अहिल्यानगर : नाशिकसह संपूर्ण राज्यात खळबळ माजवणार्या स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ हायप्रोफाईल असलेल्या अशोक खरात प्रकरणी राज्य सरकारने विशेष तपास पथ

अहिल्यानगर : नाशिकसह संपूर्ण राज्यात खळबळ माजवणार्या स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ हायप्रोफाईल असलेल्या अशोक खरात प्रकरणी राज्य सरकारने विशेष तपास पथकाची अर्थात एसआयटीची स्थापना केली असून, या पथकाचे नेतृत्व आयपीएस अधिकारी तेजस्विनी साततपुते यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. या निर्णयामुळे आता या प्रकरणातील गुंतागुंतीचे धागेदोरे उलगडण्याची शक्यता अधिक बळावली आहे.
राज्याच्या गृह विभागाने दिलेल्या आदेशानुसार, खरातविरोधात नाशिक शहर, नाशिक ग्रामीण आणि अहिल्यानगर जिल्ह्यात नोंदवलेले तीन स्वतंत्र गुन्हे आता एकत्रितपणे तपासले जाणार आहेत. यासाठी संबंधित सर्व पोलीस ठाण्यांना त्यांच्या ताब्यातील पुरावे, कागदपत्रे आणि जप्त साहित्य तातडीने विशेष तपास पथकाकडे सुपूर्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या पद्धतीमुळे तपास अधिक समन्वयाने आणि व्यापक पातळीवर होणार आहे. या प्रकरणात नोंदवलेल्या गुन्ह्यांचे स्वरूप अत्यंत गंभीर आहे. एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप, अश्लील चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी देत मोठी खंडणी मागितल्याचा गुन्हा, तसेच वैयक्तिक छायाचित्रे सामाजिक माध्यमांवर प्रसारित केल्याचा आरोप अशा विविध प्रकारच्या गुन्ह्यांमुळे प्रकरणाची भीषणता स्पष्ट होते. या सर्व गुन्ह्यांच्या मुळाशी एक संगनमत किंवा जाळे कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तपासातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे जप्त करण्यात आलेल्या संचिकेत आढळलेले आक्षेपार्ह चित्रफितींचे संकलन. या चित्रफितींमधून अनेक महिलांची ओळख, त्यांचे शोषण कशा प्रकारे झाले, तसेच यामागे कोणते मोठे जाळे कार्यरत आहे, याचा तपास करण्यात येणार आहे. याशिवाय खरातच्या धार्मिक संस्थेच्या माध्यमातून झालेल्या आर्थिक व्यवहारांचाही बारकाईने छडा लावला जाणार आहे. अशोक खरातने स्वतःभोवती उभारलेली धार्मिक आणि अध्यात्मिक प्रतिमा ही या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाची बाब ठरत आहे. या प्रतिमेचा आधार घेत त्याने लोकांचा विश्वास संपादन करून महिलांना जाळ्यात ओढल्याचा आरोप आहे. त्यामुळे धार्मिक आडोशाचा गैरवापर करून शोषणाचे जाळे उभारले गेले का, याचीही सखोल चौकशी होणार आहे. सध्या अशोक खरात पोलीस कोठडीत असून, आगामी काळात विशेष तपास पथकाच्या चौकशीतून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणामुळे समाजात निर्माण झालेली अस्वस्थता आणि संताप लक्षात घेता, या तपासाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
शिर्डी, नाशिकमध्ये तीन गुन्हे दाखल
अशोक खरात याच्यावर तीन वेगवेगळ्या पोलिस स्टेशनमध्ये तीन गुन्हे दाखल आहेत. नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात एका 35 वर्षीय महिलेवर लैंगिक शोषण आणि बलात्काराचा आरोपाचा गुन्हा दाखल आहे. नाशिक ग्रामीणच्या वावी पोलिस ठाण्यात अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल आहे. तर अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी पोलिस ठाण्यात पीडितेचे वैयक्तिक फोटो सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा आरोपाचा गुन्हा दाखल असून 58 व्हिडिओप्रकरणात आणखी काही महिला पुढे येऊन गुन्हे दाखल करण्याची शक्यता आहे.

COMMENTS