Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बालिका दिनी ‘सावित्री’चा जन्म..! 

कोपरगाव शहर : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती आणि बालिका दिन—स्त्रीशिक्षण, स्त्रीसन्मान आणि सामाजिक परिवर्तनाची आठवण करून देणाऱ्या या पवित्र

ऊसतोड कामगारांच्या मुलांना ब्लॅंकेट वाटप 
ब्रास बॅन्ड स्पर्धेत ‘संजीवनी’चा प्रथम क्रमांक
समीर सोमैया यांना ‘प्लिनिओ नस्तानी शुगर एक्सलन्स’ पुरस्कार 

कोपरगाव शहर : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती आणि बालिका दिन—स्त्रीशिक्षण, स्त्रीसन्मान आणि सामाजिक परिवर्तनाची आठवण करून देणाऱ्या या पवित्र दिवशी माया गाडेकर आणि शाम गाडेकर यांच्या घरी गोंडस कन्यारत्नाचा जन्म झाला. या ऐतिहासिक दिनाचे औचित्य साधत, या चिमुकलीचे नाव अत्यंत अभिमानाने ‘सावित्री’ ठेवण्यात आले.

 स्त्री शिक्षणाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना ही जणू जिवंत मानवंदनाच ठरावी, या भावनेतून हे नामकरण करण्यात आले आहे. आजही समाजातील काही घटकांमध्ये मुलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज असताना, ही घटना ‘मुलगी म्हणजे ओझे नाही, तर प्रेरणा आहे’ हा संदेश ठामपणे देणारी ठरते.

या प्रसंगी भावना व्यक्त करताना वडील शाम सुनील गाडेकर म्हणाले, “स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी माझ्या घरी कन्यारत्नाचे आगमन होणे, हा मी शुभ संकेत मानतो. एक पिता म्हणून हा क्षण केवळ आनंदाचा नसून अभिमानाचा आहे. आजच्या युगात मुलगी ही केवळ घराची लक्ष्मी नसून ती समाजासाठी मोठी प्रेरणा आहे. माझ्या मुलीला सावित्रीबाईंच्या विचारांचा वारसा देत, तिच्या स्वप्नांच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी खंबीर पाठबळ देईन. ‘मुलगा-मुलगी समान’ हा विचार शब्दांत न ठेवता कृतीतून सिद्ध करेन.”

सावित्रीबाई फुले यांच्या नावाचा संस्कार घेऊन जन्मलेली ही चिमुकली ‘सावित्री’ भविष्यात ज्ञान, आत्मविश्वास आणि स्वाभिमानाची नवी ओळख निर्माण करेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. समाजातील प्रत्येक कुटुंबाने असा सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारल्यास, खऱ्या अर्थाने स्त्रीसशक्तीकरणाचा मार्ग सुकर होईल, यात शंका नाही.

COMMENTS