Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पशुवैद्यकांचे राष्ट्राच्या विकासात भरीव योगदान

मुक्त विद्यापीठातील चर्चासत्रात डॉ. उमेशचंद्र शर्मा यांची प्रतिपादन

नाशिक: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कृषी विज्ञान केंद्र व इंडियन सोसायटी फॉर व्हेटरीनरी सर्जरी यांच्या संयुक्त विद्यमाने 3 व 4 फ

अग्निपथ योजनेचा वाळवा तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध
संगणक परिचालकांचा ग्रामपंचायतीच्या आकृतीबंधात समावेश करणार – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
निर्घृण हत्येने यवतमाळ शहर हादरलं (Video)

नाशिक: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कृषी विज्ञान केंद्र व इंडियन सोसायटी फॉर व्हेटरीनरी सर्जरी यांच्या संयुक्त विद्यमाने 3 व 4 फेब्रुवारी, 2024 दरम्यान पशुसंवर्धन तांत्रिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या  कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ विद्यापीठाच्या सभागृहात आज पार पडला. 

उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय पशुवैद्यकशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉ. उमेशचंद्र शर्मा होते. कार्यक्रमासाठी कृषी विज्ञान केंद्र, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. नितीन ठोके, पशुसंवर्धन विभागाचे सहआयुक्त डॉ. बाबुराव नरवडे, अखिल भारतीय पशुवैद्यक परिषदेचे सदस्य डॉ. संदीप इंगळे, महाराष्ट्र राज्य पशुवैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. अजय पोहरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. शर्मा यांनी पशुसंवर्धन विभागाचे राष्ट्राच्या विकासात अनन्यसाधारण महत्व असल्याचे सांगितले. दुग्ध उत्पादनातील भारताच्या प्रथम स्थानामध्ये पशुवैद्यकांचे योगदान अतिशय महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमुद केले. हवामानातील विपरीत बदलांमुळे कृषी उत्पादनात धोके व अनिश्चितता तयार होत आहे. अशाप्रसंगी  पशुसंवर्धन व्यवसायामध्ये शेतकऱ्यांना कायमच आर्थिक पाठबळ देण्याची क्षमता असल्याचे त्यांनी विशेष उदाहरणांसह अधोरेखित केले. आदिवासी भागात पशुसंवर्धनावर मोठ्या प्रमाणावर लक्ष देण्याची गरज बोलून दाखविताना त्यांनी स्थानिक पशुधनाची उत्पादकता वाढीसाठी अधिक प्रयत्न करण्याची निकड असल्याचे सांगितले. शासकीय पातळीवर पशुधन विकासासाठी प्रयत्न होत आहेत, परंतु अधिक आर्थिक तरतुदीची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. करोना महामारीच्या काळातही पशुवैद्यक अधिकाऱ्यांनी मेहनत घेतली. पशुधनाला साथीच्या रोगांपासून वाचविण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाची त्यांनी मुक्तकंठाने प्रसंशा केली.

कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्रज्ञ व प्रमुख डॉ. नितीन ठोके यांनी शेतकऱ्यांच्या गरजा व समस्या आधारित तंत्रज्ञान प्रसारावर भर देण्याची गरज असल्याचे सांगितले. अश्या प्रकारच्या कार्यशाळेतून ज्ञानाचे आदान-प्रदान होऊन शेतकऱ्यांसाठी अधिक सुयोग्य तंत्रज्ञान निवड व प्रसारासाठी मदत होते. स्थानिक जातीचे पशुधन संवर्धन करतानाच, उत्पादकता वाढीसाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

दोन दिवस चालणाऱ्या या कार्यशाळेत पशुसंवर्धन विकासासाठी पशुवैद्यक शास्रज्ञ व अधिकाऱ्यांमार्फत सादरीकरण केले जाणार आहे. शेतकरी केंद्रस्थानी ठेऊन विविध संशोधन व तंत्रज्ञान यावर या कार्यशाळेत उहापोह केला जाणार आहे.  कार्यशाळेसाठी सुमारे ३०० पशुवैद्यक तज्ञांनी भाग घेतला आहे.

सदर कार्यशाळेस यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव श्री. दिलीप भरड यांनी शुभेच्छा दिल्या.  

कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंडियन सोसायटी फॉर व्हेटरीनरी सर्जरी नाशिक चॅप्टरचे  सेक्रेटरी डॉ. सचिन वेंधे यांनी केले तर ऑर्गनायझिंग सेक्रेटरी डॉ. रवींद्र चांदोरे यांनी पुढील वाटचालीची दिशा विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी विज्ञान केंद्र, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे पशुवैद्यक शास्त्रज्ञ डॉ. श्याम कडूस-पाटील यांनी केले. आभार पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. मिलिंद भनगे यांनी मानले.

COMMENTS