नौदलाच्या नव्या ध्वजावर शिवरायांच्या राजमुद्रेची छटा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नौदलाच्या नव्या ध्वजावर शिवरायांच्या राजमुद्रेची छटा

कोची : भारतीय नौदलाच्या नव्या ध्वजाचे शुक्रवारी पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यासोबतच आयएनएस विक्रांत ही स्वदेशी विमानवाहू युद्धनौका अधिक

राज्यात थंडीचा जोर वाढला
संस्थात्मक पिककर्ज प्रणाली बाहेरील आदिवासी शेतकर्‍यांसाठी सर्वसमावेशक प्रस्ताव सादर करा ः उपमुख्यमंत्री पवार
अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापूस, सोयाबीन अनुदान वितरण सुरू

कोची : भारतीय नौदलाच्या नव्या ध्वजाचे शुक्रवारी पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यासोबतच आयएनएस विक्रांत ही स्वदेशी विमानवाहू युद्धनौका अधिकृतपणे नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. केरळच्या कोची येथील नौदलाच्या शिपर्यार्डमध्ये हे दोन्ही कार्यक्रम झालेत.
भारतीय नौदलाच्या नव्याने अनावरण करण्यात आलेल्या ध्वजावर एका बाजूला डाव्या कोपर्‍यात भारताचा राष्ट्रध्वज आहे तर त्याच्या बाजूला भारतीय नौदलाचे चिन्ह आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नौदलाचा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित केला आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या आरमार दलाचा उल्लेख केला. यावेळी मोदी म्हणाले की, भारतीय नौदलाचा ध्वज शिवरायांनी समर्पित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभारले होते. शिवरायांनी नौदलाचा विकास केला. भारताने नौदलाचा जुना झेंड बदलून गुलामगिरीची निशाणी उतरवली आहे. यापूर्वी भारतीय नौदलाच्या ध्वजावर सेंट जॉर्ज क्रॉसचे चिन्ह होते. हे हटवून आता झेंड्यावर नांगर असणारे भारतीय नौदलाचे चिन्ह आहे. त्यावर सत्यमेव जयते आणि श नो वरुण: हे ब्रीद लिहिलेले आहे. याचा अर्थ ’जलदेवता वरुण आम्हांला आशीर्वाद देवो’ असा आहे. त्यासोबतच देशाची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत भारतीय नौदलाच्या सेवेत रुजू झाली आहे. हे संरक्षण क्षेत्रातीलस्वावलंबनाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. या युद्धनौकेची रचना स्वदेशी आहे. भारतीय नौदलाच्या स्वतःच्या संस्थेच्या वॉरशिप डिझाइन ब्युरोने युद्धनौका डिझाइन केली आहे. तर बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या कोचीन शिपयार्ड लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील शिपयार्ड कंपनीने ही युद्धनौका तयार केली आहे.

असा आहे नौदलाचा नवा ध्वज
भारतीय नौदलाचा ध्वज आजपर्यंत तब्बल चार वेळेस बदलण्यात आला आहे. आता नौदलाच्या नव्या ध्वजामध्ये डाव्या बाजूच्या वरच्या कोपर्‍यात भारताचा तिरंगा आहे. तर उजव्या बाजूला अष्टकोनी आकारामध्ये निळ्या पार्श्‍वभूमीवर सोनेरी रंगात अशोकस्तंभ आणि नौकांचा नांगर काढण्यात आला आहे. या अष्टकोनी आकाराला सोनेरी रंगात दुहेरी किनार काढण्यात आली आहे. सर्वात बाहेरची किनार ही जाड आणि त्याच्याआतील किनार ही काहीशी बारीक आहे. छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेचा आकार आणि त्याला असलेली दुहेरी किनार यावरून प्रेरणा घेऊन ध्वजासाठी ही नक्षी तयार करण्यात आली आहे. अशोकस्तंभाच्या खाली ‘सत्यमेव जयते’ असे निळ्या रंगात लिहिण्यात आले आहे. त्यासोबत नांगराच्या खाली ‘श नो वरुण’ हे नौदलाचे ब्रीदवाक्य लिहिण्यात आले आहे.

नवा ध्वज छत्रपती शिवरायांना समर्पित : पंतप्रधान मोदी
भारताने गुलामगिरीचे एक चिन्ह आपल्या छातीवरून उतरवून ठेवले असून, आजपासून भारतीय नौसेनेला एक नवा ध्वज मिळाला आहे. आत्तापर्यंत भारतीय नौसेनेच्या ब्रिटिश ध्वजावर गुलामगिरीचे चिन्ह होते. पण आजपासून छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन नौदलाचा नवा ध्वज समुद्रात आणि आकाशात फडकेल. हा नवा ध्वज नौसेनेचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांना मी समर्पित करतो. मला विश्‍वास आहे की भारतीयत्वाच्या भावनेने भारलेला हा नवा ध्वज भारतीय नौदलाच्या आत्मसन्मान आणि आत्मसामर्थ्याला नवी ऊर्जा देईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

COMMENTS