नवी दिल्ली/मुंबई : पश्चिम आशियातील संघर्ष आणि इराणने होर्मुझ सामुद्रधुनीवरील वाहतूक रोखल्यामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर ताण निर्माण झाला आहे. या

नवी दिल्ली/मुंबई : पश्चिम आशियातील संघर्ष आणि इराणने होर्मुझ सामुद्रधुनीवरील वाहतूक रोखल्यामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर ताण निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर देशात घरगुती गॅस सिलिंडरच्या तुटवड्याबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले असले तरी नागरिकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारने शुक्रवारी सलग तिसर्या दिवशी विविध मंत्रालयांची संयुक्त बैठक घेतली. गॅस पुरवठ्याबाबत सातत्य राखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयातील संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी नागरिकांना गॅस वितरकांच्या कार्यालयाबाहेर रांगा लावू नयेत, असे आवाहन केले. ग्राहकांनी नियमित पद्धतीने गॅस सिलिंडरची नोंदणी करावी, असेही त्यांनी सांगितले. अलीकडील काळात घरबसल्या बुकिंग करण्याचे प्रमाण लक्षणीय वाढले असून फेब्रुवारीमध्ये सुमारे 71 टक्के असलेले प्रमाण मार्चमध्ये 83 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. घरगुती तसेच व्यावसायिक गॅसच्या पुरवठ्यात घट झाल्याच्या चर्चांबाबतही सरकारने स्पष्टीकरण दिले. देशभरातील सुमारे पंचवीस हजार वितरकांपैकी एकाही ठिकाणी गॅस पूर्णपणे संपल्याची अधिकृत नोंद झालेली नसल्याचे मंत्रालयाने सांगितले. त्यामुळे तुटवड्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही नागरिकांना सूचित करण्यात आले आहे. मंत्रालयाच्या माहितीनुसार, कच्च्या तेलाच्या शुद्धीकरणाबाबत देशात पुरेशी क्षमता उपलब्ध आहे. पेट्रोल आणि डिझेल उत्पादनात भारत मोठ्या प्रमाणावर स्वयंपूर्ण आहे. देशातील सर्व शुद्धीकरण प्रकल्प सध्या पूर्ण क्षमतेने किंवा त्याहून अधिक क्षमतेने कार्यरत असून कच्च्या तेलाचा आवश्यक साठाही उपलब्ध आहे. त्यामुळे इंधनपुरवठ्यावर तातडीचा धोका नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच घरगुती ग्राहकांना नळाद्वारे मिळणारा गॅस आणि वाहनांसाठी वापरला जाणारा गॅस यांचा पुरवठा देखील नियमित सुरू असल्याचे मंत्रालयाने सांगितले. सध्याच्या परिस्थितीवर सरकार सातत्याने लक्ष ठेवून आहे. त्यामुळे नागरिकांनी संयम बाळगावा आणि घबराट निर्माण होईल अशी अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे.
राज्यात अनेक हॉटेलमध्येे पेटल्या चुली
मध्यपूर्वेतील युद्धस्थितीचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. स्वयंपाकासाठी वापरल्या जाणार्या गॅसचा तुटवडा राज्यातील अनेक शहरांत जाणवू लागल्याने नागरिक आणि हॉटेल व्यवसायिक दोघांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. गॅस पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे एजन्सीसमोर ग्राहकांच्या लांबलचक रांगा लागल्या असून अनेक ठिकाणी बुकिंग सेवा देखील बंद करण्यात आल्याची तक्रार आहे. राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर यांसारख्या प्रमुख शहरांत गॅसचा पुरवठा मंदावल्याचे चित्र दिसत आहे. अनेकांनी सिलिंडरची नोंदणी करूनही वेळेवर पुरवठा होत नसल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. राज्यात गॅस बुकींग सेवा ठप्प झाल्याचे दिसून येत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस एजन्सीसमोर शुक्रवारी मोठ्या रांगा लागल्याचे चित्र दिसले.

COMMENTS