Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विमानांच्या आवाजाने बंकरमध्ये जीव मुठीत : सौरभ जाधव याचा थरारक अनुभव

गोंदवले / वार्ताहर : आकाशात सतत घिरट्या घालणारी विमाने अन सतत कानावर पडणारे सायरनचे आवाज यामुळे आम्ही भीतीच्या छायेखाली वावरत होतो. विमानांच्या आ

इस्लामपूरात वाहतुकीस अडथळा करणारे धोकादायक विजेचे खांब हटवण्यास प्रारंभ
Osmanabad : खुनाच्या आरोपातील आरोपीचा भूम तालुक्यात खून (Video)
देशी बनावटीचे पिस्तूल खरेदी-विक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश; विकणार्‍यासह खरेदी करणारे सातारा जिल्ह्यातील तिघे अटकेत

गोंदवले / वार्ताहर : आकाशात सतत घिरट्या घालणारी विमाने अन सतत कानावर पडणारे सायरनचे आवाज यामुळे आम्ही भीतीच्या छायेखाली वावरत होतो. विमानांच्या आवाजाने अक्षरशः अंगाचा थरकाप उडायचा. युध्दाच्या परिस्थितीमुळे मेस व बाजारपेठा बंद असल्याने मिळेल ते खाऊन बंकरमध्ये दिवस काढण्याशिवाय पर्याय नव्हता. उणे तापमानात करावी लागलेली पायपीट, जीव मुठीत धरून करावा लागला प्रवास, कुटुंबियांशी तुटलेला संपर्क अशा परिस्थितीत अडकलेल्या सर्व विद्यार्थ्यांना युक्रेनमधून भारतात येण्याची आस लागली होती. अखेर केंद्र शासनाच्या सहकार्याने आम्ही आज सुखरूप मायदेशात पोहोचलो.
रशिया-युक्रेन युध्दात युक्रेनमध्ये अडकलेल्या माण तालुक्यातील सौरभ जाधव याने कथन केलेला थरारक अनुभव अंगावर काटा आणणारे होते. युक्रेनहून भारतात परतल्यानंतर पुणे विमानतळावर उतरल्यानंतर तो माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होता.
माण तालुक्यातील काळचौडी येथील माध्यमिक शिक्षक बाळासाहेब जाधव यांचा मुलगा सौरभ हा नोव्हेंबर 2021 पासून युक्रेन मधील लव्हीव शहरात वैद्यकीय शिक्षण घेत आहे. मात्र, रशिया-युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युध्दामध्ये भीतीच्या छायेखाली अडकलेल्या सौरभ याची मायदेशात परतण्यासाठी धडपड सुरू होती. सौरभ सांगत होता, युक्रेनमधील लव्हीव शहरात आम्ही वैद्यकीय शिक्षण घेत आहोत. आम्ही रहात असलेल्या हॉस्टेलमध्ये जवळपास 300 विद्यार्थी रहात आहेत. गेले अनेक दिवस रशिया-युक्रेनमध्ये शीतयुध्द सुरू होते. साधारण 10 फेब्रुवारीच्या आसपास रशियाने युध्दाची घोषणा केल्यानंतर अनेक देशातील विद्यार्थी आपापल्या देशात निघून गेले. परंतू युध्दाची परिस्थिती गंभीर बनल्याने 18 फेब्रुवारी रोजी भारतीय दूतावास कार्यालयाने युक्रेनमध्ये असलेल्या भारतातील नागरिकांना युक्रेन सोडण्यास सांगितले. त्यानंतर आम्ही विमान तिकीट काढण्यासाठी प्रयत्न करत होतो. परंतू तिकीट मिळत नव्हते, त्यातच 24 फेब्रुवारी रोजी रशियाने युक्रेनची राजधानी किव्ह विमानतळावर हल्ल्या केल्याने विमानसेवा ठप्प झाली. याचदरम्यान रशियाने हल्ले वाढविल्याने सर्वजण भयभीत झालो. रशियन विमाने आकाशातून घिरट्या घालत असल्याने आमच्या अंगाचा थरकाप उडायचा. विमानाच्या आवाजाने काळजाचे पाणी व्हायचे. याचवेळी शहरातून सायरनचे मोठे-मोठे आवाज करत गाड्या फिरत असल्याने