Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर ; डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. त्यांच्या निधनानंतर देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाही

केंद्र सरकारकडून राष्ट्रीय जल पुरस्कारांची घोषणा
वर्षभरात एमआयडीसीमध्ये अग्निशमन केंद्र उभारणार ः उद्योगमंत्री सामंत
राहुल गांधी आणि विरोधी पक्षनेतेपद

नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. त्यांच्या निधनानंतर देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. या काळात देशातील सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तसेच राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जाणार आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मरणार्थ, 26 डिसेंबर 2024 ते 01 जानेवारी 2025 या दोन्ही दिवसांसह संपूर्ण भारतभर सात दिवसांचा राजकीय दुखवटा पाळला जाईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत संपूर्ण भारतामध्ये राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकवला जाईल, जेथे तो नियमितपणे उंच फडकवला जातो तसेच देशभरात या दुखवटा कालावधीत कोणतेही अधिकृत मनोरंजनपर कार्यक्रम होणार नाहीत. दिवंगत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. शुक्रवार दिवसभर त्यांचे पार्थिव दिल्लीतील 3 मोतीलाल मार्ग या त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. माजी पंतप्रधान, अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झाले. मृत्यूसमयी ते 92 वर्षांचे होते. प्रकृती खालावल्याने गुरुवारी संध्याकाळी त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. तिथेच उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.
डॉ. मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पंजाबमधील गाह येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गुरुमुख सिंग तर आईचे नाव अमृत कौर होते. फाळणीच्या वेळी त्यांचे कुटुंब भारतातील अमृतसर येथे आले. दहावीनंतर ते उच्च शिक्षणासाठी ब्रिटनच्या केंब्रिज विद्यापीठात गेले. कँब्रीज विद्यापीठातून त्यांनी 1957 मध्ये अर्थशास्त्रात प्रथम श्रेणी सन्मान पदवी प्राप्त केली. यानंतर त्यांनी 1962 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या नफिल्ड कॉलेजमधून अर्थशास्त्रात डी.फिल पदवी मिळवली. त्यानंतर यांनी पंजाब विद्यापीठ आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्येही अध्यापन केले आहे. मनमोहन सिंग 1971 मध्ये भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून रुजू झाले. त्यानंतर लगेचच 1972 मध्ये त्यांची अर्थ मंत्रालयात मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी भूषवलेल्या अनेक सरकारी पदांमध्ये अर्थ मंत्रालयातील सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशा अनेक पदांचा समावेश आहे. मनमोहन सिंग तब्बल 32 वर्षे खासदार होते. विद्वान, मृदू, मितभाषी आणि संवेदनशील नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे. जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर ते पहिलेच असे पंतप्रधान होते. सिंग यांची भारतातील सुप्रसिद्ध अर्थतज्ञांमध्ये गणना होते. त्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) 15 वे गव्हर्नर म्हणूनही काम केले होते. मनमोहन सिंग यांनी 1958 मध्ये गुरशरण कौर यांच्याशी विवाह केला. मनमोहन सिंग यांना अमृत सिंग, दमन सिंग आणि उपिंदर सिंग अशा तीन मुली आहेत.
त्यांनी 2005 मध्ये आणलेल्या या कायद्याने प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला 100 दिवसांच्या मजुरीच्या रोजगाराची हमी दिली, लाखो लोकांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा केली आणि ग्रामीण पायाभूत सुविधा वाढल्या. तसेच 2005 मध्ये पारित झालेल्या आरटीआयने नागरिकांना सार्वजनिक प्राधिकरणांकडून माहिती मिळविण्याचे अधिकार दिले, ज्यामुळे प्रशासनातील पारदर्शकता आणि जबाबदारीला चालना मिळते. आधार प्रकल्प रहिवाशांना अद्वितीय ओळख देण्यासाठी, विविध सेवांमध्ये प्रवेश सुलभ करण्यासाठी सुरू करण्यात आला. डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सरकारने थेट लाभ हस्तांतरण प्रणाली लागू केली, ज्याने कल्याणकारी वितरण सुव्यवस्थित केले आणि अनेक त्रुटी दूर केल्या. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळातच कृषी संकटावर मात करण्यासाठी 60 हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीद्वारे शेतकर्‍यांना दिलासा देण्यात आला होता.

भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक बाजारपेठ खुली केली
मनमोहन सिंग हे 1991 ते 1996 दरम्यान भारताचे अर्थमंत्रीही होते. आर्थिक सुधारणांचे सर्वसमावेशक धोरण सुरू करण्याच्या त्यांच्या भूमिकेचे जगभरात कौतुक होत आहे. मनमोहन सिंग 1991 मध्ये पहिल्यांदा राज्यसभेवर निवडून आले होते. डॉ. मनमोहन सिंग यांनी 2004 च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर 22 मे रोजी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आणि 22 मे 2009 रोजी दुसर्‍यांदा पदाची शपथ घेतली. त्यांनी 2004 ते 2014 पर्यंत तब्बल 10 वर्षे देशाचे पंतप्रधानपद भूषवले होते. डॉ. मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्री असताना 1991 मध्ये सुरू झालेल्या आर्थिक उदारीकरणात महत्त्वाची भूमिका बजावली होती. यामध्ये सरकारी नियंत्रणे कमी करणे, थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) वाढवणे आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला जागतिक बाजारपेठेसाठी खुले करणार्‍या संरचनात्मक सुधारणांची अंमलबजावणी करणे यांचा समावेश आहे.

