Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नागाचे कुमठे कुस्ती मैदानात सिकंदर शेख याने महाराष्ट्र केसरी बालारफिक शेखला पाच मिनिटात दाखविले अस्मान

औंध / वार्ताहर : खटाव तालुक्यातील नागाचे कुमठे येथे झालेल्या कुस्त मैदानात गंगावेश तालमीचा पैलवान सिकंदर शेखने महाराष्ट्र केसरी बालारफिक शेखला आक

महाराष्ट्र दिनी ‘महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धे’चे आयोजन करणार : उपमुख्यमंत्री पवार
दिल्ली येथील राष्ट्रीय तायक्वादो स्पर्धेत  लोह्याच्या वर्षा तोंडारेची कास्यपदाकाची कमाई
Sangamner : महिला बॉक्सिंग राज्यस्तरीय स्पर्धेत ऋतूजा राहाणेला कांस्य पदक (Video)

औंध / वार्ताहर : खटाव तालुक्यातील नागाचे कुमठे येथे झालेल्या कुस्त मैदानात गंगावेश तालमीचा पैलवान सिकंदर शेखने महाराष्ट्र केसरी बालारफिक शेखला आकडी डावावर अवघ्या साडेपाच मिनिटात चितपट करत उपस्थित कुस्ती शौकीनांची मने जिंकली. दोन लाख 51 हजार रुपयांची कुस्ती निकाली झाल्याने कुस्ती शौकिनांनी एकच जल्लोष केला.
कोरोना काळानंतर दोन वर्षांनी कुस्ती मैदान सुरू झाल्याने हजारो कुस्ती शौकीनांनी उपस्थिती लावली. सायंकाळी साडेपाच वाजता प्रथम क्रमांकाची महाराष्ट्र केसरी बालारफिक शेख आणि सिकंदर शेख यांची कुस्ती डीवायएसपी प्रेरणा कट्टे, जीवन कट्टे, गुलाबराव फडतरे, संजय मांडवे, पीएसआय अशोक कदम, महाराष्ट्र केसरी धनाजी फडतरे, बाळासाहेब पडघम, जितेंद्र पवार, हिंदकेसरी संतोष वेताळ, संदीप मांडवे, मंगेश फडतरे, अमोल फडतरे, वैभव फडतरे, संग्राम माने, पांडुरंग मांडवे, नवल थोरात यांच्या उपस्थितीत लावण्यात आली.
कुस्तीच्या सलामीला बालारफिकचा एकेरी पट काढण्याचा प्रयत्न सिकंदरने धुडकावून लावला. आक्रमक झालेला सिकंदर समोरून खेचून ताबा घेण्यात अयशस्वी झाला. पुन्हा एकदा बालारफिकचा एकेरी पट काढण्याचा डाव त्याच्यावर उलटला. ताबा घेऊन पाचव्या मिनिटाला सिकंदरने आकडी डावावर त्याला पराभवाची धूळ चारली. द्वितीय क्रमांकाची नागनाथ मंडळाने एक लाख 51 हजार इनामासाठी पुरस्कृत प्रकाश बनकर विरुध्द पृथ्वीराज मोहोळ ही बराच वेळ चाललेली कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली. मार्डीच्या भैय्या चव्हाण पुढे पुण्याच्या रोहित कारलेची डाळ शिजली नाही. प्रशांत शिंदे आणि ठावरे कुस्ती बरोबरीत सुटली.
मनोज कदम (नांदोशी), संग्राम सुर्यवंशी (लांडेवाडी), मंगेश माने (कुंडल), अमित सूळ (नातेपुते), विशाल राजगे (पिंपरी), वेदांत शेलार (एकसळ), साहिल शिंदे, सचिन पाटील (कोल्हापूर) यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर नेत्रदीपक विजय मिळवून उपस्थितांची वाहवा मिळवली. गणेश फडतरे, आदित्य फडतरे, श्रीधर गोडसे, साहिल कंठे, सोहम गुरव, रणजित फडतरे, ओमकार फडतरे आदी स्थानिक मल्ल प्रतिस्पर्धी मल्लांना भारी ठरले. ग्रामस्थांनी देखील बक्षीस देऊन उदयन्मुख मल्लांचे कौतुक केले. यावेळी पंच म्हणून नाथा धोत्रे, अमोल फडतरे, वैभव फडतरे, मंगेश फडतरे, विकास जाधव, बाळू पडघम, सचिन शेलार, किरण जाधव, संग्राम माने, अशोक कदम, वामन बोडरे, पांडुरंग मांडवे यांनी काम पाहिले. प्रशांत भागवत, अनिकेत कदम यांनी समालोचन केले. डीवायएसपी डॉ. निलेश देशमुख, सपोनि प्रशांत बधे, रणधीरसिंग पोंगल, काका शेळके, प्रा. बंडा गोडसे, शहाजी पवार, राजाभाऊ मोहोळ, नयन निकम यांच्यासह मान्यवरांनी हजेरी लावून कुस्त्यांचा आनंद घेतला.

द्वितीय क्रमांकाच्या कुस्तीसाठी सदाशिवनगर येथील प्रकाश बनकर विरुध्द खेळण्यासाठी महाराष्ट्रातील कोणीही तयार नव्हते, मात्र त्यानंतर पंजाब येथे असलेला मल्ल पृथ्वीराज मोहोळ यांनी हे आव्हान स्वीकारत कडवी झुंज दिली. त्यामुळे या कुस्तीकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, कुस्ती बरोबरीत सुटल्याने कुस्ती शौकीनांची नाराजी झाली. महिलांच्या एकमेव लढतीत स्थानिक महिला मल्ल श्रेया मांडवे विरुध्द साक्षी मोरे यांच्यातील चुरशीच्या लढतीत श्रेया मांडवे भारी ठरली.

COMMENTS