Homeताज्या बातम्यादेश

छत्रपती शिवाजी महाराज होते पाटीदार समाजाचे

भाजप मंत्री सी.आर. पाटीलांच्या वक्तव्यानंतर संतापाची लाटसुरत ः केंद्रीय जलशक्ती मंत्री आणि गुजरात भाजपचे नेते सी. आर. पाटील यांनी सुरतमधील एका कार

छ.शिवाजी महाराजांचे स्थापत्यशास्त्र अजरामर
शिवरायांचा कारभार हा लोककल्याणकारी होता : माजी आ. काळे
शिवरायांचे विचार अंगिकारल्यास स्वराज्य उभे राहील : नागवडे

भाजप मंत्री सी.आर. पाटीलांच्या वक्तव्यानंतर संतापाची लाट
सुरत ः केंद्रीय जलशक्ती मंत्री आणि गुजरात भाजपचे नेते सी. आर. पाटील यांनी सुरतमधील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते, असे विधान केले. या वक्तव्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होताच महाराष्ट्रात संताप उसळला. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची पार्श्‍वभूमी असताना असे विधान केवळ अज्ञानातून झाले की जाणीवपूर्वक राजकीय गणितातून, हा प्रश्‍न उपस्थित होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एका राज्याचे किंवा समाजाचे नेतृत्व करणारे व्यक्तिमत्त्व नव्हते, तर त्यांनी संपूर्ण देशाला स्वराज्य, स्वाभिमान आणि लोककल्याणाची दिशा दाखवली. रयतेच्या सुखासाठी स्वतःचे आयुष्य पणाला लावणारे महाराज हे भारताच्या इतिहासातील अढळ प्रेरणास्थान आहेत. त्यामुळे त्यांच्या संदर्भात बोलताना शब्दांची जबाबदारी आणि इतिहासाची जाण असणे अत्यावश्यक असतांना केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांच्या वक्तव्याने नवा वाद उफाळून आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा सर्वसमावेशक आहे. त्यांनी कधीही स्वतःला एखाद्या जातीपुरते किंवा समाजापुरते मर्यादित केले नाही. उलट, सर्व जाती-धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची उभारणी केली. अशा महामानवाला एका विशिष्ट समाजाच्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न म्हणजे इतिहासाचे सरलीकरण नव्हे, तर त्याची तोडफोड आहे, अशी भावना राज्यभरातून व्यक्त होत आहे. इतिहास अभ्यासकांनीही या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अशा प्रकारची विधाने करणे म्हणजे इतिहासाचा अभ्यास न करता व्यासपीठाचा वापर करणे होय. महाराज कोणत्या समाजाचे होते? हा प्रश्‍नच त्यांच्या महानतेला लहान करणारा असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. संभाजी ब्रिगेडसह विविध सामाजिक संघटनांनीही या विधानाचा निषेध नोंदवला. महाराजांना समजून घ्यायचे असतील तर त्यांच्या गड-किल्ल्यांवर जावे, त्यांच्या कार्याचा अभ्यास करावा आणि त्यांच्या विचारांचा सन्मान करावा, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. केवळ राजकीय फायद्यासाठी महाराजांच्या नावाचा वापर करणे हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. या संपूर्ण वादातून एक बाब ठळकपणे पुढे येते-छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्याही एका समाजाचे नसून संपूर्ण राष्ट्राचे आहेत. त्यांना जात, प्रांत किंवा राजकारणाच्या चौकटीत अडकवण्याचा कोणताही प्रयत्न महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का देणारा आहे. त्यामुळे सी. आर. पाटील या वक्तव्यावर काय भूमिका घेतात, माफी मागतात का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. मात्र इतिहासाशी छेडछाड करण्याचा प्रयत्न झाला, तर त्याला तीव्र विरोध होणार, हे मात्र निश्‍चित आहे.

महाराजांचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न ः खा. राऊत
राजकीय स्तरावरही या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले. खासदार संजय राऊत यांनी या विधानावरून भाजपवर जोरदार हल्ला चढवला. महाराजांचा इतिहास बदलण्याचा किंवा त्यांना वेगळ्या ओळखीशी जोडण्याचा प्रयत्न महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. निवडणुकांच्या तोंडावर भावनिक विषय उकरून मतांचे ध्रुवीकरण करण्याचा हा प्रकार असल्याचा आरोपही त्यांनी केला.

COMMENTS