सरत्या वर्षाला निरोप देतांना…

Homeताज्या बातम्यासंपादकीय

सरत्या वर्षाला निरोप देतांना…

मनुष्याच्या आयुष्यातील दिवस, महिने, वर्ष कशी निघून जातात, हे कळतच नाही. कारण काळ हा कुणासाठी थांबत नाही, मात्र तो कसा झटक्यात निघून जातो, हे कळत देखी

पेपरफुटीला चाप बसेल का ?
घरात मल्ल व दारात वळू !
पाकिस्तानची हतबलता

मनुष्याच्या आयुष्यातील दिवस, महिने, वर्ष कशी निघून जातात, हे कळतच नाही. कारण काळ हा कुणासाठी थांबत नाही, मात्र तो कसा झटक्यात निघून जातो, हे कळत देखील नाही. हातातून एखादी वस्तू नकळत निसटून जावी तसेच हे 2021 चे वर्ष देखील निघून गेले. जुन्याला इच्छा नसतांना देखील निरोप देऊ नये, असे वाटत असतांनाच, नव्या वर्षांचे देखील स्वागत करण्याची औत्सुक्य देखील तितकेच कायम असते. आज सरत्या वर्षांला निरोप देण्याचा आणि नव्या वर्षांचे उत्साहात स्वागत करण्याचा दिवस. किमान यावर्षी तरी जगभरातील नागरिकांना नवीन वर्षांचे स्वागत करण्याचा आनंद लुटता येईल, अशी अपेक्षा असतांनाच, पुन्हा एकदा कोरोनाचा नवा व्हेरियंट आपल्या मानगुटीवर बसल्याचे दिसून येत आहे. या नव्या व्हेरियटंमुळे राज्य सरकारने मर्यादा घातल्या असून, मुंबईत जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. साधारण फेबु्रवारी, मार्च 2020 पासून देशात कोरोनाचा संसर्ग सुरू आहे. त्यामुळे 2020 वर्ष लॉकडाऊन, कामगारांचे स्थलांतर, अनेकांच्या नोकर्‍या गेल्यामुळे अनेकजण बेरोजगार झाल्याचे दिसून आले. मात्र 2021 या वर्षांत कोरोनाची दुसरी लाट सोडली तर, या वर्षांत इतका त्रास झाला नाही. कारण एकतर कोरोनाची सवय झालेली, मास्क लावण्याची, सॅनिटायझरची बॉटली जवळ बाळगण्याची आणि मुळातच म्हणजे बचेंगे तो और भी लढेंगे या तत्वानुसार अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडायचे, अन्यथा घरातूनच काम करण्याची सवय या वर्षांत अनेकांनी अंगी बाळगली. 2021 मध्ये अर्थव्यवस्था बर्‍यापैकी रुळावर आली, त्यामुळे अनेकांना रोजगार मिळाला. देशातील काही दुःखद घटना सोडल्या तर 2021 हे 2020 पेक्षा चांगलेच गेले असेच म्हणावेे लागेल.
नवीन वर्ष 2022 मध्ये पदार्पण करत असतांनाच, पुन्हा एकदा नवीन आव्हाने आपल्यासमोर उभे आहेत. कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉन तर आपल्या दारावर टकटक करत आहे, त्याला आतमध्ये घ्यायचे की बाहेर हुसकावून लावायचे हे सर्वस्वी आपल्या हातात आहे. याचबरोबर ओमायक्रॉनचा जास्त बागुलबुवा न करता, सकारात्मक राहून जीवन जगण्याचा आंनद आपल्याला घ्यावा लागणार आहे. कारण सलग दोन वर्षांपासून कोरोनाचा अनुभव घेत जगत असतांना, आता तिसर्‍या वर्षांत देखील हाच अनुभव घेत आपल्याला जगावे लागणार आहे. अजुन तरी काही वर्ष कोरोना आपली पाठ सोडायला तयार नसल्याचे एकंदरित दिसून येत आहे. कोरोना शिवाय देखील विश्‍व असून, त्या विश्‍वाकडे सकारात्मक दृष्टीने आपल्याला पहावे लागणार आहे. वास्तविक पाहता जर सर्वांनिच कोरोना नियमांचे पालन केले, तर कोरोना रुग्ण संख्या मोठया प्रमाणात वाढणार नाही, आणि अशावेळी निर्बंध देखील मोठया प्रमाणात लागणार नाही. गेल्या वर्षांत जश्या काही सकारात्मक घटना घडल्या तशाच काही नकारात्मक घटना देखील घडल्या. अलीकडच्या काळात सैन्यदलाचे हेलिकॉप्टर कोसळून सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्यासह 14 अधिकारी कर्मचार्‍यांचा यात मृत्यू झाला होता. या नैसर्गिक घटनांबरोबरच अनेक दुःखद घटना पचवत असतांना देखील काही सुखद, आनंदी, शुभवार्ता देखील धडकल्या, ज्या आपल्या सर्वांना सुखावणार्‍या होत्या. त्यामुळे आयुष्यात सुख, दुःखांचे मळभ दाटतील, यात शंकाच नाही. मात्र आपण सकारात्मक होऊन, जगले पाहिजे. प्रबल इच्छाशक्तीच्या जोरावर आपण कोणत्याही क्षेत्रात विजय मिळवू शकतो, अगदी मृत्यूवर देखील. सरत्या वर्षांतील दुःखद आठवणींना पूर्णविराम देत, नव्या वर्षांचे स्वागत करण्यासाठी सज्ज होऊया.

COMMENTS