धाडसी कारवाई केली.
एकाच वेळी नगर जिल्ह्यातील तीन ठिकाणी छापे टाकत कारवाई करत अट्टल दरोडेखोर ताब्यात घेतले. कारवाईमुळे जिल्ह्यातील दरोड्यांचे सत्र थांबण्याची शक्यता आहे. पोलिसांनी अटक केलेल्या टोळीने मसूरसहित पुसेसावळी, वडूज येथील तिन्ही दरोड्यांची कबुली दिली आहे. त्याशिवाय दहिवडी, वडूज येथील घरफोड्यांचीही कबुली दिल्याने तीन दरोड्यांसह पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. पुसेसावळी येथे पाच जानेवारीला दरोडा पडला होता. त्यात पाच जणांच्या टोळीने पुसेसावळीतील संजय कदम व त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण करत तब्बल 5 लाख 20 हजारांची लूट केली होती. दोन मार्चला मसूरला दरोड्याची घटना झाली होती. त्यात डॉ. पूजा वारे व त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण करून लूट झाली. त्यात 4 लाख 89 हजारांचा ऐवज लंपास झाला होता.
11 मार्चला पहाटे वडूजला शिवाजी ननावरे यांच्या घरावर दरोडा पडला होता. त्यातही मारहाण करून एक लाख 5 हजारांचा ऐवज लुटला होता. दरोड्यांची सलग मालिकेने पोलिसांची झोप उडाली होती. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजित बोर्हाडे यांनी तपासाचे आदेश दिले होते. तपास करताना एलसीबीच्या पथकाने तिन्ही दरोड्यासहित दोन घरफोड्यांचा तपासाचा छड लावला.
तांत्रिक माहितीच्या आधारावर आष्टी-कर्जत येथे तेथील पोलिसांच्या मदतीने तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून पोलिसांनी पाचजणांच्या टोळीला गजाआड केले. वडूजचे पोलिस उपअधीक्षक डॉ. नीलेश देशमुख, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, मालोजी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सपोनि गर्जे यांच्यासह फौजदार गणेश वाघ यांच्यासह एलसीबीच्या कर्मचार्यांनी विशेष प्रयत्न केले.
तपासात तांत्रिक माहितीचा आधार
झोप उडविणार्या जिल्ह्यातील दरोड्यांच्या सत्रामुळे नागरिकांत घबराट होती. पोलिसही हताश होते. त्याच वेळी पोलिसांच्या खबर्यांनी दिलेल्या माहितीसह पोलिसांनी दरोड्याच्या वेळी त्या-त्या भागातील मोबाईलच्या तांत्रिक तपासावरून टोळीचा माग काढला. त्यात खात्री होताच पोलिसांनी छापा टाकून टोळीचा पर्दाफाश करत टोळीला जेरबंद केले. टोळीतील पाचजणांना अटक झाली आहे. अद्याप तिघांचा टोळीत समावेश असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यादृष्टीने तपास सुरू आहे.
COMMENTS