बाहेर पडणे अशक्य झाले होते. लव्हीव शहरातील बाजारपेठा, दुकाने, कॉलेजची मेस बंद झाल्याने खण्या-पिण्याची चिंता वाढली. हल्ल्याच्या भितीपोटी कॉलेजच्या बंकरमध्ये विद्यार्थ्यांनी आश्रय घेतला. जवळ असलेली बिस्किटे, स्नॅक्स खाऊन प्रसंगी उपाशीपोटी राहून आम्ही अक्षरशः जीव मुठीत धरून दिवस काढले. बंकरमध्ये काढलेले 36 तास क्षणाक्षणाला मायभूमीची आठवण करून देत होते. युध्दजन्य परिस्थितीत भारतीय परराष्ट्र मंत्रालय, दूतावास विभाग यासह आई-वडील, नातेवाईक, मित्रमंडळी सर्वजण संपर्कात राहून मानसिक आधार देत होते.
याचदरम्यान भारतीय दुतावासाने पत्रव्यवहार करून भारतीयांनी युक्रेनच्या सीमेपर्यंत येण्याचे निर्देश दिले. त्याठिकाणी भारतीय विमान वाहतूकीच्या विशेष विमानांनी अडकलेल्या सर्वांना भारतात पोहोचविण्याची सोय केली असल्याचा निरोप आम्हाला मिळाला. त्यानंतर आम्ही लव्हीव ते हंगेरी असा साधारण 70 तासांचा खासगी बसने प्रवास करून हंगेरी गाठली. मात्र, त्यातही आम्हाला 2 दिवस धर्मशाळेत राहून मिळेल ते खाऊन दिवस काढावे लागले. त्यानंतर भारतीय दूतावास विभागाने आमच्याशी संपर्क करून आम्हाला विशेष विमानाने शुक्रवार, दि. 4 मार्च रोजी दिल्लीपर्यंत आणून सुखरूप सोडले. केंद्र सरकारने दिल्लीत महाराष्ट्र सदन येथे आमची राहण्याची सोय केली होती. त्यानंतर दिल्लीहून विमानाने आम्हाला पुण्यात सोडले असून मी माण तालुक्यातील गावी पोहोचणार असल्याचे सौरभ याने प्रत्यक्ष बोलताना सांगितले. युध्दजन्य परिस्थितीतून सुखरूप घरी पोहचल्याने मला आनंद होत असल्याचेही त्याने सांगितले.
तत्पर प्रशासन यंत्रणेमुळे विद्यार्थी सुखरूप
युध्दाच्या परिस्थितीत युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात भारतीय प्रशासन होते. युक्रेनमधील भारतीय दुतावासामार्फत विद्यार्थ्यांना सतत संपर्क करून दिलासा देण्यात येत असल्याचे सौरभ याने सांगितले. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने हंगेरीमध्ये विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय, विमानसेवेची सोय केल्याने अडकलेले विद्यार्थी सुखरूप घरी परतले आहेत. महाराष्ट्र शासनाचे अधिकारी तसेच सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह सतत माझ्यासह कुटुंबियांच्या संपर्कात होते, असेही सौरभ याने सांगितले.

देशातच वैद्यकीय शिक्षणाची सोय आवश्यक
आपल्या देशातील वैद्यकीय शिक्षण महागडे असल्याने आम्ही मुलाला युक्रेनमध्ये शिक्षणासाठी पाठवले आहे. भारतामध्ये कमी खर्चात व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून वैद्यकीय शिक्षणाची सुविधा मिळणे आवश्यक असल्याचे मत सौरभचे वडील बाळासाहेब जाधव यांनी व्यक्त केले. युक्रेनच्या युध्दजन्य परिस्थितीतून मुलगा सुखरूप परत येण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल त्यांनी प्रशासकीय यंत्रणेस धन्यवाद दिले. तसेच याकामी माणच्या यापूवीच्या तहसीलदारांनी वेळोवेळी प्रशासन यंत्रणेशी संपर्क साधून आम्हाला मदत केल्याचे सौरभच्या आई-वडीलांनी सांगितले.

COMMENTS