कराड / प्रतिनिधी : एसटी महामंडळाने वाहकांना इलेक्ट्रॉनिक्स तिकीट मशिन दिली आहेत. त्यांतील निम्म्याहून अधिक मशिन सदोष असल्याने वाहकांना नाहक त्रास

कराड / प्रतिनिधी : एसटी महामंडळाने वाहकांना इलेक्ट्रॉनिक्स तिकीट मशिन दिली आहेत. त्यांतील निम्म्याहून अधिक मशिन सदोष असल्याने वाहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. एसटीतून प्रवास करणार्या प्रवाशांना तिकीट देण्याच्या वेळेस मशिन हँग होत असल्याने तिकीट देण्यासाठी विलंब लागत आहे. काही वेळा मशिन बंद करून पुन्हा सुरू करण्याशिवाय पर्याय नसतो. अशा वेळी बसमध्ये वाहकांची तारांबळ होते.
‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद वाक्य असलेल्या एसटी महामंडळाने काळानुरूप बदलासाठी पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. प्रवाशांना एसटीने प्रवास करताना अडचणी येऊ नये. यासाठी आता सवलतीच्या पाससाठी स्मार्टकार्ड सुरू केली आहे. त्याचबरोबर आता डिजिटल सेवेकडेही महामंडळ वळत आहे. यापुढे एटीएमवरून तिकीट काढण्याची सुविधा सुरू करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. महामंडळ 18 हजार गाड्यांतून रोज 40 लाख प्रवाशांची प्रवास वाहतूक करते. त्यातून राज्यातून सुमारे 10 कोटींचा महसूल मिळतो. त्यामुळे प्रवाशांना चांगली सेवा देण्याची जबाबदारी महामंडळाची आहे. इलेक्ट्रॉनिक्स तिकीट मशिनचा ठेका एक कंपनीला दिला आहे. त्यांनी राज्यभरात 60 ते 70 हजार मशिन दिली आहेत.
यामध्ये विशिष्ट सॉफ्ट वेअर बसवले आहे. यातून कागदी तिकिटे बाहेर येतात. किती प्रवाशांना तिकिटे दिली, एकूण किती पैसे जमा झाले, तारीख, वार, वेळ या नोंदणीसह सर्व हिशेब एसटी महामंडळाकडे जमा होतो. प्रवाशांना झटपट तिकिटे मिळतात. असे हे मशिन वाहकांसाठी वरदान ठरले. मात्र, कालांतराने मशिन बंद पडणे, बटणे खराब होणे, छापील रक्कम पुसट होणे, कागदी रिळ अडकणे अशा अनेक तक्रारी येऊ लागल्या. अशा तक्रारी गेल्या काही वर्षांपासून सुरू आहेत. एसटी प्रवास करणार्या प्रवाशांना तिकीट देण्याच्या वेळी नेमके मशिन हँग होते. त्यामुळे प्रवाशांना तिकीट देण्यासाठी विलंब लागत आहे.
अनेकदा मशिन बंद करून पुन्हा सुरू करण्याशिवाय पर्याय राहात नाही. अशा वेळी बसमध्ये वाहकाची तारांबळ होते. गेल्या वर्षभरापासून ही समस्या आहे. मात्र, त्याकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याचे चित्र आहे. मशिन ‘हँग’ होत असल्याने नव्या मशिन मागविण्याची मागणी केल्या जात आहेत. मात्र, त्या मिळत नसल्याने वाहक त्रस्त आहेत.
COMMENTS