Homeताज्या बातम्यासंपादकीय

हंगाम, पेरणी आणि भुजबळ !

लोकशाहीचा उत्सव संपलेला आहे, अर्थात पेरणी झाली असून, पीक देखील हाती आल्यानंतर आता ओबीसी नेते छगन भुजबळ कुरकुर करतांना दिसून येत आहे. कारण भुजबळां

हिजाबचा शिक्षणात काय फायदा ?
अर्थसंकल्प आणि शेतकरी
धोकादायक इमारतींचा प्रश्‍न ऐरणीवर

लोकशाहीचा उत्सव संपलेला आहे, अर्थात पेरणी झाली असून, पीक देखील हाती आल्यानंतर आता ओबीसी नेते छगन भुजबळ कुरकुर करतांना दिसून येत आहे. कारण भुजबळांनी पिकासाठी शेत व्यवस्थित तयार करून घेतले, त्यात पेरणी केली, आणि पीक आले तेव्हा त्यातील वाटा भुजबळांना मिळालाच नाही. त्यामुळे भुजबळांनी जाहीर नाराजी व्यक्त करत पक्षनेतृत्वावर त्यांनी थेट टीका केली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी महायुतीला प्रचंड विरोध होतांना दिसून येत आहे. विशेष म्हणजे महायुतीचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर मराठा आरक्षणाचा लढा तीव्र करणारे मनोज जरांगे यांनी एकेरी आणि तीव्र शब्दांत टीका केली होती. त्यावेळेस काउंटर हल्ला चढवण्यात भुजबळ भाजप नेत्यांपेक्षाही पुढे होते. ओबीसींचा बालेकिल्ला भुजबळांनी भक्कमपणे घेवून लढला. विविध जिल्ह्यात ओबीसींच्या सभा घेत त्यांनी महाराष्ट्रातील वातावरण ढवळून टाकले होते. मात्र सत्ता आल्यानंतर आपल्याला डावलले जाईल असे भुजबळांना स्वप्नातदेखील वाटले नव्हते, त्यामुळे त्यांच्या नाराजीचा स्फोट झाला नसता तर नवल वाटायला नको. मात्र आता पीक येवून गेलेले आहे, शेतात काहीच नाही, त्यामुळे राज्यकर्ते आगामी पाच वर्षे निवांत आहेत, अशावेळी भुजबळांनी पुकारलेला एल्गार यशस्वी होईल की नाही सांगता येत नाही. भुजबळांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आपल्या तक्रारी त्यांच्यासमोर मांडल्या. त्या फडणवीस यांनी ऐकून घेत पुढील 8-10 दिवसांत तोडगा काढू असे आश्‍वासन दिले, त्यानंतर भुजबळ दिल्लीदरबारी दाखल झाल्याच्या चर्चा आहेत. खरंतर भुजबळ लवकरच भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. कारण राज्य मंत्रिमंडळाचा 15 डिसेंबर रोजी विस्तार झाला. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना स्थान मिळाले नाही. यामुळे भुजबळ अजित पवारांवर प्रचंड नाराज झालेत. या प्रकरणी त्यांनी अजित पवारांसह सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल यांच्यावर जाहीरपणे टीका केली. तसेच ओबीसीच्या मुद्यावरून राज्यभर रान पेटवण्याचा इशाराही दिला. त्यातच त्यांनी ’जहां नहीं चैना वहां नही रहना’ असे म्हणत एकप्रकारे त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याचेच संकेत दिलेत. तसेच काहीसे दिसून येत आहे. कारण भुजबळांनी देवेंद्र फडणवीसांची घेतलेली भेट. खरंतर यामागचे मुख्य कारण म्हणजे भुजबळांनी त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, पक्षाचे प्रमुख अजित पवार यांची भेट घेणे टाळले आहे. तसेच प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे या नेत्यांची भेट घेणे टाळत त्यांनी फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे राज्यात नवे काहीतरी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. वास्तविक पाहता भुजबळ ओबीसी समाजातून येतात. समता परिषदेच्या माध्यमातून त्यांनी ओबीसी चळवळीची मूठ बांधली आहे. अशावेळी त्यांना डावलून चालणार नाही, याची भाजप नेत्यांना जाणीव असली तरी, त्यांच्या पक्षाला त्याची जाणीव नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आगामी दिवसांत भुजबळ बंड करतात, की त्यांचे बंड शमते, ते आगामी काही दिवसांतच स्पष्ट होईल. खरंतर भुजबळ महत्वाकांक्षी नेते आहेत. त्यामुळे ते जास्त दिवस आपली महत्वाकांक्षा लपवून ठेवणार नाहीत. त्यामुळे लवकरच भुजबळ निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. ओबीसी समाजाचे प्रश्‍न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. अशावेळी त्यांच्या प्रश्‍नांची धार मजबूत करण्यासाठी ओबीसींचा नेता म्हणून पर्याय हवा आहे. खरंतर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ओबीसी विचारवंत प्रा. लक्ष्मण हाके यांनी थेट मला कॅबिनेटमंत्रीपद द्या, आणि विधानपरिषदेवर घ्या अशी थेट मागणी केली होती. राज्यात मराठा आरक्षणाचा लढा पुन्हा एकदा तीव्र करण्याचा मनोज जरांगे यांनी इशारा दिला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर बघितले असता, राज्यात भुजबळांची किती गरज आहे, याची जाणीव फडणवीसांना असली तरी, अजित पवारांना नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हा संघर्ष वाढतांना दिसून येत आहे.

COMMENTS