या पुरस्कारांनी करण्यात आला होता सन्मान
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना त्यांच्या सार्वजनिक कारकिर्दीत बहाल करण्यात आलेल्या अनेक पुरस्कार आणि सन्मानांपैकी सर्वात प्रमुख म्हणजे भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार, पद्मविभूषण (1987). याशिवाय त्यांना इंडियन सायन्स काँग्रेसचा जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी पुरस्कार (1995), आशिया मनी अवॉर्ड फॉर फायनान्स मिनिस्टर ऑफ द इयर (1993 आणि 1994), युरो मनी वॉर्ड फॉर फायनान्स मिनिस्टर ऑफ द इयर (1993), केंब्रिज. विद्यापीठ (1956) त्याला डम स्मिथ पुरस्कार, सेंट जॉन्स कॉलेज, केंब्रिज (1955) येथे उत्कृष्ट कामगिरीसाठी राईट पुरस्कार देखील मिळाला. जपानी निहोन केझाई शिंबून आणि इतर देशांनी त्यांचा गौरव केला. केंब्रिज आणि ऑक्सफर्ड आणि इतर अनेक विद्यापीठांनी डॉ.मनमोहन सिंग यांना मानद पदवी प्रदान केली होती.

मानवी जीवन सुखकर करण्यासाठी अथक प्रयत्न : पंतप्रधान मोदी
देशातील प्रतिष्ठित नेत्यांपैकी एक असलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल आज भारत शोक व्यक्त करत आहे. सामान्य पार्श्‍वभूमी असलेले डॉ. मनमोहन सिंग एक विख्यात अर्थतज्ज्ञ बनले. त्यांनी अर्थमंत्री आणि इतरही अनेक पदांवर काम करत अनेक वर्ष आपल्या आर्थिक धोरणांवर छाप सोडली. संसदेत त्यांनी मांडलेले मुद्देही व्यावहारिक असत. पंतप्रधान म्हणून काम करत असताना त्यांनी जनतेचे जीवन सुखकर करण्यासाठी अथक प्रयत्न केले. या दुःखद प्रसंगी डॉ. मनमोहन सिंग यांचे कुटुंबिय, मित्र आणि हितचिंतकांच्या प्रती मी सहसंवेदना व्यक्त करतो. ओम शांती

माझे आदर्श आणि मार्गदर्शक गमावले : खा. राहुल गांधी
डॉ. मनमोहन सिंग यांनी एकात्मतेच्या, राष्ट्रीयत्वाच्या भावनेने देशाचा कारभार चालवला. त्यांची अर्थशास्त्रातली जाण खूप उत्तम होती. त्याचा आदर्श देश कायम घेत राहिल.श्रीमती कौर आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब यांच्या प्रति मी सहवेदना व्यक्त करतो. मी आज माझे आदर्श आणि माझे मार्गदर्शक गमावले आहेत. काँग्रेस पक्षातले माझ्यासारखे लाखो लोक मनमोहन सिंग यांची आठवण अभिमानाने काढतील, त्यांना कायम स्मरणात ठेवतील. अशा शब्दांत खासदार राहुल गांधींनी श्रद्धांजली वाहिली आहे.

देशाने प्रशासक, अर्थतज्ञ गमावला : मुख्यमंत्री फडणवीस
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाने देशाने एक उमदा प्रशासक, अर्थतज्ञ गमावला आहे, अशी शोकसंवेदना फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, अर्थमंत्री, पंतप्रधान अशा विविध भूमिकांमधून त्यांनी काम केले आणि देशवासियांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. भारताच्या राजकारणात स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अर्थशास्त्राशी संबंधित विपूल लेखन सुद्धा त्यांनी केले. त्यांनी केलेले कार्य कायम देशवासियांच्या स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि चाहत्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. हे दु:ख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना लाभो, अशी मी प्रार्थना करतो.

जागतिक धुरंधर नेता गमावला : खा. शरद पवार
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी ऐकून अतीव दु:ख झाले. आपल्या देशाने एक महान अर्थतज्ज्ञ, द्रष्टा सुधारणावादी आणि जागतिक धुरंधर नेता गमावला आहे, अशा शब्दात शरद पवार यांनी मनमोहन सिंग यांना आदरांजली अर्पण केली. खरं तर मनमोहन सिंग यांचा पिंड राजकारणाचा नव्हता. ते अर्थतज्ज्ञ, विचारवंत होते. मनमोहन सिंग यांच्याइतका स्वच्छ, विनम्र, देशाच्या हितासंबंधी यत्किंचितही तडजोड न करणारे नेतृत्व मी पाहिले नाही.

जागतिक दर्जाचा अर्थतज्ज्ञ गमावला :राज्यपाल राधाकृष्णन
देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह हे जागतिक दर्जाचे अर्थतज्ज्ञ, मुत्सद्दी आणि संसदपटू होते. डॉ. सिंह यांच्या निधनाबद्दल राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी तीव्र दुःख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांमधून त्यांनी संसदेतील चर्चांचा स्तर उंचावला. त्यांच्या निधनामुळे भारताने जागतिक ख्याती लाभलेले अर्थतज्ज्ञ, संसदपटू व विद्वान व्यक्तिमत्व गमावले आहे. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांप्रति शोकसंवेदना व्यक्त करतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

COMMENTS