बीड प्रतिनिधी - शहरातील मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी कर्मयोगी आबासाहेब या मराठी चित्रपटात पत्रकाराचीच भूमिका साकारली असून पत्रकारितेच्या क्षेत

बीड प्रतिनिधी – शहरातील मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी कर्मयोगी आबासाहेब या मराठी चित्रपटात पत्रकाराचीच भूमिका साकारली असून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असताना चित्रपटातही पदार्पण केले आहे.
महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारत देशात तहहयात एकाच पक्षाशी एकनिष्ठ राहत उच्च नितीमूल्य जोपासत एक दोन नव्हे तर तब्बल अकरा वेळा आमदार म्हणून निवडून येत शेतकरी कामगार पक्षाचे भाई गणपतराव उर्फ आबासाहेब देशमुख यांनी एवढा मोठा कालावधी केवळ राजकारण न करता आपल्या कार्यातून शेवटच्या श्वासापर्यंत समाजकारण केले. ज्यांना जनतेने मोठ्या अभिमानाने कर्मयोगी म्हटले. अशा या व्यक्तिमत्त्वावर सोलापूरचे भूमिपुत्र तथा बीड जिल्ह्याचे जावई असलेले लेखक दिग्दर्शक अल्ताफ शेख यांनी कर्मयोगी आबासाहेब हा त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनविण्याचा विडा उचलला असून या चित्रपटाचे चित्रीकरण सोलापूर जिल्ह्याच्या सांगोल तालुक्यातील हातीद येथे जोमात सुरू आहे. नीतिमूल्य जपणार्या आबासाहेब यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वावर अल्ताफ शेख हे चित्रपट बनवीत असल्याने ही सोलापूर-बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राला अभिमानाची बाब आहे. या चित्रपटात आबासाहेबांची भूमिका प्रसिद्ध अभिनेते अनिकेत विश्वासराव साकारत आहे. देविका दप्तरदार, निकिता सुखदेव, विजय पाटकर, प्रदीप वेलणकर, सुरेश विश्वकर्मा, अनिल नगरकर, अक्षय धोत्रे यांच्यासह अन्य नामवंत कलाकारांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. नामवंत संगीतकार अवधूत गुप्ते हे चित्रपटात संगीत देत असून सुप्रसिद्ध गायक कुणाल गांजावाला आणि मनीष रांजणे यांनी गीते गायली आहेत. या चित्रपटाची निर्मिती बाळासाहेब एरंडे (मालक), मारुती बनकर (आबा) यांनी मायाक्का माऊली फिल्म प्रोडक्शन हाऊस आणि मुंबई क्रिएशन एंटरटेनमेंट एक्झिक्युटिव्ह प्रोडूसर अहेमद खान शेख यांनी संयुक्तरित्या केली आहे. या चित्रपटात आमदार आबासाहेब यांची मुलाखत घेणार्या पत्रकाराची भूमिका लेखक दिग्दर्शक अल्ताफ शेख यांनी एस.एम.युसूफ़ यांना दिली. यादृश्याचे चित्रीकरण 11 ऑगस्ट 2023 शुक्रवार रोजी हातीद येथे पार पडले. हा चित्रपट फेब्रुवारी 2024 ला महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. गेल्या दहा वर्षांपासून पत्रकारिताक्षेत्रात मुक्तपत्रकार म्हणून कार्यरत असलेले एस.एम.युसूफ़ यांनी याद्वारे आता चित्रपटातही पदार्पण केले आहे.
COMMENTS