Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कादवा प्रतिष्ठानचा “साहित्य साधना” पुरस्कार कविवर्य प्रकाश होळकर यांना जाहीर

कादवा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी साहित्यातील भरीव योगदानाबद्दल *साहित्यसाधना पुरस्कार* दिला जातो. यावर्षी मात्र प्रथमच ग्रामीण साहित्यिक विजयकु

फोफसंडीत चिमुकल्या अपंग आदित्यचा संघर्ष सुरूच
ठाकरे गटाचा आपला दिल्ली विधानसभेसाठी पाठिंबा
Indapur : पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनांच्या कारवाईने वाळू माफियांचे धाबे दणाणले| LokNews24

कादवा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी साहित्यातील भरीव योगदानाबद्दल *साहित्यसाधना पुरस्कार* दिला जातो. यावर्षी मात्र प्रथमच ग्रामीण साहित्यिक विजयकुमार मिठे यांनी त्यांच्या मातोश्री “स्व.शकुंतलाबाई बाबुराव मिठे स्मृती साहित्य साधना” पुरस्कार देण्याचे जाहीर केले आणि या पहिल्याच पुरस्काराचे मानकरी प्रसिद्ध कवी, गीतकार प्रकाश होळकर हे ठरले आहेत. तशी या पुरस्काराची घोषणा प्रतिष्ठानचे सरचिटणीस कवी  विठ्ठलराव संधान यांनी केली आहे. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम रुपये २१०००/ सन्मानचिन्ह, मानपत्र असे असून पुरस्काराचे वितरण  नोव्हेंबर२०२३ मध्ये नाशिक येथे होणा-या “कादवा गौरव सोहळ्यात”मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. कवी प्रकाश होळकर हे नाशिकच्याच मातीतील असून नाशिकच्याच मातीतल्या या पहिल्या पुरस्काराचे ते मानकरी ठरले आहेत. कवी होळकर यांची साहित्यिक वाटचाल मोठी राहिली असून त्यांच्या  ‘कोरडे नक्षत्र’ या काव्यसंग्रहाने वाचक, समीक्षक आणि नामवंत साहित्यिकांवर गारुड केले होते. या संग्रहानंतर कवी ना. धो. महानोर यांच्या पत्रसंग्रहाचे ‘रानगंधाचे गारुड’ या नावाने त्यांनी संपादन केले व रसिक वाचकांनी याचेही महाराष्ट्रभर कौतुक केले. लवकरच ‘मृगाच्या कविता’ या नावाने होळकर यांचा बहुप्रतिक्षित काव्यसंग्रह वाचकांच्या भेटीला येतो आहे. प्रकाश होळकर यांना साहित्यिक वाटचालीबद्दल आजवर यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार, घनश्यामदास सराफ साहित्य सन्मान पुरस्कार, विशाखा काव्य पुरस्कार, महाराष्ट्र कवी यशवंत काव्य पुरस्कार, पद्मश्री विखे पाटील प्रेरणा पुरस्कार, कविवर्य ना. धो. महानोर पुरस्कार, आचार्य प्र .के. अत्रे साहित्य पुरस्कार, कविवर्य वसंत सावंत काव्यपुरस्कार, कविवर्य ना. घ. देशपांडे काव्यपुरस्कार, गिरणागौरव साहित्य पुरस्कार, यशवंतराव चव्हाण साहित्य स्मारक काव्यपुरस्कार, कविवर्य भुजंग मेश्राम पुरस्कार, अनन्वय काव्य पुरस्कार, राम उगावकर पुरस्कार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार, कृषी स्पंदन साहित्य पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने आजवर ‘सर्जाराजा’, ‘टिंग्या’ ‘बाबू बँडबाजा’ आणि ‘टपाल’  या चित्रपटातील सर्वोत्कृष्ट गीतलेखनासाठी दिला जाणारा  ‘ग. दि. माडगूळकर राज्य पुरस्कार’ या मानाच्या पुरस्काराने चार वेळा त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. ‘टपाल’ चित्रपटातील सर्वोत्कृष्ट गीत लेखनासाठी प्रतिष्ठेचा ‘फिल्मफेअर अवॉर्ड’ व मटा सन्मान पुरस्कारसाठी नामांकन होळकरांना मिळाले आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे सर्जा राजा चित्रपटाच्या सर्वोत्कृष्ट गीत लेखनासाठी चित्रपती व्ही. शांताराम जन्मशताब्दी वर्षानिमित्त चित्रपट महर्षी बाबुराव पेंटर स्मृती सन्मान चिन्हही त्यांना प्राप्त झाले आहे. लासलगावसारख्या गाववजा खेड्यातून येऊन शेतीमतीत राबणाऱ्या या कवीने शेतीमातीचं अस्सल दुःख, सल, वेदना कवितेतून आणि गीतलेखनातून मांडली आणि लोकांना ती आपलीशी वाटली. चित्रपट गीतलेखन हा होळकरांचा हातखंडा असून आजवर त्यांनी  सर्जाराजा, टिंग्या, गोष्ट छोटी डोंगराएवढी, बाबू बँडबाजा, टपाल, चिनू ,प्रियतमा, चूक भूल द्यावी घ्यावी, धूळमाती, पिंकी: एक सत्यकथा, जागर, कामधेनु, घाटी इत्यादी चित्रपटांसाठी गीत लेखन केले आहे. होळकरांच्या गीतांचे  पार्श्वगायन अनेक  नामवंत गायकांनी केले आहे. त्यांच्या अनेक कवितांचा महाराष्ट्रातील जवळपास सर्वच विद्यापीठात अभ्यासक्रमात समावेश झालेला आहे. चित्रपट , दूरदर्शन मालिका यासाठीही त्यांनी गीत लेखन केले आहे. तसेच काही चित्रपट, नाटक यात त्यांनी आपल्या अभिनयाचीही चुणूक दाखविली आहे. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला आणि मातीत राबून मातीचे ऋण फेडणाऱ्या कवीला हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल कादवा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी आणि साहित्यिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील सर्व मान्यवरांनी कवी प्रकाश होळकर यांचे अभिनंदन केलेल आहे

COMMENTS