भौतिक विकास झाल्यावर अध्यात्मिक विकासाची आवश्यकता असल्याचे, हिंदू जनजागरण समितीचे प्रतिपादन हे बरोबर आहे. परंतु, त्यात त्यांनी जी मेख मारली ती कथनी
भौतिक विकास झाल्यावर अध्यात्मिक विकासाची आवश्यकता असल्याचे, हिंदू जनजागरण समितीचे प्रतिपादन हे बरोबर आहे. परंतु, त्यात त्यांनी जी मेख मारली ती कथनी आणि करणी यातील तफावत स्पष्ट करणारी आहे. जगातील कोणताही माणूस भौतिकदृष्ट्या म्हणजे सांपत्तिक दृष्ट्या संपन्न झाला की, त्याला शोध असतो मन:शांतीचा! आज आपण पाश्चिमात्य आणि अमेरिकेसारख्या देशातील भांडवलदारांकडे जर नजर टाकली तर, प्रत्येक जण मन:शांतीच्या दिशेने प्रयासरत असलेला दिसतो. मन:शांती ही केवळ मनात आणले म्हणून मिळत नसते. मनाचे भौतिक अस्तित्व शरिरात कुठेही नसले तरी, संपूर्ण मानवी समाज मन लेऊन आहे. मन हे फार चंचल असते अन् तितकेच इतरांविषयी तुच्छता बाळगणारे अथवा हिंसक असते. सकृतदर्शनी मानव हा प्राणीच असल्याने त्याचेही मन यास अपवाद नाही. त्यामुळे, मन:शांतीचा मार्ग हा मनाचा व्यायाम म्हणजे मनाला सवय लावण्याच्या प्रयत्नपूर्वक प्रयासातूनच साध्य करावा लागतो. याच प्रयत्नांना साधना किंवा विपश्यना या नावानेही संबोधले जाते. विपश्यना अथवा साधना ही मनाला अशा दिशेने नेते की, ते केवळ मानवी समाजालाच नव्हे तर, समस्त सृष्टीला आपल्या करूणा-मैत्रीत समाविष्ट करून घेते. त्यामुळे, इतरांच्याविषयी निर्माण झालेली कणव ही दान आणि सेवा भावनेतून प्रकट होते. अमेरिकन भांडवलदार आणि युरोपाती श्रीमंत हे याच मनाच्या अवस्थेतून जगाला दान देत आहेत. विपश्यना अथवा साधनेतून जागृत झालेला साक्षीभाव हा त्यांच्या मनाला करूणा, समता, मैत्री भावनेचे अधिष्ठान देतो. पण, हे झाले अध्यात्माच्या दिशेने खरोखर जाण्याच्या प्रयासाने. अध्यात्म हे माणसाच्या अंतर्यामीचे विज्ञान आहे. परंतु, हिंदू जनजागरण समिती ही अध्यात्माच्या नावावर कर्मकांडाकडे नेण्याचे दुष्कृत्य करित आहे. अध्यात्म हे माणसामाणसात भेद करित नाही. ते प्राणीमांत्राप्रति देखील माणसाच्या मनात मंगलमैत्री निर्माण करते. परंतु, समितीचे अध्यात्म अशा सम्यक जीवनशैली चे नसून कर्मकांडाच्या समाजाला नेऊन त्याच समाजाकडून धनसंपत्तीची लूट करणारे आहे. खरेतर, त्यांनी अध्यात्माचा केलेला दावा हा नुसता बनाव आहे. त्यांचे लक्ष मानवा-मानवात भेद निर्माण करण्याचे आहे. ज्यातून इतर धर्म, प्रांत, लिंग जात देश यांच्यात एक भेदभाव निर्माण करून त्यांना आपसात लढवायचे आणि त्यातच त्या मानवी समुदायाला अस्थिर करून भौतिक विकासापासून वंचित ठेवायची यामागे रणनिती आहे. जेथे समतेची आणि मैत्रीची भावना निर्माण होते तेथे जात-धर्म-प्रांत-देश-लिंग याच्या मर्यादा गाडल्या जातात किंवा गळून पडतात; किंबहुना, आपण असे म्हणूया की, अशा संकुचित भावनांच्या पलिकडे माणूस जातो आणि तो समतेच्या भावनेने तो सर्वांशी व्यवहार करतो. त्यामुळे कोणत्याही एखाद्या धर्माचे राष्ट्र निर्माण करण्यात त्याला रस नसतो. ही वस्तुस्थिती जर आपण अध्यात्मातून माणसाच्या होणाऱ्या मानसिक विकासाच्या प्रक्रियेचा भाग म्हणून पाहीली, तर समितीचा एखाद्या धर्माचा राष्ट्रवाद निर्माण करण्याची भूमिका ही माणसाच्या एकूणच भौतिक आणि अध्यात्मिक विकासाच्या विरोधातली आहे. माणूस हा जसा जसा विज्ञानाच्या विचारांकडे जातो तसा तसा वैज्ञानिक अध्यात्म समजून घेण्याचीही त्याची मानसिकता विकास पावते. त्यामुळे त्यासाठी धर्माच्या नशेची गोळी देण्याची प्रक्रिया त्या माणसावर होते तेव्हा त्यापासून तो अलिप्त होतो. धर्म हा माणसाला आवश्यक आहे; त्याच बरोबर अध्यात्मही आवश्यक आहे! परंतु, या दोघांची प्रक्रिया माणसाला अंधश्रद्धेकडे नेणारी नसावी, हेच आजच्या आधुनिक आणि वैज्ञानिक जगाला अपेक्षित आहे.
समाप्त (भाग-४)
COMMENTS