चीन हा देश तसा एकाधिकार शाही असलेला देश. सरकारच्या विरोधात, आंदोलन, विरोधी वक्तव्य कुणी केले, तर ही बंडाळी हा विरोध मोडीत काढण्यामध्ये चीन माहीर
चीन हा देश तसा एकाधिकार शाही असलेला देश. सरकारच्या विरोधात, आंदोलन, विरोधी वक्तव्य कुणी केले, तर ही बंडाळी हा विरोध मोडीत काढण्यामध्ये चीन माहीर आहे. त्यामुळे तिथल्या राष्ट्राध्यक्षांविरोधात कुणी उघड वक्तव्य करत नाही. आंदोलन केले तर त्यांना अजब शिक्षा देण्यात येतात. मात्र दोन दिवसांपूर्वी चीनचे नागरिक रस्त्यावर उतरले. केवळ रस्त्यांवर उतरले नाहीत तर त्यांनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हटावची मागणी केली. त्यामुळे चीनमध्ये नेमके चालले काय आहे, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. चीनमध्ये एका दिवसांत तब्बल 40 हजारापेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळल्यामुळे चीन सरकारने अनेक निर्बंध लादले. निर्बंध हे निमित्त आहे. मात्र हा संताप अनेक वर्षांचा आहे. चीनच्या हुकूमशाही प्रवृत्तीविरोधात. त्यामुळे हा संताप नागरिक रस्त्यावर येऊन उघडपणे व्यक्त करतांना दिसले. आणि त्याची दखल संपूर्ण जगाने घेतली. वास्तविक पाहता कोरोना रुग्णांची संख्या इतर देशांमध्ये अल्प प्रमाणात आहे. त्यामुळे तेथील व्यवहार सुरळीत सुरु आहे. कसलेही निर्बंध नाही. मात्र चीन, जपान, ब्राझील या देशामध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कोरोनाच्या उद्रेकामुळे सर्वसामान्यांचे जीवन केवळ प्रभावित झालेले नाही, तर मोठया अडचणींचा त्यांना सामना करावा लागला आहे. यातून सावरत असतांना, आत्ता कुठे जीवन पूर्वपदावर येत असतांना, कोरोनाचा हा धक्का आणि निर्बंध त्यांना परवडणारे नाहीत. त्यामुळे हा संताप चीनमध्ये बाहेर पडतांना दिसून आला. मागील काही वर्षांपासून येथील जनतेमध्ये सरकारविधोत रोष आहे. हाच रोष या निदर्शनांच्या माध्यमातून बाहेर येतोय, असे म्हटले जात आहे. या आंदोलनाला येथे राजकीय वळण मिळत असल्याचे दिसतेय. 24 नोव्हेंबर (गुरुवार) रोजी शिंजियांग प्रांताची राजधानी असलेल्या उरुमकीमध्ये एका इमारतीला आग लागली. या आगीत 10 लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर या आंदोलनाची धार तीव्र झाली. या घटनेनंतर येथील जनता शुक्रवारी रस्त्यावर उतरली. तसेच लॉकडाऊन संपवा अशा घोषणा येथे देण्यात आल्या. उरुमकी येथे नागरिक साधारण 100 दिवसांपासून टाळेबंदीला तोंड देत होते. याच कारणामुळे येथील नागरिकांमध्ये हा उद्रेक झाल्याचे म्हटले जात आहे. चीनमधील हे आंदोलन शांघाय, बीजिंग या मोठ्या शहरांव्यतिरिक्त विद्यापीठांमध्येही पोहोचले आहे. आंदोलकांनी बीजिंगमधील एका प्रतिष्ठित विद्यापीठात निदर्शने केली आहेत. येथे मेणबत्ती पेटवून या आंदोलनाला समर्थन देण्यात आले. शांघायमध्ये आंदोलकांनी पोलिसांना दाद दिली नाही. ‘लोकांची सेवा करा’, ‘आम्हाला स्वातंत्र्य हवे आहे’ अशा आशयाच्या घोषणा या आंदोलकांनी दिल्या आहेत. या घोषणांतून चीनी जनतेला नेमके काय हवे आहे, याचा प्रत्यय येत आहे. त्यांना लोकशाही हवी आहे. आणि आपल्या देशात मुक्तपणे जगता आले पाहिजे, हीच त्यांची माफक अपेक्षा आहे. कोरोना रोखण्यात चीन सरकार अपयशी का ठरले, चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक का झाला, याचा शोध तिथल्या सरकारने आणि प्रशासनाने घेण्याची गरज आहे. कारण आजमितीस कोरोना नवा राहिलेला नाही. कोरोनावर उपचार आणि प्रतिबंधक लस उपलब्ध असतांना, चीनने या योजना राबविण्यास हयगय का केली, हा महत्वाचा प्रश्न आहे. देशांतर्गत प्रश्न निर्माण झाले तर, चीन सरकार सीमवेर काहीतरी मुद्दा उकरून काढून चीनी नागरिकांमध्ये देशाभिमान जागृत करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे मूळ मुद्दयावरून लक्ष दुसरीकडे वेधले जाते. मात्र चीनी नागरिक आता आपल्या लोकशाहीप्रती आणि हक्कांविषयी सजग होतांना दिसून येत आहे.
COMMENTS